जयंत रानडे
सहस्रावधी वर्षांच्या भारताच्या इतिहासात सांस्कृतिकदृष्ट्या या दिवसाचे माहात्म्य खूप मोठे आहे. अशा वर्षप्रतिपदेला, दि. १ एप्रिल १८८९ला एका सामान्य वैदिक घराण्यात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म झाला. डॉक्टरांनी आपल्या सर्वस्व समर्पणातून पसायदानातील भाव जगभर प्रस्थापित करू शकणारा भारत उभा करण्यासाठी खूप दूरदृष्टीने रा. स्व. संघाच्या रूपाने जे कार्य उभे केले ते नीट जाणून घेणारी कोणतीही व्यक्ती, डॉक्टरांचे निधन झाले आहे हे मान्य करणार नाही. कारण आजही देश-विदेशात सहस्रावधी स्वयंसेवकांच्या जीवनातून त्याला डॉक्टर हेडगेवार यांचीच कमी-अधिक गुणात्मकतेची प्रतिबिंबे पाहावयास मिळत आहेत. असे भाग्य क्वचितच काही महापुरुषांना लाभते. डॉ. हेडगेवार यांना जन्मजात एकच वरदान लाभले होते ते म्हणजे ज्वलंत राष्ट्रभक्तीचे. व्हिक्टोरिया राणीच्या राजवटीला ६० वर्षे झाली म्हणून शाळेत मिठाई वाटण्यात आली असता, आठ वर्षांच्या केशवाने “तिची मिठाई खाण्यात आनंद कसला?” म्हणून ती कचरापेटीत फेकून दिली होती. १२ व्या वर्षी सातवे एडवर्ड यांच्या राज्यारोहणाच्या दिवशीही त्याने शासकीय आनंदोत्सवात भाग घेतला नाही. पुढे रिस्ले सर्क्युलरने तरुणांनी ‘राष्ट्रीय चळवळीत भाग घेऊ नये’ असा आदेश दिलेला असताना आणि ‘वंदे मातरम्’ घोषणेवर बंदी असताना नागपूरच्या नील सिटी हायस्कूलमध्ये शाळा तपासणीस आला असता ‘वंदे मातरम्’ हा जयघोष वर्गा-वर्गांतून घडविण्यात केशवचाच पुढाकार होता. पण यामागे कोण होते? हे दोन महिने शाळा बंद होऊनही कोणास समजले नाही. असे संघटन कौशल्य त्याने त्या वयातच सिद्ध करून दाखविले आणि जे केले ते योग्यच केले, या आग्रहामुळे पुढे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. पुढे केशवने डॉक्टर मुंजे यांच्या पाठिंब्याने कोलकात्यातील नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये १९१० साली प्रवेश घेतला. आपलेच काही देशबांधव स्वार्थासाठी फितुरी करून त्यांना पकडून देत व सामान्य जनता होणाऱ्या परिणामास घाबरून लांबच राहीले. स्वराज्य प्राप्तीच्या दृष्टीने ही एक मोठी कमतरता त्यांना आढळली. त्यामुळे लोकांत विशुद्ध राष्ट्रभक्तीची भावना स्थायी स्वरूपात जागृत करणे, त्यांच्यात अनुशासनबद्धता, नि:स्वार्थ वृत्ती जागविणे आणि राष्ट्रासाठी कणश: व क्षणश: झिजण्याची भावना निर्माण करणे खूप आवश्यक आहे, अशा निश्चयाकडे त्यांचे मन झुकू लागले होते. नागपुरात आल्यावर आपले काका आबाजी हेडगेवार यांना त्यांनी पत्रोत्तरातच कळवून टाकले होते, “जन्मभर अविवाहित राहून राष्ट्र कार्य करण्याचा मी निश्चय केला आहे.”
पुढील पाच-सात वर्षांत अनेक मार्ग त्यांनी चाचपून पाहिले. काँग्रेसच्या कार्यात पदाधिकारी म्हणून अनेक वर्षे त्यांनी पूर्ण झोकून कार्यही केले. ‘नागपूर नॅशनल युनियन’ ही जहाल विचारांची संस्था त्यांनी चालविली होती. राष्ट्रीय उत्सव मंडळ, भारत स्वयंसेवक मंडळ, अनाथ विद्यार्थी गृह अशा विविध मार्गाने ते प्रयत्न करीत होते. १९१९ मध्ये काँग्रेसने हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी खिलाफत आंदोलनास पाठिंबा दिला. याचा स्वराज्याशी काहीही संबंध नव्हता. डॉक्टरांनी आपले मतभेद स्पष्टपणे काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर नोंदविले होते. तथापि ते काँग्रेसपासून लगेच दूर झाले नाहीत. त्यांना मुसलमानांचे अनुनय हे राजकारण नुकसान करणारे वाटे. हिंदू-मुस्लीम ऐक्याविना स्वराज्य मिळणार नाही या विचाराला त्यांचा मुळातूनच विरोध होता. असहकार आंदोलनात त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. बंदी हुकूम झुगारून लावल्यामुळे आणि चिथावणीखोर भाषणे केल्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल झाला. त्यांना एक वर्षांची शिक्षा झाली. खटला झाल्यास बचाव करावयाचा नाही हा असहकार आंदोलनाचा एक नियम डॉक्टरांनी सपशेल झुगारून लावला. स्वतःच उलट तपासणीही करून पोलिसांची त्यांनी भंबेरी उडविली. त्यांचे बचावाचे भाषण ऐकून इंग्रज न्यायाधीशाने, “मूळ भाषणापेक्षा त्यांचे हे समर्थन अधिक राजद्रोहपूर्ण आहे,” असे उद्गार काढले.
मूलगामीस्वरूपाचे चिंतन
डॉक्टरांना या दीड तपाच्या कालखंडाने जीवनकार्याच्या वास्तविक चिंतनासच प्रवृत्त केले. आंदोलने होतात, पण त्यांचा जोम टिकून का राहत नाही? भली भली म्हणविणारी माणसेही स्वार्थी, दुटप्पी प्रवृत्तीची आणि उद्घोषित ध्येयवादाशी प्रतारणा करणारी का असतात? अनुशासनहीनतेचे प्रदर्शन आपल्या सार्वजनिक जीवनात एवढे ढळढळीतपणे का होते? मूठभर इंग्रज या देशावर सुखाने राज्य करूच कसे शकतात? आपल्या समाजाची अवनती झाली व गुलामी त्यांच्या नशिबी आली ती केवळ आक्रमकांच्या श्रेष्ठत्वामुळेच काय? भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला तरी त्याचे स्वातंत्र्य टिकून राहील याची शाश्वती काय? हिंदू-मुस्लीम एकतेचा ध्यास घेणे तसेच एका प्राचीन समाजाने उद्दाम अल्पसंख्याकांपुढे शरणागती पत्करणे हे राष्ट्रीय आंदोलनाला कितीसे पोषक आहे? इत्यादी अनेक प्रकारचे वादळ डॉक्टरांच्या अंतरंगात उठले होते. इतिहासाच्या व अनुभवाच्या प्रकाशात राष्ट्रीय प्रवृत्तीची चिकित्सा करण्यात त्यांचे मन गुंतले होते. एखादा निष्णात धन्वंतरी अवघड व जुनाट दुखण्याच्या मुळाशी जातो त्याप्रमाणे डॉक्टरांनी जो विचार चालविला होता तो मूलगामी स्वरूपाचा होता. रोगनिदान व त्यावरील मात्रा ते शोधत होते.
‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’चा सिद्धांत
हिंदूंनी संघटित होणे हाच हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या प्रश्नावरील एकमात्र तोडगा आहे, या निष्कर्षावर ते पोहोचले होते. तरुणांवर राष्ट्रीय संस्कार करणारे आणि गुणवत्तेवर भर देणारे कार्य करण्याची कल्पना त्यांचे मनात बळावत चालली होती. या सर्वांची परिणती म्हणजे ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा स्वयंसिद्ध सिद्धांत घेऊन १९२५मध्ये विजयादशमीला डॉक्टरांनी त्यांच्या सहवासातील दहा-पंधरा तरुणांना ‘आज आपण संघ सुरू करीत आहोत’असे सांगून संघाची सुरुवात केली. त्याचे सर्व पैलू सहकाऱ्यांशी संवाद, चर्चा करून आणि सर्वांच्या सहमतीने व अनौपचारिक पद्धतीने, हिंदूंच्या सांस्कृतिक परंपरेच्या प्रकाशात, कुटुंब पद्धतीच्या अंगाने ते विकसित करीत गेले. त्यात त्यांच्या विलक्षण प्रतिभेची झेप स्पष्ट पाहावयास मिळते. एक बीज जमिनीत गाडून घेऊन नष्ट होते. पण शेकडो बीजे असलेल्या फळांनी तो वृक्ष कालांतराने डवरतो. तितक्याच सहजतेने, संयमाने डॉक्टरांनी संघाची उभारणी केली. संघ प्रारंभापासून या देशातील सर्वानांच राष्ट्रीयदृष्ट्या हिंदूच मानतो. रुढार्थाने हिंदू समाजाच्या संघटनेस प्रारंभ केलेल्या संघाने १९८०च्या सुमारास भारतातील सर्वांनाच शाखेत प्रवेश दिला. त्यासाठी आपल्या तत्त्व व कार्यपद्धतीत कोणताही बदल केला नाही. परिणामी आता हळूहळू संघाच्या कार्यकर्त्यात अभारतीय संप्रदायांचाही सहभाग होऊ लागला आहे. आपल्या संघटनेचा गुरू म्हणून कोणाही व्यक्तीस मान्यता न देता तो मान भगव्या ध्वजास संघाने दिला आहे. ध्वजाला साक्षी ठेऊनच स्वयंसेवकांना हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचे संरक्षण या उद्दिष्टांचा स्पष्ट उल्लेख असलेली प्रतिज्ञा संघात संस्कार रूपाने दिली जाते.
गुरुपूजनाचे दिवशी आपापल्या शक्तीनुसार भगव्या ध्वजापुढे धन समर्पण करण्याची पद्धती संघाने सुरू केली, त्यातून संघ आपल्या आर्थिक गरजा भागवितो. ध्वज पूजन हेच प्रमुख. धन समर्पण गौण असाच संस्कार संघात दिला जातो. ‘आपण सारे हिंदू’ एवढ्याच आधाराने संघ हिंदू संघटन करतो, त्यामुळे प्रारंभापासूनच येथे जातीभेदाच्या भावना आढळत नाहीत. संघ केवळ हिंदू संघटनाचे कार्य करतो व संस्कारित स्वयंसेवक अनेक संघटनाद्वारे अनेक समस्यांचे निराकरण करीत आहेत. तथापि त्यांच्या संघटना पूर्ण स्वायत्त आहेत. राजकीय माध्यमातून हिंदू संघटनेचे कार्य होऊच शकणार नाही म्हणून संघ दैनंदिन राजकारणापासून पूर्णतः अलिप्त आहे. पण संघातले स्वयंसेवक त्यांच्या इच्छेनुसार संघकार्यास बाधक होणार नाही, अशा प्रकारे कोणतेही कार्य करू शकतात. तथापि कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी संघात पदाधिकारी असू शकत नाही. राष्ट्राची सेवा करण्यासाठी स्वयंप्रेरणेनेच पुढे आलेले लोक अशी डॉ. हेडगेवार यांनी संघाची व्याख्या केली आहे. ‘स्वयंसेवक’या शब्दाला आपल्या गुणात्मकतेमुळे संघाने एक विशेष आशय प्राप्त करून दिला आहे. जो समाजानेही अनुभविला आहे. हे संघाच्या कार्यपद्धतीतूनच घडले आहे.