कोकणच्या विकासावर फार कमी वेळा चर्चा होते. त्यातही चर्चा झालीच तर ती विरोधावर होते; परंतु कोकणातील प्रकल्पांच्या बाबतीत सकारात्मक चर्चा होताना दिसत नाही. विकासावर चर्चा करायची म्हटली की, चर्चा करणाऱ्यांची लगेचच विभागणी केली जाते. कोकणातील प्रकल्प या येऊ घातलेल्या, होणाऱ्या प्रकल्पांना होणारा विरोध, कोकणातील सर्वसामान्यांची मानसिकता आणि विरोधासाठी होणारा सततचा विरोध यामुळे कोकणातील जनतेला महाराष्ट्रात आणि देशपातळीवर कोणताच प्रकल्प कोकणात नको असल्याची होणारी चर्चा आणि सर्वच स्तरावर कोकणची झालेली इमेज ही निश्चितच कोकण विकासाला भविष्यातही अडसर बनणारी आहे. राजकारण राजकारणाच्या जागी असायला हवे.
निवडणुका आल्या की ज्यांना जमेल त्या पक्षांनी आणि नेत्यांनी राजकारण जरूर करावे; परंतु निवडणुका आटोपल्यानंतर मात्र कोकणच्या विकासाचा सतत विचार देणार राजकारण असले पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधकांशी थेट त्यांच्या-त्यांच्या गोटात नेऊन पत्रकारांनाही बसविले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय विभागाकडून विकासात माध्यमांची भूमिका या विषयावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु पक्षीय आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्याच्या नादात फक्त विरोध करण्याची भूमिका राजकारणात आपण आहोत हे दर्शविण्यासाठी ठीक वाटत असली तरीही कोकणच्या विकासाच मोठे नुकसान संभवते. गेली पंचवीस-तीस वर्षे कोकणातील प्रकल्प फक्त कागदावरच आहेत. प्रत्यक्षात एक इंचभर त्या प्रकल्पाची कागदपत्रे पुढे सरकली नाहीत. बरं ज्यांच्याकडून या अशा प्रकल्पांना विरोध केला जातो त्यांच्याकडून होणारा विरोध हा राजकीय असतो. सर्वसामान्य जनतेला प्रकल्पांना विरोध कशासाठी आहे हे कुणालाच माहिती नसते. जे विरोध करणारे असतात त्यांचे काम निवडणुकीपुरतेच असते. त्यानंतर प्रकल्प होणार की नाही यातल्या कुठल्याच कशाशीही कोणाला काहीच देणे-घेणे नसते. बरे जनताही यातली सत्यता विसरून गेलेली असते. प्रकल्पाचे काम रोखले जाते. प्रकल्प थांबतो. प्रकल्पाचे काम रोखणारे ‘आम्ही प्रकल्प होऊ दिला नाही’ म्हणून फार मिजास मारत सांगतात; परंतु यातून नुकसान आतापर्यंत कोकणचीच झाली आहे. हे केवळ रोजगार देणाऱ्या प्रकल्पापुरता विषय नाही तर पाटबंधारे प्रकल्पांच्या बाबतीतही विरोधाची भूमिका तशीच राहाते. पाटबंधारे प्रकल्पांच्या बाबतीत प्रशासनातून एक चूक अशी होते की, प्रशासनातील अधिकारी पाटबंधारे प्रकल्पाबाधित शेतकऱ्यांचे होणारे नुकसान किंवा पाटबंधारे प्रकल्पाने त्या त्या भागामध्ये शेतकऱ्यांना नेमका कोणता फायदा होणार आहे किती क्षेत्र ओलीताखाली येणार आहे, शेतकऱ्यांसमोर शेतकऱ्यांना होणारे फायदे आणि त्यांचे होणारे नुकसान या दोन्ही गोष्टी समोर ठेवल्या पाहिजेत; परंतु दुर्दैवाने हे कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसमोर कधीच सत्याची मांडणी होत नाही. सकारात्मकतेची विचाराची मांडणी झाली तर नकारात्मकतेचा विचार आपोआपच कमी होत जाईल.
शासनकर्त्यांची मांडणी योग्य पद्धतीने होण्याची गरज आहे. केवळ या शब्दांच्या खेळामध्ये अनेक प्रकल्प याच भूमीत गाढले गेले. केवळ चर्चेसाठी आज कोकणात अनेक प्रकल्प नावापुरते उरले आहेत. त्यामुळे या अशा प्रकल्पांची चर्चा करून जुन्या खपल्या काढण्याच काम घडत. परंतु त्या प्रकल्पासाठीचे काम काही होत नाही. कोकण आताच्या घडीला खरंच राजगार देणार केंद्र असूनही या दुर्लक्षामुळे इथे काही घडत नाही. आता पुन्हा एकदा कोकणच्या विकासाची सकारात्मक चर्चा करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच अर्थकारण बदलण्याची ताकद कोकणच्या अर्थकारणात आहे; परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातील सत्तेवर असणाऱ्या कोणालाही कोकणच्या विकासावर इथल्या अर्थकारणावर चर्चाच करावयाची नाही. पर्यटन व्यवसायावर वारंवार चर्चा होते; परंतु दुर्दैवाने म्हणावेसे वाटते महाराष्ट्रातील सरकारमधील आजच्या आणि पूर्वीच्या कोणालाही कोकणच पर्यटन, पर्यटन व्यवसाय यासंबंधी काहीच अधोरेखित झालेलं नाही. जर खरोखरीच कोकणच्या पर्यटनातून महाराष्ट्राला आर्थिक समृद्धी येईल हा विचार राज्यकर्त्यांना पटला असता तर कोकणसाठी खास पर्यटन धोरण राबवलं गेलं असतं. कोकणातील पर्यटनस्थळांच्या बाबतीत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निश्चितच प्रयत्न १९९८ नंतर कधी झाला नाही. विरोधाने काय होऊ शकते त्याचे एकच उदाहरण कोकणशी संबंधित जरूर समोर ठेवतो.
सिंधुदुर्गात चिपी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ शकेल असा प्रस्ताव करण्यात आला होता. पायलट प्रशिक्षणही त्याच ठिकाणी अपेक्षित होते. परंतु केवळ विरोधाच्या भूमिकेने आणि विरोधाने या चिपी विमानतळाची धावपट्टी कमी केली गेली. याच दरम्यान गोवा मोपा विमानतळाचा प्रस्ताव तयार करून त्याला मान्यता मिळवली गेली. कोकणात आपण फक्त विरोधाच्या ‘गजाली’त रमलो. नुकसान सिंधुदुर्गचे, कोकणचेच झाले. प्रकल्पाला टाळं ठोकणं फारच सोपं आहे. परंतु प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठीचे प्रयत्न करणं तशी मानसिकता असणं फार आवश्यक असतं. परंतु कोकणात विरोधाच्या विचाराला नाहक मिळणारी साथ थांबली तरीही कोकणच्या विकासाला अधिक गती येईल. सकारात्मक विचारांना बळकटी प्राप्त होईल. कोकणच्या विकासावर आणि त्यातल्या असत्यावर आधारित विरोध आणि अडथळ्यांवर खूप काही बोलता येईल. सिंधुदुर्गनगरीत माध्यमातील प्रमुखांनी असाच सकारात्मक विचारांचा सूर लावला. यातून निश्चितच चांगलं काही घडेल यात शंका नाही.
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग अशी ओळख मिरवणाऱ्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर १७…
मेघना साने दोन एप्रिलला जागतिक ऑटिझम दिन होता. ऑटिझम म्हणजे नेमके काय याबद्दल मला कुतूहल…
अंजली पोतदार आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. तेव्हापासून तिच्यावर अस्तित्वात असलेल्या…
सुरक्षा घोसाळकर आपल्या संस्कृतीमध्ये अग्नी पूजा हा अतिशय महत्त्वाचा संस्कार मानला जातो. त्यामुळे अग्नीचे पावित्र्य…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये १८ एप्रिल हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी २००८मध्ये जगातील सर्वात…