फ्लॅटसाठी मोजले २१ कोटी १० लाख रुपये
मुंबई : भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मुंबईत दोन आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत. आयपीएलदरम्यान त्याने हे फ्लॅट खरेदी केल्याची माहिती आहे. या दोन्ही फ्लॅट्सची किंमत सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) आयपीएल कमाईच्या दीडपट अधिक आहे. त्यामुळे या व्यवहारावर विविध चर्चांना उधाण आले आहे. सूर्यकुमार यादवने २५ मार्च २०२५ रोजी या दोन्ही फ्लॅट्सच्या व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्याने मुंबईच्या देवनार परिसरातील गोदरेज स्काय टेरेस या इमारतीत हे दोन फ्लॅट्स खरेदी केले आहेत. या दोन्ही फ्लॅट्सची एकूण किंमत २१.१ कोटी रुपये आहे.
सूर्यकुमार यादव सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. मुंबईने त्याला १६.३५ कोटी रुपयांना संघात कायम ठेवले आहे. सूर्यकुमार यादवच्या फ्लॅटची किंमत पाहता, ती त्याच्या आयपीएल कमाईच्या जवळपास दीडपट जास्त आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा पुढील सामना २९ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजयाचा खाते उघडण्याची संधी आहे. मात्र, पहिल्या सामन्याप्रमाणे सूर्यकुमार यादव या सामन्यात कर्णधार नसणार आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्या अनुपस्थित असल्याने सूर्यकुमारने मुंबई संघाचे नेतृत्व केले होते.
फ्लॅटची काय आहेत वैशिष्ट्ये?
सूर्यकुमार यादवच्या दोन्ही फ्लॅट्सचे एकूण कार्पेट क्षेत्र ४,२२२.७ चौरस फूट आहे, तर बांधकाम क्षेत्र ४,५६८ चौरस फूट आहे. हे दोन्ही फ्लॅट्स वेगवेगळ्या मजल्यांवर आहेत. या अपार्टमेंटमध्ये सहा मजल्यांचा कार पार्किंग एरिया देखील आहे.