Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

संतोष देशमुख प्रकरणी १० एप्रिलला आरोप निश्चित होणार ?

संतोष देशमुख प्रकरणी १० एप्रिलला आरोप निश्चित होणार ?
बीड : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी बीडच्या मकोका न्यायालयात सुनावणी झाली. सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडसह सर्व सात आरोपी न्यायालयीन कोठडीतून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला उपस्थित होते.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात सुनावणीवेळी गुन्ह्याशी संबधित सर्व घटनाक्रम सांगितला. जगमित्र कार्यालयात वाल्मिक कराडने खंडणी मागितल्याचे त्यांनी सांगितले. संतोष देशमुखांना कायमचा धडा शिकवा असे विष्णू चाटे म्हणाल्याचेही त्यांनी न्यालायाला सांगितले. नोव्हेंबर २०२४ च्या २९ तारखेला विष्णू चाटेच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत सगळे आरोपी हजर होते, असे निकम म्हणाले. यानंतर ८ डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगावर विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची बैठक झाली. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत अशी चर्चा या बैठकीत झाली. यावर 'त्याला कायमचा धडा शिकवा', असे विष्णू चाटे म्हणाल्याचे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सांगितले.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे प्रकरण आरोप निश्चितीसाठीसाठी तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, आरोपींच्या वकिलांनी त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे आरोप निश्चिती करु नका अशी विनंती न्यायालयाला केली. या युक्तिवादानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याची पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी असेल; असे न्यायालयाने सांगितले. यामुळे आरोप निश्चितीची प्रक्रिया १० एप्रिल रोजी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment