Sunday, May 11, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Anil Parab : महायुती सरकारकडून अनिल परब यांच्याभोवती फास आवळण्याच्या हालचाली!

Anil Parab : महायुती सरकारकडून अनिल परब यांच्याभोवती फास आवळण्याच्या हालचाली!

मुंबई : अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) चौकशी करण्यात येणार आहे. परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटेच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. याबद्धल उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत चौकशीची घोषणा केली आहे. सेवानिवृत्तीनंतरही परिवहन विभागाशी संबंधित बैठका घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचा खरमाटेवर आरोप आहे.


मागच्या तीन महिन्यात हॉटेल्समध्ये परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेऊन विभागाच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचासुद्धा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्याही दिल्या सूचना करण्यात आल्या आहेत. खरमाटे आणि अनिल परब यांच्या आर्थिक संबंधांची चौकशी विविध तपास यंत्रणेकडून सुरु आहे. त्यात आता EOW च्या चौकशीची भर झाली आहे.



सुरू असलेल्या चौकशा


१) ED ने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खरमाटे यांची चौकशी केली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांच्या नागपूर येथील घरी छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली गेली. त्यानंतर त्यांना समन्स बजावून मुंबईत चौकशीसाठी बोलावण्यात आले, जिथे ८ तासांहून अधिक काळ त्यांची कसून चौकशी झाली. त्यांच्या मोबाइलचीही तपासणी करण्यात आली होती. अनिल देशमुख प्रकरणातही खरमाटे यांचे नाव समोर आले होते, जिथे ED ने त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते.


२) आयकर विभागाने खरमाटे यांच्या संपत्तीवर छापे टाकले असून, त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत असलेली प्रचंड संपत्ती उघड झाली आहे. यातून त्यांच्यावर बेनामी मालमत्तांचा संशय वाढला.



३) लोकायुक्त आणि राज्य सरकार:


नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी खरमाटे यांच्या भ्रष्टाचाराची खुली चौकशी करण्याची शिफारस केली होती. राज्य सरकारने लोकायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.



आरोप-


१) परिवहन विभागातील बदल्यांमध्ये गैरव्यवहार:


खरमाटे यांच्यावर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्या एका पत्रात असा दावा केला होता की, खरमाटे यांनी अनिल परब यांच्यासाठी ठेकेदारांकडून पैसे गोळा केले आणि बदल्यांच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला.



२) मनी लॉन्ड्रिंग:


आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये त्यांच्याकडे पुण्यात बंगला, फार्महाऊस, फ्लॅट्स, व्यापारी संकुले, नवी मुंबईत फ्लॅट, सांगली आणि बारामतीत भूखंड, तनिष्कचे शोरूम, २७ कोटींचे सरकारी कंत्राट, ६६ लाख रोख आणि १०० एकर शेती आढळल्याचा दावा सोशल मीडियावरून समोर आला आहे.



३) भ्रष्टाचार आणि बेनामी मालमत्ता:


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खरमाटे यांच्यावर बेनामी मालमत्तांचा आरोप केला होता. त्यांनी असा दावा केला की, खरमाटे हे अनिल परब यांच्यासाठी “सचिव” म्हणून काम करत होते आणि त्यांनी भ्रष्टाचारातून मोठी संपत्ती जमा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही २० ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्र सरकारला खरमाटे यांच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार केल्याचा उल्लेख सोमय्या यांनी केला होता.



४) सेवानिवृत्तीनंतरही हस्तक्षेप:


खरमाटे हे आता सेवानिवृत्त झाले असले तरी, त्यांच्यावर परिवहन विभागाच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी २६ मार्च २०२५ रोजी असा दावा केला की, खरमाटे अधिकाऱ्यांना धमकावून शासनाविरोधी काम करण्यास प्रवृत्त करत आहेत आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश असूनही कारवाई झालेली नाही.

Comments
Add Comment