Sunday, October 26, 2025
Happy Diwali

भाजपाची मुस्लिमांसाठी ‘सौगत-ए-मोदी’ मोहिम

भाजपाची मुस्लिमांसाठी ‘सौगत-ए-मोदी’ मोहिम

ईदनिमित्त ३२ लाख मुस्लिमांना विशेष किट वाटण्याची तयारी

नवी दिल्ली : भाजपाने मुस्लिमांचा राजकीय पाठिंबा मिळविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ईदनिमित्त ३२ लाख मुस्लिमांना विशेष किट वाटण्याची तयारी केली आहे. पक्षाने या मोहिमेला सौगत-ए-मोदी असे नाव दिले आहे. रमजान महिन्यात मुस्लिमांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी भाजपा एक विशेष मोहीम सुरू करणार आहे. याअंतर्गत, भाजपाचा अल्पसंख्याक मोर्चा ‘सौगात-ए-मोदी’ मोहीम सुरू करणार आहे. यामध्ये ३२ लाख गरीब मुस्लिमांना ईदची भेट देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दिल्लीतील निजामुद्दीन येथून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. गरीब मुस्लिमांनाही ईदचा आनंद कोणत्याही अडचणीशिवाय साजरा करता यावा आणि सामायिक करता यावा यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. सौगात-ए-मोदी मोहिमेअंतर्गत देण्यात येणाऱ्या किटमध्ये कपड्यांसह शेवया, खजूर आणि फळे यांसारखे खाद्यपदार्थ असतील.

कपड्यांबद्दल बोलायचे झाले तर, महिलांच्या किटमध्ये सूट असेल आणि पुरुषांच्या किटमध्ये कुर्ता-पायजमा असेल. एका किटची किंमत ५००-६०० रुपये असेल. या मोहिमेअंतर्गत, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे ३२ हजार कार्यकर्ते देशभरातील मशिदींमधून गरजूंना हे किट वाटतील.या संदर्भात, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी मोहिमेची सविस्तर माहिती शेअर करताना सांगितले की, ईद, गुड फ्रायडे, ईस्टर, नौरोज आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने या माध्यमातून गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढेच नाही तर जिल्हा पातळीवर ईद मिलन कार्यक्रमही आयोजित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मुस्लिम धर्मियांचा पाठिंबा मिळवण्याचे भाजपाचे मिशन

अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी यासिर जिलानी म्हणाले की, या माध्यमातून भाजपा मुस्लिम समुदायात कल्याणकारी कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊ इच्छित आहे. भाजपा आणि एनडीएला राजकीय पाठिंबा मिळवू इच्छित आहे. हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे कारण तो रमजान आणि ईद लक्षात घेऊन सुरू केला जात आहे. यावरून आता असे दिसून येते की मुस्लिमांचा राजकीय पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. ओबीसी आणि मराठा समाजानंतर आता भाजपाचे मिशन मुस्लिम धर्मियांचा पाठिंबा मिळवण्याकडे आहे. यामुळे आता ईदच्या पार्श्वभूमिवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >