Friday, April 18, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यबिवळा (गवताची मुडी)

बिवळा (गवताची मुडी)

रवींद्र तांबे

कोकणात भातयान गवतामध्ये धान्य बांधून ठेवण्याची ही जुनी पद्धत आहे. संध्या क्वचित शेतकऱ्याच्या घरामध्ये बिवळे दिसतील. यामध्ये धान्य उबदार राहतात. मी लहान असताना पेरणीच्या वेळी माझे वडील बिवळा फोडायचे. त्या आधी ते भातयान गवताची मळणी झाल्यावर त्या मळलेल्या गवताचा बिवळा बांधत असत. भात बिवळ्यात ठेवल्यामुळे वाळवी लागत नाही. तसेच त्यातील भात पेरणीच्या वेळी पेरले जाते. भात उबदार राहिल्याने सर्व भात रुजून येते. त्याचे मुख्य कारण म्हणजे बिवळा होय. सध्या नवीन पिढीला बिवळ्याविषयी फारशी माहिती नाही. रेशनिंगवरचे गहू आणि तांदूळ आणायचे आणि आपली उपजीविका करायची तसेच आठवडा बाजाराला जाऊन कमी पडत असेल, तर जीवनावश्यक वस्तू घेऊन यायचे. शेतकरी आणि बिवळा याचे नाते अतूट आहे. बिवळा बांधून झाल्यावर बिवळा फोडेपर्यंत त्याची काळजी शेतकरी घेत असतात. महत्त्वाची बाब म्हणजे घरात ठेवलेल्या बिवळ्याला पाणी लागणार नाही तसेच तेलाचा दिवा जवळ असणार नाही याची दक्षता घेतात. म्हणजे आपल्या मुलाप्रमाणे शेतकरी बिवळ्यांची काळजी घेत असतात. बिवळा बांधणे हे सुद्धा एक प्रकारे कसब असावे लागते. माझे वडील उत्तम प्रकारे बिवळे बांधायचे. सांगव्याचे मावशेसुद्धा उत्तम प्रकारे बिवळे बांधत असत. मी त्यांच्या सांगवे गावी गेल्यावर मावशे म्हणायचे, बाबू बघ मावशेन किती भात पिकवल्यान त्याचे बिवळे बघ. त्यात तांदळाचो बिवळे व भाताचो बिवळो त्याला पान लावून ठेवायचे म्हणजे कोणत्या बिवळ्यात काय आहे हे चटकन समजले जायचे. त्याच बरोबर माझे आबामामा माझ्या आयनल गावी आल्यावर कधी कधी दुपारचे जेवन होईपर्यंत बिवळा बांधत असत. इतकेच नव्हे, तर वागदे गावचे हडकर मामासुद्धा उत्तम प्रकारे बिवळे बांधायचे. त्यांना काही पावणेपयेसुद्धा बिवळे बांधण्यासाठी घेऊन जात असत. आज यातील आपल्यात कोणीही नाही; परंतु बिवळा बांधताना त्यांना मी जवळून पाहिले आहे. त्यासाठी कंबर मजबूत असावी लागते. मधे एक पाय ठेवून त्याला गोलाकार आकार द्यावा लागतो. तो सुद्धा एका दमात. त्याप्रमाणे दोरी बांबूने ठोकून घट्ट करीत वरती एकत्र गवत करावे लागते. म्हणजे त्याला गोलाकार आकार प्राप्त होतो. उन्हाळ्यात आयेबरोबर आजोळी गेल्यावर मी बिवळ्यावर बसायचो. मोठी मामी म्हणायची बाबू, बिवळो पडात हा.

कधी कधी मामीची नजर चुकवून बिवळ्यावर चडून मी खाली उडी मारायचो. हा आनंद काही वेगळाच असायचा. महत्त्वाची बाब म्हणजे कोकणात धान्य साठवून ठेवण्यासाठी गवताची मुडी बांधली जात असे त्याला कोकणात ‘बिवळा’ असे म्हणतात. नवीन पिढीला बिवळा अर्थात गवताची मुडी म्हणजे काय? बिवळा कसा तयार केला जातो? बिवळा कसा असतो? बिवळा कुठे ठेवला जातो? आतमध्ये धान्य कसे ठेवण्यात येते? याची कल्पना नाही. त्यासाठी भातयान गवताची आवश्यकता असते. भात झोडून झाल्यावर त्याची मळणी घातली जाते. त्यामुळे बैलाच्या पायाने गवताची काडी लवचिक होते. तसेच गवताचे काड्या एकमेकात गुंतल्यामुळे त्याची दोरी विणणे सुद्धा खूप सुलभ जाते. विणलेली दोरी बिवळ्याभोवती फिरवून बांधल्यामुळे बिवळ्याला मजबुती येते. यामुळे धान्याचा एक कणसुद्धा बाहेर पडत नाही. यासाठी कात्याची दोरी चारी बाजूने चार बोटांच्या अंतरावर गुंडाळली जाते. आजच्या व्हीआयपी बॅगपेक्षा अधिक आकर्षित बिवळा दिसायचा. घरात बिवळा असल्यामुळे घर कसे भरल्यासारखे वाटायचे. बिवळा हीच आपली संपत्ती असे शेतकरी दादा म्हणायचे. तेव्हा आजोळी गेल्यावर बाबूमामा मला म्हणायचे बाबू बिवळ्यावर बस मात्र बिवळ्याक पाय लावू नको. इतकी शिस्त बाबूमामाकडे होती.
बिवळा बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नसते. त्याचो ‘बाप’ करायचो ना, तेव्हा आता त्याचो ‘पोर’ करता असे लोक म्हणायचे. हल्ली लोकांनी शेती करायची सोडून दिल्याने आता बिवळा इतिहास जमा होणार काय असा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रश्नाचे उत्तर आपणा सर्वांना शोधावे लागेल. कारण आपला देश हा शेतीप्रधान आहे. आजही शेती हेच उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. तेव्हा शेतीच्या लागवडी खालील क्षेत्रात वाढ करावी लागेल. कोकणात जवळ जवळ चाळीस वर्षापूर्वी पावसाळा जवळ आल्यावर तांदूळ, नाचणी, वरी, कुळीद, हरिक तसेच पेरणीसाठी भात उबदार राहण्यासाठी भातयान गवताचा बिवळा बांधला जात असे.

आता जसे कापडी गोण्या, स्टीलच्या टाक्या, प्लास्टिक ड्रम आहेत तसे त्यावेळी नव्हते. बऱ्याच वेळा पिकलेले धान्य घरातील पडवीच्या एका कोपऱ्यात ओतून ठेवले जात असे. त्यामुळे घरातील कोंबडी-कुत्री त्यावर बसत असत. तसेच घर शेणाने सारविलेले असल्याने बऱ्याच वेळा वाळवी लागणे तसेच उंदीर नासधूस करायचे त्यामुळे भाताचे अथवा धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. तेव्हा हे सुरक्षित व उबदार राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेतलेला केवळ अनुभवाच्या जोरावर भातयान गवताची मुडी अर्थात बिवळा बांधला जात असे. तेव्हा कोकणातील धान्य साठवण करण्याची पारंपरिक पद्धत असल्याने पर्यटन जिल्ह्याच्या दृष्टीने बिवळा अतिशय महत्त्वाचा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -