मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांची मुंबई पालिकेकडे मागणी
० ते ५० हेक्टर जलक्षेत्र असलेल्या नव्याने संस्था नोंदणी होणार नाही
मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
मुंबई : कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामादरम्यान राजभवन ते वरळी सी फेस या किनारपट्टीलगत करण्यात आलेल्या भरावामुळे ठीक ठिकाणी जमिनी विकसित झालेल्या आहेत या जमिनी व्यावसायिक वापरासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात अशी मागणी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे (Mumbai Municipal Corporation) करण्यात आल्याची माहिती आज मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच कुलाबा येथील सागरी जेट्टी सागरी प्रवासासाठी सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे गेटवे ऑफ इंडियावर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल असे ते आज पत्रकार परिषदेत म्हणाले.
दरम्यान ० ते ५० हेक्टर जलक्षेत्र असलेल्या तलावांवर ज्या संस्थाची नोंदणी झालेली असेल त्या कायम राहतील. अशा तलावांवर नव्याने संस्था नोंदणी होणार नाही. तर पन्नास पेक्षा जास्त हेक्टर जलक्षेत्र असलेल्या तलावांवर मात्र नव्या संस्थांना नोंदणी दिली जाणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून पालिकेमार्फत पश्चिम किनारपट्टी लगत कोस्टल रोडचे बांधकाम करण्यात आले आहे या कोस्टल रोड प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने १० मार्च २०१६ रोजी परवानगी दिली होती आता पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. शासनाने त्यांच्याकडे निहीत असलेल्या सर्व मालमत्ता भत्ता व निधी आणि पट्टी आकारण्याचे अधिकार मंडळास दिले आहेत या जमिनीचा व्यावसायिक वापर जसे होर्डिंग कार्यक्रम याकरता महाराष्ट्र सागरी मंडळाकडे पालिकेकडून आवश्यक परवानगी घेतल्या जातात. या जमिनी आता महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित केल्यास महाराष्ट्र सागरी मंडळाला महसुलाचे नवीन स्तोत्र निर्माण होतील आणि मंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल आणि मंडळ आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल.
भविष्यात मुंबई वॉटर मेट्रो सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी मोठा खर्च आहे. तो इतर ठिकाणी मागण्यापेक्षा स्वतःच्या उत्पन्नावर गोळा करण्यास मदत होईल असे या मागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. बंदर खात्याचे उत्पन्न वाढावे यासाठी आपण काही उद्दिष्ट ठेवली असून ज्याद्वारे बंदर खाते सक्षम होईल व महसुलात वाढ होईल त्यासाठी आपण दोन हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
रेडिओ क्लब येथे जेट्टी बांधण्याचे काम सुरू झाले असून लवकरच ते पूर्णत्वात येईल. ज्यामुळे गेटवे ऑफ इंडिया वरील येणारा प्रवाशांचा व पर्यटकांचा ताण कमी होणार असून सुटसुटीतपणा येणार आहे. नवीन जेट्टी येथे १५० बोटी उभी करण्याची पार्किंगची क्षमता असून जमिनीच्या पातळीवर असल्याने स्थानिकांचा विरोध मावळला असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
गोड्या पाण्यातील मासेमारीचे उत्पादन वाढवणार
महाराष्ट्रात दोन प्रकारची मच्छीमारी होते. खाऱ्या पाण्यातील मच्छीमारी व गोड्या पाण्यावरील मच्छीमारी. गोड्या पाण्यातील तलावाचे उत्पादन हे वाढले पाहिजे आज आपण या मच्छीमारीत सतराव्या क्रमांकावर आहोत म्हणून आपण तलावांच्या दिलेल्या ठेक्यांवरील शासन निर्णय उठवला असून त्यामुळे चांगली स्पर्धा निर्माण होईल. ४० वर्षांपासून तलावांची कोणतीही माहिती नाही , उत्पादन कसे वाढेल याची कोणतीही दिशा नाही आपण हा शासन निर्णय उठवल्यामुळे तलावांमध्ये चांगली स्पर्धा निर्माण होणार असून योग्य ती माहिती शासनाला मिळेल सर्व प्रकारच्या मच्छीमारांना याचे असंख्य फायदे होणार असून आपण मासेमारीतून चांगले उत्पन्नही मिळवू. यामुळे कोणाच्याही अधिकारांवर गदा येणार नसून स्पर्धा निर्माण होईल व ज्या संस्थांची नोंदणी झालेली असेल त्या कायम राहतील, अशा तलावांवर नव्याने संस्था नोंदणी होणार नाही.