मुंबई : अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून आमदार अण्णा बनसोडे यांचा अर्ज सादर झाला होता. उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांकडून एकही अर्ज आला नव्हता. यामुळे बनसोडे यांच्या निवडीची औपचारिकता उरली होती. बुधवारी २६ मार्च रोजी अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली आणि औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
कोण आहेत अण्णा बनसोडे ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. ते पुणे जिल्ह्यातील पिंपरीमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. बनसोडे हे २००९ मध्ये पहिल्यांदा निवडून आले. यानंतर २०१९ आणि २०२४ मध्ये अण्णा बनसोडे विधानसभेवर निवडून आले. ते पिंपरीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात.
जन्म : ४ मे १९६८
शिक्षण : आयटीआय
मतदारसंघ : २०६ पिंपरी, अनुसूचित जाती, राखीव
राजकीय कारकिर्द : १९९७ आणि २००२ मध्ये नगरसेवकपदी निवडून आले. काही काळ स्थायी समिती अध्यक्षाचे पद भूषवले. यानंतर २००९ मध्ये पहिल्यांदा पिंपरीचे आमदार झाले. पण २०१४ मध्ये पराभव झाला. नंतर २०१९ आणि २०२४ मध्ये विधानसभेवर आमदार म्हणून निवड. आमदारकीचा तिसरा कार्यकाळ सुरू. अजित पवारांचे विश्वासू सहकारी.