
मुंबई : सांताक्रूझ येथील ३२ वर्षीय महिलेला जादूटोण्याचा प्रभाव दूर करण्याच्या बहाण्याने एका तांत्रिकाने (Bhondu Baba) ३.४७ लाख रुपयांना गंडा घातला. पीडित महिलेची ओळख या तांत्रिकाशी इन्स्टाग्रामद्वारे झाली होती. तिच्या प्रियकरावर दुसऱ्या मुलीने 'करणी' केली असल्याचे सांगत तांत्रिकाने विविध विधींसाठी या महिलेकडून पैसे उकळले. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पीडित महिलेची २०२४च्या ऑक्टोबरमध्ये एका युवकाशी ओळख झाली होती. हा युवक मूळचा उत्तर प्रदेशचा असून ठाण्यात राहतो. तक्रारदार महिलेच्या मते, या ओळखीचे पुढे प्रेमात रुपातर झाले. पुढे जेव्हा जेव्हा ती आपल्या प्रियकराला भेटायची, तेव्हा तो तिच्यासमोर फोन कॉल्स टाळायचा, त्यामुळे तिला त्याच्यावर अफेअर असल्याचा संशय आला.

मुंबईतील पहिला 'एलिव्हेटेड नेचर वॉक' सज्ज मुंबई : मलबार हिल येथील पहिल्या 'एलिव्हेटेड नेचर वॉक'चे उद्घाटन ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आमदार मंगल ...
याच संशयाच्या भूताने पछाडलेल्या या महिलेने, जानेवारी २०२५ मध्ये एका ज्योतिषीचा इन्स्टाग्रामवरील स्टोरी पाहिली. तो फक्त २५१ रुपये शुल्क घेऊन वैयक्तिक जीवन, नातेसंबंध आणि करिअरविषयी अचूक माहिती देतो, असा दावा करत होता.
महिलेने आपल्या प्रियकराची माहिती त्या ज्योतिषी-कम-तांत्रिकाला दिली. त्याने सांगितले की, तिच्या प्रियकरावर काळ्या जादूचा प्रभाव आहे आणि तो दूर करण्यासाठी काही विशिष्ट विधी करावे लागतील. हळूहळू तांत्रिकाने वेगवेगळ्या विधींसाठी एकूण ५३ व्यवहारांमध्ये तिच्याकडून ३.४७ लाख रुपये घेतले.

मुंबई : उन्हाच्या झळांमधून काही प्रमाणात दिलासा मिळत, भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) पुढील आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ...
तांत्रिकाने पुढे राजस्थानला येऊन होम-हवन आदी मोठ्या पूजेसाठी बोलावले, मात्र महिलेने जाण्यास नकार दिला. त्यानंतर तांत्रिकाने मुंबईत येण्याचे आश्वासन दिले, पण अनेक दिवस झाले तरी तो आला नाही. तसेच तिच्या प्रियकराच्या वागण्यात काहीही फरक पडत नसल्याने अखेर तिला फसवणुकीचा संशय आला. तिने वाकोला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
वाकोला पोलिसांनी भा.द.वि.सं. आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली तांत्रिकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.