Thursday, April 10, 2025
Homeताज्या घडामोडीGudi Padwa 2025 : परंपरेचा ढोल निनाद…!

Gudi Padwa 2025 : परंपरेचा ढोल निनाद…!

मुंबई (मानसी खांबे) : गुढीपाडव्याची चाहूल लागली की, गिरणगावातील कौलारू चाळींमध्ये वाजंत्रींच्या सरावाचा नाद निनादू लागतो. दोन – तीन मजली चाळींची जागा आता गगनचुंबी इमारतींनी घेतली असली तरी ढोल-ताशांची पारंपरिक पथके आजही येथे तितक्याच दिमाखात टिकून आहेत. गुढीपाडव्याला मुंबईतील गल्लीबोळात वेगळाच माहोल असतो. हिंदू नववर्षा निमित्त ठिकठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी, येसूबाई, सईबाई, राम, लक्ष्मण, सीता यांसह महापुरुषांच्या वेशभूषा करून अनेक जण या शोभायात्रांमध्ये सहभागी होतात. काही जण दुचाकीवरून रॅली काढतात.

गिरगाव, विलेपार्ले, मुलुंड, डोंबिवली येथील शोभायात्रा लक्ष वेधून घेतात. नऊवारी साडी नेसून नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, गळ्यात ठुशी, बोरमाळ असा पारंपरिक शृंगार केलेल्या मुली आणि कुर्ता, धोतर, कपाळी चंद्रकोर आणि पायात कोल्हापुरी चप्पल, डोक्यावर फेटा असा पेहराव केलेल्या मुलांचे ढोलवर पडणारे हात पाहण्यासाठी गर्दी होते. अगदी लहानगे, चिमुरडे यांचा उत्साहही शिगेला पोहोचलेला असतो. एका तालात वाजणारे ठेके, त्यावर थिरकणारी पावले, सेलिब्रिटींची उपस्थिती असा नजर उतरवण्यासारखा हा सोहळा असतो. या शोभायात्रांमध्ये सहभागी होणारी पथके आपल्यातील कलात्मकता दाखवण्यासाठी सज्ज झाली आहेत. ही पथके इंद्रजीमी, कोळी ट्यून, यळकोट यळकोट, जय मल्हार या मराठमोळ्या गाण्यांवर वादन करतात. दिवसभर ढोल, ताशा, लेझीम यांचा आवाज दुमदुमून जातो.

डमी शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर सीबीएसई घालणार आळा

कुर्ला पश्चिम येथील ‘महाराजा’ हे नावाजलेले ढोल-ताशा पथक’ आहे. दरवर्षी हे पथक वेगवेगळ्या संकल्पना घेऊन सादरीकरण करते. यंदा त्यांची थीम छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी दिलेलं योगदान या संदर्भात आहे. या ढोल-ताशा पथकाच्या मुखपृष्ठावर छत्रपती संभाजी महाराजांचे छायाचित्र लावण्यात येणार आहे. “सिंहाच्या जबड्यात घालुनी हात, मोजती दात, जात मराठ्याची… पाहा चाळूनी पाने पाने, आमुच्या इतिहासाची” या घोषवाक्यासह पथकाच्या फलकावर असे छायाचित्र लावले जाणार आहे. महाराजांच्या धाडसाचा इतिहास शोभायात्रेच्या निमित्ताने आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट हाती घेऊन ही थीम ठरवल्याचे पथकप्रमुख राजेश पटेल यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास, त्यांनी केलेले शौर्य, पराक्रम, त्यांचे विचार तसेच गडकिल्ल्यांची माहिती आणि त्याचे संवर्धन आताच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा पुढाकार महाराजा पथकातील तरुणांनी घेतला असून वादनाच्या ढोलवर याबाबत संदेश लिहिला जाणार आहेत. चुकीच्या पद्धतीने महाराजांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचू नये. लोकांना खरा इतिहास कळवा. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे किती शौर्यवान आणि बुद्धिमान होते. स्वराज्यासाठी त्यांची भूमिका काय होती, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या थीमप्रमाणे यंदा गाण्याची निवड केली जाणार आहे. हा धाडसी इतिहास ढोलच्या तालावर प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभा करणार असल्याचे महाराजा पथकाचे सभासद धनंजय दळवी यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -