खेड: मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या दोन्ही बोगातून ऐन उन्हाळ्यात गळती सुरू झाली आहे. दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका बोगद्यातील गळती थोपा थोपवण्याचा राष्ट्रीय महामार्गाचा प्रयत्न फोल ठरला असून नुकताच सुरू झालेल्या दुसऱ्या बोगद्यातून देखील पाण्याची गळती सुरूच आहे.
बोगद्यातील कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करुनही गळती थांबता थांबेना झाल्या आहेत. गळती रोखण्यासाठी ‘प्रकटींग’चा अवलंबही फोलच ठरल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे बोगद्यातून प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांचा प्रवास हा रखडतच राहणार असून दोन्ही बोगधात ठिकठिकाणी लागलेल्या या गळतीने वाहनचालकांच्या गतिमान प्रवासात ‘विघ्न’ निर्माण झाले आहे.
बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ग्राऊंटींगचा अवलंब केला. यासाठी २० हजाराहून अधिक सिमेंट बंगांचा वापर केल्यानंतर गळती थोपवण्यात यश आल्याचा दावाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून केला जात होता. मात्र बोगद्यात गळतीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे महामार्ग खात्याची डोकेदुखी वाढली आहे.