उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील चीटफंड घोटाळ्याप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.श्रेयससोबत अन्य १४ जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही श्रेयसविरोधात तक्रार दाखल झाली होती.
श्रेयस तळपदेने केल प्रमोशन
लोणी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही कंपनी गेल्या १० वर्षांपासून अस्तित्वात आहे. अनेक गावकऱ्यांनी या कंपनीत गुंतवणूक केली. अनेक लोकांनी २० हजार ते ३ लाखापर्यंत पैसे गुंतवले. ३० गावकऱ्यांनी या कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. गावकऱ्यांना पैसे दुप्पट करुन मिळेल असं आश्वासन देत कोटी रुपये घेऊन कंपनी पसार झाली. या कंपनीचं प्रमोशन अभिनेता श्रेयस तळपदे करत होता. त्यामुळे आता त्याच्याही विरोधात महोबातील श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सध्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
४१९ आणि ४२० अंतर्गत तक्रार दाखल
याआधी फेब्रुवारीमध्ये, लखनऊमध्ये गुंतवणुकदारांची ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल श्रेयस आणि ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. ही तक्रार गोमती नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. यापूर्वी, दोन्ही अभिनेत्यांचे नाव हरियाणातील सोनीपत येथील एका मल्टी-लेव्हल मार्केटिंग फसवणुकीच्या प्रकरणातही होते, त्यात श्रेयससह इतर अनेकांचे नाव होते. श्रेयसने त्याच्यावरील आरोपांबद्दल अद्याप कोणतेही सार्वजनिक विधान केलेले नाही. अभिनेता श्रेयस तळपदे सोबत समीर अग्रवाल, पत्नी सानिया, आर.के. शेट्टी, संजय मुदगिल, ललित विश्वकर्मा, डालचंद कुशवाहा, सुनील विश्वकर्मा, सचिन रैकवार, कमल रैकवार, सुनील रैकवार, महेश रैकवार, मोहन कुशवाहा, नारायण सिंह राजपूत आणि जितेंद्र नामदेव यांच्याविरोधात कमल ४१९ आणि ४२० अंतर्गत तक्रार दाखल झाली आहे.