
ऋतुजा केळकर
‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा...
गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा...’
सुधीर मोघे, चंद्रशेखर गाडगीळ आणि देवकी पंडित या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेला गीत अाविष्कार म्हणजे एक जीवनाचे परिपक्व सार आहे. नवरंगांच्या या दुनियेत आत्म्याचा स्वतःच असा एक रंग असतो. पण जन्म घेताना देखील कुठलाही आत्मा ज्या मातेच्या उदरात नऊ महिने राहतो, जिच्या रक्तामासावर त्याचा जीव पोसला जातो, जिच्यामुळे त्याला देह धारणा करता येते, त्या आपल्याच मातेला आपल्या जन्माच्या वेळी पुनर्जन्माच्या वेदनेतून भयानक प्रसव वेदना देऊनच या जगात प्रवेशतो. जो जन्म घेतानाच इतका त्रास देतो तो जन्मता क्षणीच तिच्याशी आपले असलेले नाळेच्या नात्यातून म्हणजेच बंधनातून स्वतःला त्यावर सुरी फिरवून मुक्त करतो. असा हा ‘आत्मा’. आ म्हणजे ‘आपल्याला स्वतःला’, ‘त’ म्हणजे ‘तमा’ कुणाचीही म्हणजे अगदी आपल्या जन्मदात्रीची देखील तमा न बाळगता, ‘मा’ म्हणजे ‘मार्गस्थ’ स्वतःच्या मार्गाने निघून जातो तो म्हणजे ‘आत्मा’. आपल्याच मातेकडून रंगरूप आकार घेतलेला हा आत्मा ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ हे जन्मतःच दाखवून देतो.
मान्य की मंदिराचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी ही सर्वात प्रथम पुजाऱ्याची असते, पण त्याने कितीही प्रयास केला तरी जर टोळभैरवांनी मंदिराचा जुगाराचा अड्डाच बनवायचे ठरवले असेल तर तो एकटाच त्यांना कसा पुरणार नाही का? त्यामुळे जन्माला घालणाऱ्या मातेने जरी कितीही संस्कार आणि संस्कृतीचे धडे आपल्या अर्भकाला पोटातच असताना दिलेले असले तरीही त्याचा म्हणून एक पिंड असतोच आणि तो बदलणे अशक्य असते. हिंदू संस्कृतीत अशी मान्यता आहे की, सर्वच नाती ही कर्माच्या सिद्धांतानुसार बांधलेली आहेत. मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा तिचे मागल्या जन्मीचे काही ऋण आपण देऊ लागतो म्हणून आणि मुलगा असेल तर त्याच्याकडून आपले काही येणे बाकी असते म्हणून आणि ते फेडल्याशिवाय आपल्याला आपले मुक्तीचे दरवाजे उघडले जात नाहीत. आता आत्म्याबद्दलच बोलायचं झालं तर तो शुद्ध निरंजन स्वरूपी देहाच्या उद्घोषातून निर्माण झालेला एक असा गुलमोहर आहे की ज्याच्या प्रत्येक बहरात कुलोत्पन्न आवाका की जो, कुटुंबानुरूप परंपरेनुसार वेगवेगळा असतोच. शिवाय आत्मशोधाच्या दैवी खुणा देखील त्यात दडलेल्या आहेत.
त्यामुळेच असेल कदाचित अनेकाने मरणे मरत नैतिक-अनैतिकतेच्या आकांताने हा आत्मा पुन:पुन्हा जन्म घेतो तो शेवटच्या आत्मवैराण संक्रमणाच्या अवतरणाकरिता. कर्मांच्या परतफेडीकरिता पुन:पुन्हा जन्माला येणारा हा आत्मा कुणाचेही पाश स्वतःभोवती ठेवत नाही, कारण त्यात जर तो अडकून पडला तर, ज्या मुक्तीच्या गोंदण वाटेवर जाण्याचा त्याचा प्रयास असतो त्यात त्याला अडथळा येऊ शकतो. जसे पंचदेहाच्या आसक्तीमुळे द्रौपदीलाही जन्म चुकला नाही तर मग सामान्य आत्म्याची काय कथा? ईश्वरी वल्कले धारण केलेली वसंतोत्सवातील वृक्षवल्लरी जेव्हा वाळलेल्या पानाफुलांच्या परतीचा पिवळाजर्द प्रवासास लागते तेव्हाची ती हिरवी वेदना आणि या आत्म्याच्या परतीचा प्रवास हा दोन्ही सारखाच नाही का वाटत? म्हणूनच जन्माच्या क्षणापासूनच आपल्या परतीच्या प्रवासास अडसर होतील असे सारे धागे मग ते नाळेचे नाते असले तरी ते तोडून, त्या त्या जन्मातील पुढील प्रवासास तो आत्मा सज्ज होतो. अर्थात ते करत असताना त्याची भुमिका म्हणजे अहिल्येबद्दलचा गौतम ऋषींचा शाप उशापातील दग्ध भावच आहे हे नक्की.
त्यामुळे श्रीरामाच्या पद्स्पर्शाच्या आशेने कुठल्याही कर्माच्या निचऱ्याकरिता कष्ट न घेता पूर्ण-अपूर्णतेच्या वाटेवर अडकून राहण्यापेक्षा आपल्या कर्माच्या संधीप्रकाशात लपलेल्या शोध वाटांच्या वैराणसुक्तांचे ‘महासुक्त’ करण्याचा प्रयत्न आत्मा हा नेहमीच करत राहतो आणि मग त्याकरिता तो आपली स्वतःची अशी तत्वप्रणाली आणि विचारधारा निर्माण करतो की, ज्यातून समतेचा आणि प्रेमाचा गंध तर दरवळत राहिलाच पण त्याचा स्वतःचा मुक्तीचा मार्ग देखील मोकळा होईल. आत्म्याच्या याच कृती आणि विचारांमध्ये जर का सुसंगती निर्माण झाली तर मानवतावादी संगीत त्याच्या विचारांमध्ये म्हणजेच पर्यायाने कृतीमध्ये देखील झिरपत जाईल आणि मग असे झाले तर त्या आत्म्याचा रंग म्हणजेच जीवनाच्या अनुभूतीचा प्रवास नक्कीच वेगळा होईल, जेणेकरून नात्यांच्या म्हणजेच कर्मांच्या गुंत्यातून त्याची सहजगत्या सुटका होऊन तो मोक्ष मार्गास मार्गस्थ होऊ शकेल आणि अगदी माझ्याच शब्दात सांगायचं झाल तर...
‘आत्मविलेपित काचपात्रात हिंडोल...
कर्मांचे अलौकिक विभ्रम...
उसवते मुक्तीचा मार्ग...
देहकळा विघटित...
देहकळा विघटित...