मुंबई : हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असणारे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sa) यांची आज २९ मार्च रोजी पुण्यतिथी आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान म्हणून हा दिवस ‘बलिदान दिवस’ म्हणून देखील पाळला जातो. धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन आणि त्यांनी केलेला संघर्ष सर्वांसाठीच प्रेरणादायी कायमच राहिलेला आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांची ओळख ‘छावा’ म्हणून केली जाते. चला जाणून घेऊया स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास.
बालपण
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला.
तारुण्य
इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले. मात्र संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. त्यामुळे अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले.
संभाजीराजेंचा राज्याभिषेक सोहळा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे स्वराज्याची सुत्रे आली. १६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी रायगड किल्यावर संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला.
संभाजीराजेंनी १२० युद्ध जिंकली
छत्रपती संभाजी महाराज एक कुशल संघटक होते. मराठ्यांच्या १५ पट असणाऱ्या मुघलांशी शंभूरायांनी एक हाती लढा दिली. त्यांनी सुमारे १२० युद्धे लढली. यापैकी एकाही लढाईत त्यांना अपयश आले नाही. त्यांनी १२० युद्धे जिंकली. यामुळे त्यांना अजिंक्य म्हटले जाते.
दगाफटका
इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने महाराजांच्या नजीकच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला, फ्रेंच गवर्नर गेनरल मार्टीनने त्याच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे, की जवळच्या माणसांनी दगाफटका केला. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीमहाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले. नाही असे नाही. परंतु मावळ्यांनी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. सर्वात पहिला प्रयत्न हा जोत्याजी केसरकर यांनी केला. पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.
शारीरिक छळ व मृत्यू
मुघलांनी पकडल्या नंतर संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. ‘औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून स्वतंत्र जिवन जगन्याचे’ किंवा धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. शेवटी दोघांनाही नर्क यातना देउन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला.