जळगाव : वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज वरणगाव शहरात दाखल झाले. गिरीश महाजन शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रकमध्ये उंचावर जंप मारून चढले. मात्र ट्रकचा वरचा रॉड थेट गिरीश महाजन यांच्या डोक्याला लागला. यामुळे गिरीश महाजन यांच्या डोक्याला दुखापत झाली.
त्यामुळे महाजनांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. यावेळी गिरीश महाजन यांना क्षणभर चक्कर आले. त्याच स्थित मंत्री महाजन यांनी शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण केले आणि अभिवादन केले.
मंत्री महाजन ट्रकवरून खाली उतरले. डोक्याचे रक्त थांबत नसल्याने उपचारासाठी उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजप शहराध्यक्ष सुनील माळी शेख आखलाक यांनी आग्रह करून तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले.