Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Baleshah Pir Dargah : बेकायदा बालेशाह पीर दर्ग्यावर २० मेपूर्वी कारवाई होणार

Baleshah Pir Dargah : बेकायदा बालेशाह पीर दर्ग्यावर २० मेपूर्वी कारवाई होणार

भाईंदर : भाईंदर पश्चिमेतील उत्तन येथील तारोडी डोंगरी परिसरात कांदळवन क्षेत्रात बांधलेल्या बेकायदा बालेशाह पीर दर्ग्याच्या (Baleshah Pir Dargah) मुद्द्याने जोर धरला आहे. ही जागा सरकारी मालकीची असून, त्यावर अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे. या प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. त्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी महसूल विभाग आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांनी एकत्रित कारवाई करत २० मेपूर्वी दर्गा हटविण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तन परिसरात बालेशाह पीर दर्ग्याचे सुमारे ७ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर अवैध बांधकाम करण्यात आले आहे. या अतिक्रमणाविरोधात अ‍ॅड. खुश खंडेलवाल यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यापूर्वी त्यांनी महानगरपालिका, अपर तहसीलदार आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडेही तक्रारी केल्या होत्या. मात्र, कारवाई न झाल्याने त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली.

भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा मांडला. या जागेवर अतिक्रमण झाल्याचे तसेच वारंवार नोटिसा दिल्या तरीही ते वाढत असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी मान्य केले. २० मेपूर्वी या जागेवरील अतिक्रमण काढले जाईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.

यापूर्वी विधानसभेतही दर्ग्याच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या जागेवर खारफुटी नष्ट करून बांधकाम केल्यामुळे पर्यावरणाला मोठे नुकसान होत असल्याचे भाजप पदाधिकारी रवी व्यास यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment