Wednesday, August 13, 2025

Marine Highway : सागरी महामार्गावरील नारळी वृक्ष संकटात

Marine Highway : सागरी महामार्गावरील नारळी वृक्ष संकटात

उरण : समुद्र आणि खाडी लगत असलेल्या या परिसरात नारळाच्या वृक्षांची वाढ होण्यासारखे पोषक वातावरण आहे. द्रोणागिरी ते पागोटे या पाच किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गावर सिडकोने प्रचंड खर्च करून पहिल्यांदाच अडीच हजारांपेक्षा अधिक नारळी वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. मात्र द्रोणागिरी नोड आणि उरणला जोडणाऱ्या सिडकोच्या सागरी महामार्गावरील अनेक नारळी वृक्ष वाढत्या उष्म्यामुळे संकटात आले आहेत. अनेक वृक्ष उन्हामुळे करपू लागले आहेत. सिडकोने जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा चार पदरी सागरी महामार्ग तयार केला आहे. या नारळांच्या वाढत्या झाडांमुळे हा सागरी मार्ग सिडकोला उत्पन्न देणारा आणि त्याच बरोबर महामार्गाची वेगळी ओळख निर्माण करणारा ठरणार आहे; परंतु या वृक्षांची देखभाल होत नसल्याने हा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकीकडे या वृक्षांच्या देखभाली साठी सिडकोच्या द्रोणागिरी नोड विभागाकडून खर्च केला जात आहे.



मात्र त्याचा फायदा होतांना दिसत नाही. त्यामुळे येथील नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिक सकाळी व सायंकाळी वॉक करण्यासाठी येतात. या महामार्गाच्या दोन्ही मार्गिकांवर ही वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मात्र गवताला लावण्यात येणाऱ्या आगीमुळे तसेच वेळेत पाणी न मिळाल्याने ही वृक्ष नष्ट होत आहेत. त्यामुळे या वृक्षांची निगा राखून काळजी घेणे आवश्यक आहे. सिडकोने या मार्गाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नारळी वृक्षांची जपणूक करण्यात यावी अशी मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ते निकेतन ठाकूर यांनी केली आहे.

Comments
Add Comment