Tuesday, April 1, 2025
Homeक्रीडाIPL 2025IPL 2025: गुजरात टायटन्सने खोलले विजयाचे खाते, मुंबईला ३६ धावांनी नमवले

IPL 2025: गुजरात टायटन्सने खोलले विजयाचे खाते, मुंबईला ३६ धावांनी नमवले

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ९व्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला ३६ धावांनी पराभूत केले. २९ मार्चला खेळवण्यात आलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी १९७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र त्यांना २० षटकांत ६ बाद १६० धावाच करता आल्या. मुंबई इंडियन्सने सलग दुसरा सामना गमावला आहे. तर गुजरात टायटन्सचा हा पहिला विजय आहे.

या हंगामात दोन्ही संघाची सुरूवात चांगली राहिली नव्हती. गुजरात टायटन्सने आपला पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध ११ धावांनी गमावला होता. तर मुंबईला चेन्नई सुपर किंग्सच्या हातून ४ विकेटनी पराभव सहन करावा लागला होता.

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात खराब राहिली. पहिल्याच षटकांत त्यांनी रोहित शर्माला स्वस्तात गमावले. सिराजने रोहितची विकेट घेतल्यानंतर रयान रिकेल्टनलाही बोल्ड केले. यामुळे मुंबईची धावसंख्या २ बाद ३५ इतकी झाली. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र तिलक वर्मा सेट झाल्यानंतर मोठा शॉट मारण्याच्या नादात बाद झाला.

तिलक वर्माने ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३६ बॉलमध्ये ३९ धावा केल्या. रॉबिन मिंजही काही खास करू शकला नाही. मिंज बाद झाल्यानंतर मुंबईची धावसंख्या चार बाद १०८ इतकी होती. येथून सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यावर वेगाने धावा करण्याची जबाबदारी होती. मात्र दोन्ही महत्त्वाचे खेळाडू मोक्याच्या क्षणी बाद झाले. सूर्यकुमारने चार षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २८ बॉलमध्ये ४८ धावा केल्या. हार्दिकला केवळ ११ धावा करता आल्या.

तत्पूर्वी, गुजरात टायटन्सची सुरुवात दमदार झाली. कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शनने मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. पहिल्या ६ षटकांत गुजरातने ६६ धावा केल्या होत्या. मुंबईला पहिले यश हार्दिक पांड्याने मिळवून दिले. त्याने गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला बाद केले. शुभमनने २७ बॉलमध्ये ३८ धावा केल्या. यात चार चौकारांशिवाय एका षटकाराचा समावेश होता. शुभमन आणि सुदर्शन यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. गिल बाद झाल्यानंतर बटलर क्रीझवर उतरला आणि त्याने सुदर्शनसह मिळून दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावा केल्या.

जोस बटलरने पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २४ बॉलमध्ये ३९ धावा केल्या. बटलरला स्पिनर मुजीर उऱ रहमानने बाद केले. बटलर बाद झाल्यानंतर सुदर्शनने अर्धशतक पूर्ण केले. सुदर्शनने पंजाब किंग्सविरुद्धही अर्धशतकी खेळी केली. यातच गुजरात टायटन्सने शाहरूख खानला स्वस्तात गमावले. येथून गुजरातने तीन बॉलवर तीन विकेट गमावले. शेवटच्या षटकांमध्ये सातत्याने विकेट पडल्याने गुजरातला २००चा आकडा गाठता आला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -