सद्गुरू वामनराव पै
आम्ही कर्मकांडावर टीका किंवा ताशेरे ओढतो याचे कारण हेच आहे की आपल्या कर्मठ लोकांनी आपल्या धर्माचे, राज्याचे, देशाचे फार नुकसान केले. आपले छत्रपती शिवाजी महाराज किती महान, पण त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी देखील बरेच काही घडले असे म्हणतात. अखेरीस काशीवरून गागाभट्ट यांना राज्याभिषेक करण्यासाठी बोलाविण्यात आले. कर्मठपणा किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाहीत. ज्याच्यामुळे आपण जगतो आहोत, त्यालाच आपण सुखाने जगू देत नाहीत. जीवनविद्या तर असे सांगते की, जगातील सर्व धर्माचे सर्व लोक देवाधर्माच्या नावाखाली खूप काही करीत असतात, पण प्रत्यक्षात मात्र, ते जे काही करतात त्या कर्मकांडात देवही नसतो व धर्मही नसतो. सांगायचा मुद्दा, धर्म वाईट नाही, धर्म चांगलाच आहे. धर्माची सुरेख व्याख्या आहे. “ज्याने समाजाची सुरेख धारणा होते, तोच खरा धर्म”. धर्म हा पाहिजेच, पण कुठला धर्म? मानवधर्म. हा मानवधर्म म्हणजे काय? कित्येकदा बरीच माणसे केवळ दिसण्यापुरती माणसासारखी दिसतात, पण त्यांची वागणूक ही माणसांसारखी नसते. जेव्हा माणूस हा माणसासारखा वागायला लागेल तोच खरा मानवधर्म. किती सोपे आहे बघा.
Lionel Messi : मेस्सी आणि त्याचा संघ १४ वर्षाने पुन्हा भारतात खेळणार!
माणूस माणसासारखा वागला की त्याच्या ठिकाणी असेल तोच मानवधर्म. पण आज तसे कोणी वागतंय का? इतर प्राणी त्यांच्या धर्माप्रमाणे वागतात, मात्र माणूस बरेचदा मानवधर्माला अनुसरून वागत नाही. वाघ हा वाघासारखाच वागणार, मात्र तो कधीही गाईसारखा वागणार नाही. कितीही भूक लागली तरीही चारा, गवत खाणार नाही. सर्प, गरुड, लांडगा हे सर्व इतर पशु-पक्षी देखील जन्माला आल्यापासून त्यांना निसर्गाने नेमून दिल्यासारखे जगतात. केवळ मनुष्य हा एकाच असा प्राणी आहे जो जन्माला येतो माणूस म्हणून मात्र माणसासारखा वागत, जगत नाही. हे असे का होते? याचे कारण म्हणजे त्यांना जी शिकवण घरातून, शाळा-कॉलेजमधून, धर्ममार्तंडांकडून म्हणजेच संस्कारातून, शिक्षणातून मिळते, त्यातून हे सगळे घडते. कडवटपणा, उच्चनीच, श्रेष्ठ-कनिष्ठ भेदभाव निर्माण होतात, त्यातून सगळे बिघडत जाते. मी नेहमी सांगतो की, जगात कोणी वरिष्ठ कोणी कनिष्ठ नाही, सगळेच श्रेष्ठ आहेत. कारण सर्वच या निसर्गाच्या व्यवस्थेत उपयुक्त आहेत.