मुंबई : रेल्वेने वेटिंग तिकीटांसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल आणि तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. चेंगराचेंगरी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानक आणि प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार नाही, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini Vaishnav) संसदेत जाहीर केले.
रेल्वे स्थानकांवर गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना घडतात. अलीकडेच मुंबईतील बांद्रा स्थानक आणि नवी दिल्ली येथे अशा घटना घडल्या. महाकुंभासाठी दिल्लीच्या स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. प्रमाणापेक्षा जास्त तिकीट विक्रीमुळे ही गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. या परिस्थितीवर उपाय म्हणून रेल्वेने आता कठोर पाऊल उचलले आहे.
वॉर रूमची व्यवस्था
गर्दी व्यवस्थापनासाठी अनेक उपाययोजना अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केल्या. आता फक्त ट्रेनमधील उपलब्ध जागांनुसारच तिकीटे विकली जातील. त्यामुळे वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश नाकारला जाईल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले. रुंद फूट ओव्हरब्रिज, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉर रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. सण, उत्सव आणि यात्रांच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी होत असते. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने स्थानकाबाहेर होल्डिंग एरिया तयार केले आहेत. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत प्रवाशांना आत प्रवेश दिला जाणार नाही, असेही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. या निर्णयांमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वेटिंग लिस्ट तिकिटांना प्रवेश नाही
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गेल्या महिन्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेतून धडा घेत रेल्वेने झोनल अधिकाऱ्यांना प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिले आहेत. वृद्ध, अशिक्षित आणि महिला प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष परिस्थितीत प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. २०२४ च्या सणासुदीच्या काळात सूरत, उधना, पाटणा आणि नवी दिल्ली येथे होल्डिंग एरिया तयार करण्यात आले होते. आता ६० रेल्वे स्थानकांवर पूर्ण प्रवेश नियंत्रण लागू केले जाणार आहे. फक्त कन्मर्फ तिकिट असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल. वेटिंग लिस्ट तिकीट किंवा तिकीट नसलेल्या प्रवाशांना स्थानकाबाहेरील थांबावे लागेल. अनधिकृत प्रवेशद्वारांनाही सील करण्यात येणार आहे. या उपाययोजनांमुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करणे सोपे होईल, असे सांगण्यात आले.