आता महाशून्याचिया डोही |
जे गगनासीचि ठावो नाही |
तेथ तागा लागेल काई |
बोलाचा या ॥ ६.३१५॥
आता परब्रह्मरूपी डोहात, जिथं आकाशाचाच थांग लागत नाही, तिथं या शब्दरूपी होडी ढकलण्याच्या काठीचा लाग लागेल काय? अशी आत्मस्थिती अक्षरात सापडणं अशक्य. शब्दातीत आहे. शून्य म्हणजे पूज्य! महाशून्य वेगळं आणि परमपूज्य वेगळं. शून्य म्हणजे काहीही नाही, पण तेच एखाद्या संख्येला अनंताचा बोध करते. शून्याच्या संगतीमुळे संख्येच्या किमतीत होणारा बदल नेहमीच आनंददायी असतो! शून्य म्हणजे ‘काही नाही.’ शून्य म्हणजे ‘ख’ म्हणजे अवकाश. काही काळापूर्वी युरोपात ‘शून्य म्हणजे सैतानानं उत्पन्न केलेली गोष्ट’ अशी समजूत होती. पंधराव्या शतकात एका फ्रेंच शास्त्रज्ञानं म्हटलं होतं, ‘ज्याप्रमाणे गाढवाला सिंह करायचं होतं किंवा माकडीणीला राणी व्हायचं होतं, तसा शून्यानं अंकाचा आव आणलाय.’ शून्य हे तटस्थ स्थान दर्शवतं. महाशून्याचा अर्थ जिथं आदी ना अंत आहे, ना रूप ना गंध आहे, न इच्छा न अनिच्छा. जिथं जन्म नाही, मृत्यूही नाही. केवळ अनंत आकाश आहे तिथं प्रकाश नाही, अंधार नाही! जन्म-मृत्यूच्या पलीकडे, महाशून्यात सारे विलीन होतं, ते अज्ञात आहे. अमर्याद आहे. त्याला आरंभ नाहीये, अंतही नाहीये अशा डोहात बुडणं हीसुद्धा एक अवस्था आहे. पूर्णातून पूर्णाची निर्मिती झालीय. ते अरूप, अदृश्य आहे. गुरू साकार होतो तेव्हा तो हे ज्ञान देण्यासाठीच!
अनेकजन्मसंप्राप्त
सर्व कर्मविदाहिने |
स्वात्मज्ञानप्रभावेण
तस्मै श्री गुरवे नम: ॥ ७३॥
आपल्या आत्मज्ञानाच्या प्रभावानं जन्मोजन्मी साठवलेल्या सर्व संचित कर्मांचं भस्म करणाऱ्या श्रीगुरूला नमस्कार असो. गुरू म्हणजे प्रखर आत्मज्ञानाचं तेज! अग्नी जसा सर्व ओली-सुकी लाकडं वगैरे सर्व काही जाळून टाकतो, तसा गुरू सामर्थ्यवान असतो. गुरुकृपेनं भक्ताची संचित कर्मं भस्म होतात. नाश पावतात. कर्मफळं भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. प्रारब्ध कुणाला टाळता येत नाही. गुरूही कुणाच्या प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही. गुरुप्रसादानं सारे भोग सहन करण्याचं सामर्थ्य लाभतं. अपरिपक्व साठवलेल्या कर्मफळांना संचित म्हणतात. गुरुभक्तीनं भक्त साऱ्या संचित कर्मातून मुक्त होतो. एवढंच नाही, सारा परिवारच मुक्त होतो.
कर्मयोग! हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. अर्थ आहे कर्म करण्याचं कौशल्य आणि संन्यास म्हणजे कर्माचा संन्यास. कर्मात भेद असतो. कर्ता, कर्म आणि फल हे द्वैत सर्वमान्य आहे. हा भेद अविद्याकृत भ्रमविषय आहे. निष्कामता अंगी बाणवली की त्यात मन गुंतत नाही. नित्य विहित कर्म सदाचारधर्म ठरतो. अकारण चांगलं वागणं यातून निष्काम कर्मयोग साधला जातो. हाच परमार्थ. अपेक्षा न ठेवता केलेलं काम. त्याचं फळ मिळतंच, मग मागायचं कशाला? आत्मसाक्षात्कारानं आत्मस्वरूपाचा बोध होतो. परमात्मस्वरूपाचा भाव कायम राहतो. त्याही अवस्थेत व्यावहारिक जीवन जगताना ‘केवल अद्वैत आनंदात माणूस राहतो. जगासाठी झिजत राहतो. संत होतो.’ अखंड अभ्यासानं एकाग्रता वाढल्यानं गुरूशी अनुसंधान कधी तुटत नाही. मनाचा मनाशी संवाद होत राहतो. एका दोह्यात कबीरजी म्हणतात,,
काम बिगाडे भक्ति को |
क्रोध बिगाडे ज्ञान |
लोभ बिगाडे त्याग को |
मोह बिगाडे ध्यान ॥
अर्थ गहन आहे. गंभीर आहे, पण समजू शकतो. मनात कामभावना असेल तर भक्ती होत नाही. राग वारंवार येत असेल तर ज्ञान मिळत नाही. त्याग करायचा असेल तर लोभात गुंतून तो होत नाही आणि ध्यान करायचं असेल तर कुठलाही लोभ धरून ते होत नाही. हीच शिकवण त्यांनी आपल्या मुलास – त्याचं नाव कमाल आणि मुलगी कमाली हिला दिली होती. आधीच्या एका लेखांकात तिच्या श्रेष्ठत्वाचा दाखला दिलाय. जाता जाता मुलाबद्दलही सांगायला हवंय. मुलगासुद्धा साक्षात्कारी संत होता. संतमताच्या प्रसारासाठी, कबिरांच्या आज्ञेनं तो तीर्थयात्रेस गेला होता. गुजरातमधील संत दादू दयाल यांच्या गुरुपरंपरेत त्याचा समावेश केल्याची नोंद आहे. त्याच्या काव्यात महाराष्ट्राचा, मुख्यत: पंढरपूरचा उल्लेख आहे. गुरु-शिष्यांच्या अशा अनेक गाथा या सदरात पुढे येतीलच. कमालनं म्हटलंय,
राजा रंक दोनो बराबर |
जैसे गंगाजल पानी |
कहत कमाल सुनो भाई साधू |
यही है हमारी बानी ॥
असं म्हणतात की, कबिरांचा उत्तराधिकारी म्हणून, ते गेल्यावर कमालला आग्रह करण्यात आला होता. तो ‘नाही’ म्हणाला. कदाचित तो त्या गादीवर बसण्यास स्वत:ला योग्यतापूर्ण समजत नसावा. त्यानं म्हटलंय, ‘वेदशास्तर की बात ये ही | जम के माथा फत्तर है॥’ अर्थात, ‘सुख से बैठो अपने महल में| रामभजन अच्छा है॥’ बस, यात त्याची एकान्तप्रियता दिसते.
एक कथा आठवते ती अशी आहे – एकदा एका शिष्यानं विचारलं, “गुरुदेव, जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं?” गुरू हसले. म्हणाले, “सांगेन नंतर!” काही दिवसांनी त्यांनी सांगितलं, “चला, आज आपण पतंग उडवूयात!”
सगळे मैदानात आले. पतंग उडवू लागले. ज्या शिष्यानं प्रश्न विचारला होता, नेमका त्याचा धागा कमी होता. त्यानं विचारलं,
“आता काय करू मी?” “तुला काय वाटतं?” “सोडून द्यावा पतंग. सर्वांत उंच जाईल.” “जशी तुझी इच्छा!” त्यानं धागा सोडला. पतंग उंच गेला. मैदानावर दूर जाऊन एका झाडावर पडला. तेव्हा त्याला गुरुदेव म्हणाले, “बेटा, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर उच्च ध्येय हवं. मोठं होता येतं, पण आपलं दुसरं टोक दुसऱ्या कुणाच्या हाती आहे. ज्यांनी मोठं केलंय, त्याला कधी सोडू नये. आपले मातापिता, गणगोत, मित्रमैत्रिणी, शिक्षक, हितचिंतक यांच्याशी संबंध तोडू नयेत. त्यांच्या आशीर्वादांनी, प्रयत्नांनी जो मोठा होतो, तो जर ‘मी मोठा’ असं अहंकारानं म्हणू लागला तर खाली कोसळायला वेळ लागत नाही. लक्षात ठेव, जो आपल्या माणसांशी नातं तोडून टाकतो, त्याचा पतंग उडत नाही. जगही त्याला वाऱ्यावर सोडून देतं. यश टिकवून ठेवण्याचं हेच रहस्य आहे!”
(arvinddode@gmail.com)
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…