Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यसोन्याची खरेदी हॉलमार्क तपासूनच करायची...

सोन्याची खरेदी हॉलमार्क तपासूनच करायची…

सुमिता चितळे : मुंबई ग्राहक पंचायत

गुढीपाडवा आता काही दिवसांवर आला आहे. त्यानंतर लग्नसराईही सुरू होईल. या दोन्ही प्रसंगी सोने खरेदीचे प्रमाण खूपच वाढते. भारतीय कुटुंबात सोन्याची मागणी आणि सोने खरेदीचा प्रभाव एवढा आहे की, आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी, मंगल कार्याला आणि सणासुदीला सोने खरेदी होतेच. याचे कारण थोडे धार्मिकही आहे कारण सोन्याकडे लक्ष्मी म्हणूनही पाहिले जाते. सणाला ती आपल्या घरी यावी हीच सर्वांची इच्छा असते. याशिवाय काही जण भविष्यासाठी तरतूद किंवा गुंतवणूक म्हणूनही सोन्याची नाणी खरेदी करतात, अगदी सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत तरीही.

आपल्याला माहितीच आहे की, सोन्याचे दागिने खरेदी करताना आता त्यावर हॉलमार्क असणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे आपण हॉलमार्क असलेलेच दागिने विकत घेतो. सोन्याच्या दागिन्यावरचा हॉलमार्क BIS (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स – भारतीय मानक प्राधिकरण) ही ग्राहक संरक्षण मंत्रालयाची संस्था प्रमाणित करते. हा हॉलमार्क म्हणजे त्यात तीन गोष्टींचा समावेश असतो. BIS चे चिन्ह, सोने किती कॅरेटचे आहे ती संख्या आणि HUID (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन डिजिट). HUID म्हणजे कोणतीही संख्या आणि अक्षर यांचे मिश्रण असलेला कोड नंबर आणि तो सोन्याच्या प्रत्येक दागिन्यासाठी वेगळा असतो. अँड्रॉइड फोनवर, प्ले स्टोअरमध्ये जाऊन BIS Care App ॲप डाउनलोड केल्यावर त्यात verify HUID नंबर टाकला की, दागिन्याची सर्व माहिती आपल्याला दिसते. उदा. ज्वेलर्स रजिस्ट्रेशन नंबर, हॉलमार्किंग केंद्राचे नाव / पत्ता, दागिन्याचा प्रकार, हॉलमार्किंगची तारीख, दागिन्याची शुद्धता इत्यादी. नवीन नियमानुसार हॉलमार्किंग केलेल्या २ ग्रामपेक्षा जास्त वजनाच्या दागिन्यावर व कलाकृतीवर हॉलमार्क आवश्यक आहे.

कोणताही दागिना मग तो दागिना एखादी अंगठी असो किंवा मोठा चपलाहार, हॉलमार्किंग करण्यासाठी अगदी मामुली खर्च येतो. प्रति दागिन्यांसाठी फक्त ४५ रुपये+जी.एस.टी. शुल्क आहे. तसेच चांदीच्या प्रति दागिन्यांसाठी ३५ रुपये+जी.एस.टी. शुल्क आहे. दागिन्याच्या वजनाप्रमाणे याची किंमत वाढू शकते. वेगळे होणाऱ्या दागिन्यातील प्रत्येक भागावर स्वतंत्र हॉलमार्क असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ कानातील टॉप आणि त्याची फिरकी किंवा चेन आणि पेंडन्ट, दोन्हींवर वेगळा हॉलमार्क असणे आवश्यक आहे. या हॉलमार्किंगमुळे ग्राहकाचा एक मोठा फायदा होतो तो म्हणजे आपलं सोनं किती कॅरेटचे आहे ते कळते आणि ते मोडून त्याचा नवीन दागिना करताना सोनार आपल्याला फसवून त्याच्यातून घट कापून घेऊ शकत नाही आणि जेवढ्या कॅरेटचा तो दागिना आहे तेवढा मोबदला आपल्याला पूर्णपणे मिळतो. अशा प्रकारे आपली सोन्याची खरेदी ही पैशाचा पूर्ण मोबदला देणारी होते. म्हणूनच आपण हा हॉलमार्क सोनाराकडून दागिने घेताना नीट पारखून तपासून घेतला पाहिजे. पूर्वीचा आपला सोन्याचा दागिना ज्याच्यावर हॉलमार्किंग नाही, तो सुद्धा आपल्या एखाद्या जवळच्या BIS सेंटरवर जाऊन त्याचं प्रमाणीकरण आपण करून घेऊ शकतो. त्या दागिन्याच्या फोटोसकट सगळ्या माहितीचे सर्टिफिकेट आपल्याला ही संस्था देते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर हॉलमार्क हे आपल्या दागिन्यांचं आधार कार्ड आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आधार कार्डप्रमाणेच त्यात त्या दागिन्याची सर्व माहिती असते.

राजपत्रातील अधिसूचनेनुसार ३१ मार्च २०२३ नंतर कोणताही सोनार सोन्याचे दागिने किंवा कलाकृती अधिकृत HUID शिवाय आणि हॉलमार्कशिवाय विकू शकत नाही. बेकायदेशीर किंवा बनावट हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली तर तो गुन्हा ठरतो. दागिन्यावरचा हॉलमार्क आपण सोनाराकडून भिंग घेऊन नीट पारखून तपासून घेतला पाहिजे. कारण अलीकडेच BIS च्या मुंबई येथील अधिकाऱ्यांनी बदलापूर येथे एका सोनाराच्या दुकानावर धाड टाकून २५१.३९० ग्रॅमचे सोने जप्त केले, ज्यावरील हॉलमार्क बनावट होता आणि त्या दागिन्यांचा HUID कोडही नव्हता. या सोन्याची किंमत सुमारे २१ लाख होती. भारतीय मानांकन संस्थेच्या २०१६ च्या कायद्यानुसार या सोनाराविरुद्ध फौजदारी तक्रार करण्यात आली. गुन्ह्याची शिक्षा म्हणून वरील सोनाराला कारावास किंवा एक लाख रुपयांपेक्षा जास्त दंड किंवा विक्री करण्यात येणाऱ्या सोन्याच्या किमतीच्या पाच पट दंड अशी वाढवून यापैकी कोणतीही शिक्षा न्यायालय देऊ शकते.

वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल सोन्याचा दागिना किंवा कलाकृती घेताना आपली फसवणूक होऊ न देणे किती गरजेचे आहे ते. त्यासाठी आपण सोनाराकडून हॉलमार्क असलेला दागिना घेतला, या विश्वासात न राहता प्रत्यक्ष भिंग घेऊन (जे सोनाराकडे असणे कायद्याने बंधनकारक असते), त्याने प्रत्येक दागिन्याचा हॉलमार्क ‘BIS Care App ॲप’ वर टाकून तपासायला हवा. बदलापूर येथे जप्त केलेल्या सोन्यावरून आपल्याला हे समजले असेल की, दागिन्यांवर कोरलेला हॉलमार्कसुद्धा बनावट असू शकतो. तसेच सोन्याचे वजन करताना त्याचा डिजिटल काटा (जो काचेच्या छोट्या चौकटीत असतो) तो वजन करताना बंद असायला हवा. त्यावर बाहेरील वाऱ्याचा दाब पडता कामा नये. सोने हा अतिशय मौल्यवान धातू असल्यामुळे ग्राहकांचे एक-दोन ग्रॅम सोन्याचा जरी फरक पडला तरी कित्येक हजारांचा फटका त्याला बसतो. त्यामुळे सोन्याची खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये म्हणून ती सजगतेने आणि आपल्या नेहमीच्या विश्वासू सोनारांकडूनच करायला हवी. सोनाराकडे घडणावळ कमी आहे किंवा अशा प्रलोभनांना बळी न पडता सोन्याची खरेदी सावधगिरीने करू या. गुढीपाडव्याच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा !

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -