स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
स्टँड-अप कॉमेडीच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांतील बड्या नेत्यांची खिल्ली उडवून त्यांचा अवमान करण्याची मोहीम कॉमेडियन कुणाल कामराने चालवली असावी. गाणी, शेरेबाजी, उपहासातून टवाळी असा स्टँड-अप कॉमेडीचा कामराचा कार्यक्रम नया भारत नावाने युट्यूबवर झळकला आणि नव्या वादाला तोंड फुटले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील गाणे व्हायरल होताच समर्थक शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली. ज्या स्टुडिओमध्ये या गीताचे चित्रीकरण झाले, त्या हॅबिटॅट क्लबवर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून तोडफोड केली. विनोद किंवा विडंबन हे निखळ असले पाहिजे, त्यातून हंशा पिकला पाहिजे, तो ऐकणाऱ्याला आनंद मिळाला पाहिजे. पण विडंबन गीताच्या नावाखाली कोणा मोठ्या नेत्याची बदनामी केली जाणार असेल किंवा कोणाला तरी खूश करण्यासाठी दुसऱ्या कोणाला गद्दार असे संबोधले जाणार असेल तर त्यावर संताप, निषेध आणि आक्रोश प्रकटणार याचेही भान कॉमेडियन कामराने ठेवायला हवे होते. हॅबिटॅट क्लबवर झालेल्या तोडफोडीचे कोणीही समर्थन केलेले नाही किंवा कोणालाही ते करता येणार नाही. कामरा गेली अनेक वर्षे विडंबन गीत सादर करतोय, पण कधी गद्दार असा शब्दप्रयोग वापरल्याचे आठवत नाही. हॅबिटॅट क्लबवरील हल्ला एकनाथ शिंदे यांच्याच शब्दांत अॅक्शनला ती रिअॅक्शन होती…
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी
आँखो पे चश्मा, हाये…
एक झलक दिखलाये
कभी गुवाहटी में छुप जाए
मेरी नजर सें तुम देखो
तो गद्दार नजर वो आये…
मंत्री नही वो दलबदलू है,
और कहा क्या जाए…
कुणाल कामराने आपल्या बिडंबन गीतात एकनाथ शिंदे यांचे थेट नाव घेतलेले नाही. पण ठाणे, रिक्षा, दाढी, चष्मा, गुवाहटी, बाप मेरा ये चाहे, हे शब्द वापरून त्याचा रोख एकनाथ शिंदे यांच्यावरच असल्याचे शाळेत जाणाऱ्या मुलांनाही चांगले समजते. सामाजिक घडामोडींवर किंवा राज्यकर्त्यांच्या वागण्या-बोलण्यावर रोज व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असतात. विनोद, वात्रटिका, चारोळ्या वाचायला मिळतात. विडंबन किंवा उपहात्मक शेरेबाजी ऐकायला मिळते. पण देवदेवता, महापुरुष किंवा ज्याच्या पाठीशी हजारो-लक्षावधी अनुयायी आहेत अशा नेत्यांच्या विरोधात बोललेले त्याच्या समर्थकांना मुळीच आवडत नाही. म्हणूनच कामराने एकनाथ शिंदेंवर विडंबन गीत सादर करून आ बैल मुझे मार, अशी स्वत:ची अवस्था करून घेतली आहे. कामराने एकनाथ शिंदे यांचे विडंबन नव्हे तर त्यांचा अवमान आणि बदनामी करणारे गीत सादर करून स्वत:ला मोठी प्रसिद्धी मिळवली असेल. उबाठा सेनेची त्याने शाबासकी मिळवली असेल. त्याने एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणून उबाठा सेनेला आनंद मिळवून दिला असेल, पण शिंदेंच्या अनुयायांचा रूद्रावतार बघता, कामराने ठाणे की रिक्षा हे गीत गाऊन आपल्या स्वत:च्या पायावरच धोंडा पाडून घेतला आहे.
विडंबन कवी रामदास फुटाणे यांनी तर म्हटले आहे की, कामराने जे काही लिहिलं आहे, ते एकनाथ शिंदे या व्यक्तीविषयी अत्यंत द्वेषाने लिहिले आहे. हे गीत कोणाच्या प्रचारासाठी त्यांनी लिहिलेले असावे. व्यंगचित्रकाराने विसंगती शोधायची असते व त्यावर विनोद किंवा व्यंगात्मक कविता करता आली पाहिजे.कुणाल कामरा आपली काही चूक झाली आहे, असे मानायला मुळीच तयार नाही. त्याची मस्ती कायम आहे. मद्रास उच्च न्यायालयातून त्याने काही दिवसांसाठी अटकपूर्व जामीनही मिळवला. तो म्हणतो – एखाद्या कॉमेडियनच्या शब्दासाठी कार्यक्रम स्थळावर हल्ला करणे म्हणजे, टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवणे. कारण तुम्हाला दिलेले बटर चिकन पसंत नाही. मला जमावाची भीती वाटत नाही. मी पलंगाखाली लपून बसणार नाही. मी माफी मागणार नाही. प्रभावशाली सार्वजनिक नेत्यांवर विनोद सहन करण्यास तुम्ही असमर्थ आहात. म्हणून मी माझ्या अधिकाराचे स्वरूप बदलणार नाही.एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात बराच संयम ठेवला असेच म्हणावे लागेल. त्यांचे समर्थक संतप्त झाले. त्यांनी तोडफोड केली. पण आपले समर्थक प्रक्षोभक व्हावेत, असे कोणतेही वक्तव्य त्यांच्याकडून झाले नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर हा व्यभिचार, स्वैराचार व एक प्रकारे सुपारी घेऊन बोलण्याचे काम आहे. हा माणूस मोदी, निर्मला सीतारामन, सरन्यायाधीश, मोठ्या उद्योगपतींवर असाच बोललाय. कामराने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गायलेले बिडंबन गीतही व्हायरल झाले आहे.
ताना शा ओ ताना शा,
झुठा हूँ, कातिल भी हूँ…
कुणाल कामराचा स्टँड-अप कॉमेडीचा पहिला शो सन २०१३ मध्ये झाला. त्याने युट्यूब पॉडकास्ट सुरू केले. अरविंद केजरीवाल, रवीश कुमार, जावेद अख्तर, असदुद्दीन ओवेसी, मनीष सिसोदिया, प्रियंका चतुर्वेदी, कन्हैया कुमार, उमर खलिद अशी मांदियाळी त्याच्या कार्यक्रमात सहभागी झाली आहेत. हे सर्व नामवंत कोण आहेत हे लोकांना चांगले समजते.
सन २०२० मध्ये कुणाल कामरा व अर्णब गोस्वामी हे एकाच विमानातून प्रवास करीत होते. प्रवासात कुणालने अर्णबला काही प्रश्न विचारले. पण अर्णबने प्रतिसाद दिला नाही. अर्णब भित्रा पत्रकार असे संबोधत कामराने व्हीडिओ व्हायरल केला. त्यानंतर त्या विमान कंपनीने कामराला सहा महिने प्रवासाला बंदी घातली होती.
कामराच्या पराक्रमाचे संसदेतही पडसाद उमटले. शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी कामराने माफी मागावी अशी मागणी केली. त्याचा एकही शो राज्यात होऊ देणार नाही, असे बजावले. त्याच्या डोक्याचा एक भाग रिकामा आहे, अशीही टीका केली. खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले की, आमच्या नेत्याची कोणी बदनामी करीत असेल तर आम्ही शांत कसे बसू? खरे तर कामराने त्याच्या विडंबन गीतातून नवीन काहीच सांगितले नाही. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड केल्यापासून उबाठा सेना व पक्षप्रमुख हे शिंदेंचा उल्लेख मिंधे व गद्दार असा सातत्याने करीतच आहे. एवढे करूनही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भरीव यश मिळवले. विधानसभेत शिंदे यांचे ५७ आमदार निवडून आले, तर उबाठा सेनेचे २० आमदार विजयी झाले. खरी शिवसेना कोणती व शिवसेनेचा प्रमुख कोण याचे उत्तर मतदारांनी निवडणुकीत दिले. मग कामरा हा, शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा गद्दार असा उल्लेख का करीत आहे?
ठाकरे सरकार सत्तेवर असताना तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पुणे, नाशिकवरून पोलिसांचा मोठा फौजफाटा कोकणात पाठवला होता. देशाचा कितवा स्वातंत्र्य दिन हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अचूक सांगता आले नाही, म्हणून राणे यांनी त्यांना जाहीरपणे फैलावर घेतले होते. त्याचा राग म्हणून नारायण राणेंना भरल्या ताटावरून उठवून अटक करण्याचे आदेश पोलिसांना कोणी दिले होते? तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि केंद्रीय मंत्र्यांचे विशेषाधिकार व राजशिष्टाचार महाआघाडी सरकारला आठवले नाहीत. ज्या नेत्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोकणात घराघरांत पोहोचवली, रुजवली आणि वाढवली त्या नेत्याचा अवमान करताना त्याने केलेल्या कार्याचा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ठाकरे सरकारला विसर पडला होता का? नंतर न्यायालयाने नारायण राणे यांची निर्दोष मुक्तता करून ठाकरे सरकारला चपराक दिली.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कामराच्या बिडंबन गीतावर सभागृहात पडसाद उमटले, तेव्हा स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठामपणे पुढे सरसावले, हे सर्व टीव्हीवरील थेट प्रक्षेपणातून महाराष्ट्राने बघितले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून, लेखणीतून व वाणीतून अनेकांना फटकारले, आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आपल्या लेखणीतून व वाणीतून पंडित नेहरू, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, स. का. पाटील यांच्यावर जोरदार हल्ले चढवले. अनेक मराठी कवींनी विडंबनातून राज्यकर्त्यांवर बोचरी टीकाही केली. पण त्यात कोणाची वैयक्तिक बदनामी नव्हती.
महाआघाडीचे सरकार सत्तेवर असताना कंगना रणावतच्या घरावर बुलढोझरची कारवाई केली होती. तेव्हा एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या प्रतिष्ठेचा विचार केला नव्हता का? त्यामागे केवळ सुडाची भावना होती का? अभिनेत्री केतकी चितळेने एक पोस्ट फॉरवर्ड केली तेव्हा महाविकास आघाडीच्या शिल्पकारांचा अवमान झाला म्हणून तिला दीड महिना जेलमध्ये एकाकी डांबले होते. विशेष म्हणजे, अटक वॉरंट नसताना तिच्यावर कारवाई केली. पोलिसांच्या वर्तनाविषयी तिची तक्रारही नोंदवून घेतली नव्हती. मुंबईतल्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर रेडिओ जॉकी मलिष्काने मुंबई, तुला बीएमसीवर भरंवसा नाय काय, हे विडंबनात्मक गाणे सादर केले तेव्हा त्याला अफाट प्रतिसाद मिळाला. तेव्हा मंत्रालयात व महापालिकेवर ठाकरेंच्या पक्षाची सत्ता होती.
मलिष्काच्या घरी महापालिकेच्या पथकाने धाड टाकली व तेथे झाडाच्या कुंडीत डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचा शोध लावला व कारवाई का करू नये म्हणून मलिष्काला नोटीस बजावली. मुंबईत मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार, असे जाहीर केले म्हणून तत्कालीन खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा या दोघांनाही महाआघाडी सरकारने १४ दिवस जेलमध्ये डांबले होते. कामराच्या गाण्याने खूश झालेले पक्षप्रमुख व त्यांच्या संवगड्यांना महाआघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य माहिती नव्हते का? ठाणे की रिक्षा, जनतेने मंत्रालयात पाठवली आहे, तिला कोणी हलक्यात घेऊ नये…