नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. नव्या नियमानुसार ग्राहकाला होम बँकेतून अर्थात ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येकवेळी १९ रुपये एवढे शुल्क आकारले जाईल. तसेच होम बँकेऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून बॅलन्स अर्थात खात्यात किती रक्कम शिल्लक आहे याची तपासणी करण्यासाठी प्रत्येकवेळी ७ रुपये एवढे शुल्क आकारले जाईल. आधी होम बँकेऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येकवेळी १७ रुपये एवढे शुल्क आकारले जात होते. तसेच होम बँकेऐवजी दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून बॅलन्स तपासण्यासाठी ६ रुपये एवढे शुल्क आकारले जात होते. नवे नियम १ मे २०२५ पासून लागू होणार आहेत.
शहरात राहणाऱ्या ग्राहकाला होम बँकेतून अर्थात ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएममधून कमाल पाच वेळा विनामूल्य पैसे काढण्याची मुभा आहे. तर ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकाला होम बँकेतून अर्थात ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएममधून कमाल तीन वेळा विनामूल्य पैसे काढण्याची मुभा आहे. नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय यापैकी एखादा पर्याय वापरुन बॅलन्स तपासण्यासाठी पैसे आकारले जाणार नाही.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने सादर केलेल्या या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेची मंजुरी मिळाली आहे. यामुळे देशातील सर्व बँका १ मे २०२५ पासून एटीएम, नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय यासाठी नवे नियम लागू करतील.