८ लाख ३९ हजार कोटींवर गेले महाराष्ट्रावरील कर्ज
नवी दिल्ली : भारतात गेल्या १० वर्षात विदेशी कर्ज २५० अब्ज डॉलर्सने वाढले आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय वित्त मंत्रालयामार्फत हे उत्तर देण्यात आले आहे. वित्त मंत्रालयाला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, ३१ मार्च २०१४ रोजी भारतावर विदेशी कर्ज किती होते? ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत कर्ज किती वाढले आहे?
अर्थमंत्रालयाने मात्र सप्टेंबर २०२४ पर्यंतची आकडेवारी मांडली आहे. त्यानुसार देशावर ७११.८ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे विदेशी कर्ज आहे. मार्च २०१४ मध्ये ४४६.२ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं विदेशी कर्ज होते. म्हणजेच गेल्या १० वर्षात भारतावरील विदेशी कर्ज २६५ अब्ज डॉलर्सने वाढले आहे.
वित्त मंत्रालयाने या उत्तरासोबत आणखी माहिती दिली. भारताने २०१३-१४ मध्ये विदेशी कर्जावर व्याज ११.२० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके दिले होते. २०२३-२४ मध्ये अंदाजे २७.१० अब्ज डॉलर्स इतके व्याज दिले आहे.
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये महाराष्ट्रावर किती कर्ज आहे याची माहिती दिली. महाराष्ट्रावरील कर्जाची रक्कम ९ लाख ३२ हजार कोटींवर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला, तेव्हा वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा अधिक कर्ज महाराष्ट्रावर झाले आहे. महाराष्ट्रावरील कर्ज ८ लाख ३९ हजार कोटींवर गेले आहे. केंद्र आणि आरबीआयने राज्य सरकारांनी किती कर्ज काढावे, याबाबतचे नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार राज्याच्या उत्पन्नाच्या एकूण २५ टक्क्यांपर्यंत कर्ज काढता येते.