मुंबई : नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर आज, सोमवारी बुलडोझर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे गाणा-या कुणाल कामरा याने ज्या स्टुडिओमध्ये गाणे कंपोज केले त्या युनीकॉन्टिनेंटल स्टुडिओवर (Unicontinental Studio) बुलडोझर कारवाई होणार आहे. या स्टुडिओचे अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगितले जात आहे. या स्टुडिओच्या आवारात सध्या पोलीस, महापालिका आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी पोहचले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील खार परिसरातील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट स्टुडिओ तोडफोड मोहीम सुरू केली आहे, जिथे कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारा व्हिडिओ शूट केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या एका पथकाने हातोड्यांसह परिसरात प्रवेश केला आणि सध्या आत तोडफोड मोहीम राबवत आहे.
आज सकाळीच वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी एच वेस्ट वॉर्ड कर्मचाऱ्यांना तपासणी करण्याचे निर्देश दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या मते, स्टुडिओचा परिसर दोन हॉटेल्समधील अतिक्रमित क्षेत्रात आहे.
#WATCH | Mumbai: BMC officials arrive at Unicontinental Studio in Khar area of Mumbai. The officials have arrived here with hammers. Details awaited. pic.twitter.com/dLb1O2z3uT
— ANI (@ANI) March 24, 2025
बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते म्हणाले, “स्टुडिओ मालकाने काही तात्पुरते बेकायदेशीर शेड बांधले आहेत, जे आम्ही आता काढून टाकत आहोत. यासाठी कोणत्याही सूचना देण्याची आवश्यकता नाही.” विसपुते यांनी असेही नमूद केले की कोणत्याही बेकायदेशीर गोष्टींसाठी इमारतीच्या आराखड्याची तपासणी केली जात आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने व्यंगात्मक भाष्य केले. मात्र, त्यानंतर मोठा वाद उफाळला आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील कामरा याने सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी खारच्या (मुंबई) युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन तोडफोड केली. या घटनेनंतर तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवर खार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच कुणाल कामरा याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तोडफोडप्रकरणी खार पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले होते. पाठोपाठ आणखी १८ जणांना जणांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, यापैकी राहुल कनालसह अनेकांना पोलिसांनी चौकशी करून सोडून दिलं होतं. पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या १२ कार्यकर्त्यांना काही वेळापूर्वी वांद्रे न्यायालयासमोर हजर केले.
वांद्रे पोलिसांनी राहुल कनाल, कुणाल सरमळकर, अक्षय पनवेलकर, गोविंद पाडी, राहुल तुर्बडकर, विलास चावरी, अमीन शेख, समीर महापदी, हिमांशू, शशांक कोडे, संदीप मळप, गणेश राणे, शोभा पालवे, कृष्णा ठाकूर, पवनज्योत सेठी, कल्पेश, कुरेशी हुजेफ आणि चांद शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच इतर १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.