Wednesday, April 23, 2025
Homeकोकणरायगडनागोठण्याच्या नवीन प्रकल्पास स्थानिकांचा विरोध

नागोठण्याच्या नवीन प्रकल्पास स्थानिकांचा विरोध

प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समितीचा १ एप्रिलपासून एल्गार

अलिबाग : रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे. अशातच स्थानिक, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक संघर्ष समितीने कंपनीविरोधात एल्गार पुकारला असून, आपल्या न्याय हक्कासाठी स्थानिक शेतकरी, पशुपालक, मच्छिमार १ एप्रिलपासून बेणसे सिद्धार्थनगर पाण्याच्या टाकीलगत आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स व्यवस्थापन केवळ बैठका घेऊन स्थानिकांना फक्त आश्वासनेच देत आले. बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत येऊ घातलेल्या नवीन प्रकल्पसंदर्भात संघर्ष समिती व रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापन व महसूल प्रशासन यांच्यात पेण प्रांताधिकारी कार्यालयात स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी व नागरिक यांच्या विविध प्रश्न व समस्यांबाबत वारंवार बैठका होऊन आश्वासने देऊन सकारात्मक चर्चा होऊन देखील आजतागायत एकही विषय मार्गी लागलेला नाही असा स्थानिकांचा आरोप आहे. स्थानिकांच्या प्रमुख मागण्यांचा विचार करता, ई.डी.पी.एल लाईन एक वर्षांपासून लिकेज झाल्याने शेतकरी, मच्छिमार व पशुपालक यांच्या व्यवसायावर केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे मोठे संकट ओढावले असून, आजही स्थानिक केमिकलयुक्त सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Sindhudurg Underwater Museum : सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राखाली पाण्यातील संग्रहालय उभारणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

या नुकसानग्रस्तांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे रिलायन्स कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले होते, स्थानिकांना उदरनिर्वाहाच्या दृष्टीने शिक्षण व गुणवत्तेनुसार कायमस्वरूपी नोकरी देण्याचे मान्य केले होते, तसेच बीएससी, डिग्री, डिप्लोमा व आयटीआय व फायर मॅन यांना सध्या चालू असलेल्या रिलायन्स कंपनीत कामाला कायमस्वरूपी सामावून घेण्याचे मान्य केले होते, यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही कंपनीकडून झालेली नाही, शेतकऱ्यांची पूर्वांपार चालू असलेली वहिवाट मोकळी सोडून येण्या-जाण्याचा रस्ता देण्याचे मान्य केले होते; परंतू सर्वत्र जागोजागी अवाढव्य खोदकाम करून जुना रस्ताही बंद करून ठेवला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे, कंपनीने लाखो ब्रास मातीचा भराव व दगड टाकून ठेवल्याने दोन महिन्यात पाऊस पडून शेतीत दगडमाती जाऊन नुकसान होणार आहे. मातीच्या भरावाने बेणसे झोतीरपाडा व अन्य नागोठणे विभागात महापूर परिस्थिती अधिक उदभवण्याची भीती असल्याने आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करावी, जोपर्यंत स्थानिक जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवावे, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील असे स्थानिकांनी सांगताना या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी दोन वाजता शेतकरी व स्थानिक असे चारजण बेणसे सिध्दार्थ नगर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. उपोषणा दरम्यान उपोषणकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास रिलायन्स नागोठणे व्यवस्थापन व शासन या घटनेस सर्वस्वी जबाबदार राहील असा इशाराही या तक्रारी निवेदनाद्वारे दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -