श्रद्धा बेलसरे खारकर
ही लोकं चक्क एखाद्या गोष्टीची व्याख्याच बदलून टाकतात. तेच केले पुण्याचे ‘नाक-कान-घसा-तज्ज्ञ’ डॉ. मिलिंद भोईर यांनी! तसा रंगपंचमी हा एक पारंपरिक सण! उत्तर भारतातून देशभर पसरलेला एक आनंदसोहळा. होळीनंतरच्या पंचमीला रंग खेळणे म्हणजे काय? तर एकमेकांच्या अंगावर रंग टाकणे. देहभान विसरून नाचणे, फिरणे, मिष्टानाचे पदार्थ खाणे, एकमेकांच्या आनंदात सामील होणे. परंतु ज्यांना या गोष्टी कधीच करता येणार नाहीत त्यांच्यासाठी खास व्यवस्था करून त्यांच्या आयुष्यात रंग भरणे हेच डॉक्टरांनी आपले ध्येय मानले आणि ३० वर्षांपूर्वी हा आगळा सोहळा सुरू केला! डॉक्टर आणि त्यांच्याशी जोडलेल्या पुण्यातील अनेक सामाजिक संस्था दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतात. पण यात काय विशेष? असा प्रश्न मलाही पडला होता! परवा तिथे जाऊन तो अद्भुत सोहळा प्रत्यक्ष पाहून आल्यावर मात्र मी अवाकच झाले आणि रंगपंचमी खेळताना लहानपणापासून मिळालेल्या एकूण आनंदाच्या कितीतरी पट अधिक आनंद घेऊन घरी आले. त्याचे कारण अगदी वेगळे होते. कुणासाठी होता हा सोहळा? कोण कोण सामील होते यात? प्रामुख्याने अपंग, अनाथ, मतीमंद मुले मोठ्या संख्येने दिसत होती. खरे तर हा सोहळाच त्यांचा होता असे म्हणायला हवे. पण तेवढेच नाही. विविध अनाथाश्रम, अपंग आश्रम, मुकबधीर मुले, रस्त्यावरची बेघर मुले, मतीमंद मुली, त्यांना सांभाळणारे स्वयंसेवक दिसत होते. अनेक वृद्धाश्रमातील आजी-आजोबा मुलांबरोबर खेळायला आले होते. अगदी वेश्या वस्तीतील सामाजिक कार्यकर्ते तिथल्या मुलांनाही घेऊन आले होते. सर्वजण आज एकाच रंगात रंगणार होते.
याशिवाय ‘समाज प्रबोधन ट्रस्ट’, ‘समर्पण संस्था’, ‘एनेबल फाऊंडेशन’, ‘अस्तित्व गुरुकुल’, ‘कसबा संस्कार केंद्र’, ‘सूर्योदय फाऊंडेशन’, ‘जिजाऊ फाऊंडेशन’, ‘बचपन वर्ल्ड फोरम’, आयडेनटीटी फाऊंडेशन, ‘ज्ञानगंगोत्री मंतीमंद मुलांची शाळा’, ‘अक्षर स्पर्श’, ‘सेवासदन दिलासा केंद्र’, ‘स्वाधार संस्था’, ‘अलका फाऊंडेशन’, ‘पसायदान संस्था’, ‘वंचित विकास’, ‘पर्वती दर्षण, ‘चैतन्य हास्य योग’, ‘संत गजानन महाराज मतीमंद शाळा’ अशा अनेक संस्था त्यांच्या शेकडो मुलांसह सहभागी झाल्या होत्या. मी गेले होते ‘एक घास फाऊंडेशन’चे शिवराज आणि मोनिका पाटील, त्यांची कन्या प्रेरणाबरोबर. आम्ही १६ मार्चला ‘आयुर्वेदिक कॉलेज’च्या मैदानावर पोहोचलो. प्रत्यक्ष मैदानावर पोहोचण्याआधीच दोन्ही बाजूला खूप गाड्या, ट्रक, टेम्पो लागलेले दिसत होते. आम्हाला गाडी वाहनतळावर ठेवण्यासाठीसुद्धा अर्धा तास दूर जावे लागले इतकी गर्दी होती. मैदानावर ५००/६०० मुले आणि तेवढीच मोठी माणसे! डॉ. मिलिंद भोई सर्वांचे हसतमुखाने स्वागत करत होते. हा माणूस म्हणजे उत्साहाचा मूर्तिमंत झराच आहे. त्यांची या कार्यक्रमाची तयारी ३/४ महिने आधीपासून सुरू होते. ही मुलेच गाणी कुठली लावावीत याची फर्माईश करतात. त्या गाण्यावर ती नाचही बसवतात. त्यांची रोज तालीम चालते. जेवायला काय हवे तेही सर्वांना विचारून ठरवले जाते. या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे एरव्ही कुठेही न दिसणारा पोलीस बँड! कितीही पैसे दिले तरी पोलीस बँड कुणाला मिळत नसतो. पण गेल्या १५ वर्षांपासून या विशेष मुलांचे स्वागत पोलीसच आपल्या बँडने करतात. आपल्याला ‘अग्निशमन दलाची’ आठवण सुद्धा येते ती फक्त आग लागल्यावरच! या दलाच्या जवानांना नेहमी तणावात राहावे लागते आणि ते नियमित चक्क आगीशीच खेळत असतात. पण इथे मात्र ते निमंत्रित असतात फक्त आनंदासाठी! डॉक्टर आत आले आणि म्हणाले, ‘आधी सर्वांनी न्याहारी करून घ्या. आपल्याला खूप रंग खेळायचा आहे. न्याहरी होती सुप्रसिद्ध ‘शंकर महाराज मठा’कडून आलेली गरम खिचडी, शिरा आणि शीर-खुर्मा! अशा चविष्ट न्याहारीने पोट आणि मन अगदी तृप्त झाले. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे उपक्रमात सर्व धर्माचे लोक सहभागी होतात. मुस्लीम समाजाचाही सक्रिय सहभाग असतो. ते सर्व या २००० मुलांसाठी शिरखुर्मा करून आणतात.
गाड्या भरभरून मुले येत होती. एका बाजूला प्रशस्त मंडप उभारला होता. मंडपाच्या एका बाजूला मुलांसाठी जादूचे प्रयोग सुरू होते. आता महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे आगमन होऊ लागले. यात सामाजिक कार्यकर्ते, सनदी अधिकारी, राजकीय नेतेमंडळी तसेच समाजातील प्रतिष्ठित लोकही हजेरी लावत होते. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळसुद्धा खास आले आणि त्यांनी मुलांसोबत मनसोक्त रंग खेळले. स्टेजवर अनेक मान्यवर जमा झाले होते. त्यांच्या हस्ते प्रयागराजवरून आणलेल्या गंगेचे गंगापूजन करण्यात आले. आता मैदानात जवळपास २००० मुले जमली होती. त्यांची गडबड सुरू थोड्याच वेळात बहारदार रंगपंचमी सुरू झाली. स्टेजवरून रंगाची उधळण होत होती. अवघा रंग एक झाला. सर्व मैदानच जणू गोकुळ झाले होते. अगदी श्रीकृष्णाच्या मथुरेची रंगपंचमी इथे अवतीर्ण झाली होती. सगळेजण आपापले पोशाख, पद, प्रतिष्ठा सर्व काही पूर्णत: विसरून एकाच रंगात रंगून गेले! मनसोक्त रंग खेळून झाल्यावर हात, तोंड धुण्यासाठी साबण देण्यात आले. मुले हात धुवून आल्यावर त्यांच्यासाठी गरमागरम पाव-भाजी, पुलाव, जिलेबीचे जेवण तयारच होते. ते सर्वांना आग्रहाने वाढण्यात आले. त्यानंतर उन्हाचा कहर कमी करण्यासाठी गारेगार कुल्फी देण्यात आली. आनंदाने विभोर होऊन तृप्त मनाने मुले घरी, त्यांचे कसले घर म्हणा पण त्यांच्या त्यांच्या आश्रमात परतली! या सोहळ्याचे वर्णन केवळ ‘अद्भुत’ या शब्दातच करणे शक्य आहे. मला तिथे असताना राहून राहून आठवत होती ती म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची एकच ओळ “अवघा रंग एक झाला.” ३० वर्षे सातत्याने हा उपक्रम भोई फाऊंडेशनतर्फे राबवण्यात येतो. अशीच अनेक वर्षे हा रंगोत्सव होत रहावा.