Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीप्रपंचातले सुख-दु:ख हे केवळ जाणिवेत आहे

प्रपंचातले सुख-दु:ख हे केवळ जाणिवेत आहे

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की, खोटे करूनसुद्धा जर सुखी होता येते, तर तसे करायला काय हरकत आहे? सन्मार्गाने गेला तरी माणूस दु:खी का होतो, अशीही शंका आपल्याला येते. मी देवाला भिऊन वागलो, का तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही, तर काय उपयोग? किती विचित्र आहे पाहा, खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलावण्यासारखा हा प्रकार आहे! प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे, ते जर आपण केले नाही, तर देवाने काय करावे? भगवंताचा ‘साधन’ म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी साधनालाच दोष देतो, साध्य बाजूलाच राहते. भगवंत विषय देईल, पण त्याबरोबर त्याचे दु:खही देईल. एकजण मारुतीरायाला सांगून चोरी करीत असतो. तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली, तेव्हा तीही मारुतीच्या संमतीनेच झाली असे नाही का?
‘मी कोण’ हे जोवर आपण ओळखत नाही तोवर, वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. ज्याच्यापासून प्रपंच झाला, त्याला ओळखता आले पाहिजे. देहच सत्य नाही, तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार? ठिगळे लावून आपण आपला प्रपंच करतो, मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहत! कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे. सुख-दु:ख हे जाणिवेत आहे. आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते, पण आपले हवे-नकोपण, म्हणजे आपली वासना, गेली की सुख-दु:ख राहत नाही.

वासना मारायला, भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे, तिला नुसते हड्हड् करून ती बाजूला जात नाही. पण तेही बरोबरच आहे, कारण आपणच तिला लाडावून ठेवले आहे, म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ती देवघरात येते. शिवाय, वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे, कारण आपण स्वत: वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत! वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ ‘वास’ ठेवला तरच ती नष्ट होते. ‘मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे’ अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही, ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही.
तात्पर्य : वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -