मुंबई: गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल २०२५मध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सच्या १७ ते २० षटकांदरम्यान पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने केवळ चार चेंडूंचा सामना केला. या चार बॉलमध्ये ७ धावा केल्या. तो ९७ धावा करून नाबाद परतला. खास बाब म्हणजे या डेथ ओव्हर्समध्ये एकदाही त्याला शतक पूर्ण करावे असे वाटले नाही.
श्रेयससोबक नॉन स्ट्रायकरच्या बाजूला असलेल्या शशांक सिंहने शेवटच्या तीन षटकात स्ट्राईक सांभाळली आणि पंजाबसाठी चौकार तसेच षटकारांचा पाऊस केला. शशांकने सांगितले श्रेयसचा मेसेज पूर्ण स्पष्ट होता की, माझ्या शतकाबद्दल विचार करू नकोस. फक्त जितके चौकार मारता येतील तितके मार.
शशांकने तसेच केले. पंजाब किंग्सच्या १६व्या षटकांत फलंदाजी करणाऱ्या आलेल्या शशांकची ओळख गेल्या आयपीएलमध्ये फिनिशर अशी होती. त्याने गुजरातविरुद्ध १६ बॉलमध्ये नाबाद ४४ धावा केल्या. यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. यामुळे पंजाबला २० षटकांत ५ बाद २४३ धावा करता आल्या.
शशांकने याबद्दल बोलताना सांगितले की, मी इमानदारीने सांगेन की श्रेयसने मला पहिल्या बॉलपासून सांगितले होते की माझ्या शतकाची चिंता करू नकोस. मी फक्त बॉलकडे बघत होतो आणि त्यावर रिअॅक्ट होत होतो.