अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा व्यक्तिगत स्वातंत्र्याप्रमाणेच लोकशाही मूल्यांवर आधारित मूलभूत मानवी अधिकार. स्वतःस अभिव्यक्त करता येणे म्हणजेच अभिव्यक्ती. माध्यम कोणतेही असले तरी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या शब्दाने केवळ बोलण्याचेच नव्हे, तर माहिती किंवा कल्पना हवी असणे, मिळवणे आणि देणे यांचे स्वातंत्र्यही अभिप्रेत असते. मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र कलम १९ अनुसार प्रत्येकास मतस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ न होता, ते मत बाळगण्याला स्वातंत्र्याचा अधिकार असतो. हे स्वातंत्र्य म्हणजे व्यक्त होण्याची मुक्तता असणे, अशी व्याख्या भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ मध्ये करण्यात आली आहे. ही झाली कायद्याची चौकट; परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हजारो लोकांच्या मतांवर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची बदनामी केली, तर त्यांच्या समर्थकांच्या भावना दुखावून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर? हो, असे घडले ते स्टड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका गाण्यामुळे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील व्यंगात्मक गाण्यानंतर राजकीय वर्तुळात वाद सुरू झाला.
याप्रकरणी शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या खारमधील स्टुडिओची मोडतोड केली. महाराष्ट्राच्या विधिमंडळातदेखील त्याचे पडसाद उमटले. दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करण्याची वेळ आली. विधान परिषद सभागृह शांत करण्यासाठी कुणाल कामराची किंवा इतर कोणाचीही अशा प्रकारची कॉमेडी चालवून घेतली जाणार नाही, असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना द्यावा लागला. मुंबई महापालिकेवर सुमारे २५ वर्षांपेक्षा अधिक काळ सत्ता ही मातोश्रीवरील ठाकरे कुटुंबाच्या ताब्यात होती. २०१७ साली महापालिका निवडणुकीच्या आधी मुंबईतील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत रेडिओ जॉकीने गायलेले गाणे खूप गाजले होते. ‘सोनू तुला बीएमसीवर भरवसा नाय काय…’ असे ते गाणे होते. हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर ठाकरेचा प्रचंड तीळपापड झाला होता. त्यावेळी त्या महिला रेडिओ जॉकीला दमदाटी करण्याचे प्रकार झाले. मात्र, आता तेच ठाकरे आता कुणाल कामराला खांद्यावर घेऊन नाचताना दिसत आहेत. कुणाल कामराच्या गाण्याचे शब्द त्याच्या राजकीय मालकाने लिहून दिल्यासारखे वाटतात. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तो स्टुडिओ फोडला आहे. तसे पाहिले, तर फोडाफोडीचा शिवसेनेचा इतिहास हा नवा नाही. तरीही उबाठा सेनेच्या नेत्यांना आता अभिव्यक्ति स्वातंत्र्य सुचते आहे, याचे आश्चर्य वाटते.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या नावाने ही मंडळी आता कंठशोष करत आहेत. जणू हा कामरा त्यांचे बंद होत चाललेले राजकीय दुकान सुरू करण्यास मदत करेल असा उबाठाचा भाबडा आत्मविश्वास सांगत असावा. गेल्या अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांनी बंड केल्यानंतर त्यांच्यावर गद्दार, ५० खोके एकदम ओके, असे संबोधून सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदरात यश टाकले. ४० आमदारांनी बंड केले. मात्र, पुढील निवडणुकीत ५५ पेक्षा जास्त आमदार स्वतच्या ताकदीवर निवडून आणण्याची धमक एकनाथ शिंदे यांनी ठेवली, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे एखाद्या कलाकाराला सुपारी देऊन त्याच्याकडून विडंबन करून घेण्याचा प्रकार उबाठा सेनेकडून केला गेला असावा. त्यामुळे विधिमंडळात कामराच्या मागचा बोलविता धनी कोण आहे? याची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आली, त्यामागचा हेतू स्पष्ट आहे.
कुणाल कामरा सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. मुंबई पोलिसांनी त्याला समन्स पाठवून चौकशीला हजर राहण्याचे सांगितले आहे. तरीही, तो आपण माफी मागणार नाही, या मतावर ठाम आहे. संविधानाची प्रत हातात घेऊन कामराने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपला अधिकार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ही त्याची मस्ती की, प्रसिद्धीचा स्टंट म्हणायचा, हे लवकरच कळेल. त्याचे कारण, सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी अनेक जण नकारात्मक प्रसिद्धीचा मार्ग अवलंबतात. ‘जो बदनाम होता है, उसका ही नाम होता है’ असा हिंदी चित्रपटातील एक फेमस डायलॉग आहे. याच डायलॉगप्रमाणे कामराला प्रसिद्धी मिळविण्यासाठी महाराष्ट्रात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर विडबंनात्मक गाणे म्हणावे लागले असावे. केवळ एकनाथ शिंदे नव्हे, तर पंतप्रधान नरेद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही त्याने यापूर्वी विडंबनात्मक गाणी तयार केली आहेत. अर्बन नक्षलवाद म्हणजे काय असतो, तर विशिष्ट विचारसरणीची मंडळी हिंदुत्ववादी विचारांना सत्तेतून खेचण्यासाठी सध्या उतावीळ झालेली आहेत. त्यात कामरा यांच्यासारखे अनेक चेहरे लपलेले असू शकतात.
आता मविआचे सरकार गेल्यापासून तोल ढासळलेल्या उबाठा सेनेची अवस्था दयनीय झाली आहे. उद्धव ठाकरेना आपले मुख्यमंत्रीपद गेल्याची सल जात नाही, आदित्यना मंत्रीपद आणि इतर नेत्यांना सत्ता गेल्याचे दुख: विसरता येत नाही. त्यातून पक्ष फुटल्यापासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पाणउतारा करण्याचा कार्यक्रम आजही जारी आहे. आधी आमदार, खासदार साथ सोडून गेले. आता नगरसेवक, शाखाप्रमुखांसह हजारो शिवसैनिक साथ सोडून जात असल्याने कामरासारख्या कलाकाराच्या मागे राहून एकनाथ शिंदे यांच्या बदनामीचा प्रयत्न करण्याचे राजकारण ठाकरे कडून दिसते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला घटनेने दिलेला अधिकार आहे; परंतु याचा अर्थ तुम्हाला एखाद्या नेत्याबद्दल किंवा संवैधानिक पदावरील व्यक्तीबद्दल टिंगल टवाळी करण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही, याचे भान प्रत्येक कलाकारांनी ठेवायला हवे.