Sunday, August 10, 2025

Ashish Shelar : ‘येत्या वर्षभरात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रम’

Ashish Shelar : ‘येत्या वर्षभरात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रम’

मंत्री ॲड. आशिष शेलार यांची मोठी घोषणा


पुणे : सांस्कृतिक विभागातर्फे येत्या वर्षभरात राज्यात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. ‘आगामी काळात शास्त्रीय नृत्यसंवर्धन संस्थेच्या माध्यमातून राज्यात मोठे नृत्य संकुल उभारण्यात येणार असून, त्यासाठी सांस्कृतिक विभागातर्फे मदतही करण्यात येणार आहे,’ असे शेलार यांनी सांगितले.


चंद्रकांतदादा पाटील, युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे आयोजित पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाच्या सामारोप सत्रात शेलार (Ashish Shelar) बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अंजली पाटील, नृत्य गुरू मनीषा साठे, शमा भाटे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सर्व पदाधिकारी, आयोजक अजय धोंगडे, भाजपचे शहर सरचिटणीस पुनीत जोशी आदी या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात पंडिता रोहिणी भाटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.



शेलार म्हणाले, ‘पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवातील नृत्याविष्कार हे अविस्मरणीय आहेत. वास्तविक अशाप्रकारचा शास्त्रीय नृत्यासाठी समर्पित असलेला महोत्सव केवळ पुण्यातच होऊ शकतो. पुढच्या वर्षी हा महोत्सव अधिकाधिक भव्यदिव्य करण्यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभागही सहभागी होईल.’विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना निरुपमा आणि राजेंद्र यांचा डौलदार पदन्यास, समर्थ अभिनय आणि आकर्षक हस्तमुद्रा यांचा मेळ जमलेला नृत्याविष्कार हे नामदार चंद्रकांतदादा पाटील आयोजित युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीने प्रस्तुत पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाच्या अखेरच्या सत्राचे प्रमुख आकर्षण ठरले. श्रीकृष्णाच्या रासलिलेवर आधारित कथाभागातून सादर केलेल्या नृत्याविष्कारातून संवेदनशील अभिनयाचे, सुंदर देहबोलीचे दर्शन रसिकांना घडले. तर मनिषा नृत्यालयाने कथ्थकच्या माध्यमातून शिवभूषण सादर केले. या कलाकृतीस रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याशिवाय कलासक्त नृत्य संस्थेने सादर केलेल्या योगिनी या ओडिसी नृत्याविष्कारास आणि उत्तुंग अभिनयाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

Comments
Add Comment