Thursday, October 30, 2025
Happy Diwali

शून्य ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होणार नाहीत

शून्य ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होणार नाहीत

मुंबई: राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ' मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' योजनेद्वारे शाळांचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षण व्यवस्थेतील अडचणी सोडवण्यास शालेय शिक्षण विभागाने प्राधान्य दिले आहे. तसेच शून्य ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नसल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली. सदस्य सुभाष देशमुख यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य रोहित पवार, सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री श्री.भोयर यांनी या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना सांगितले, राज्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, यांच्या सहयोगाने पायाभूत सुविधा व आवश्यक संसाधनाची उपलब्धी सुनिश्चित करून त्या माध्यमातून गुणवत्ता पूर्ण व दर्जेदार शिक्षणाच्या प्रचारासाठी शाळा दत्तक योजना राबविण्यात येत आहे. हा निर्णय शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या अधिनस्त असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी लागू आहे. या योजनेमुळे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा तसेच मराठी शाळा बंद होण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सोलापूर महापालिकेच्या हद्द वाढीनंतर जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेत समावेश संदर्भातील प्रश्नाबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित केली जाईल. प्रत्येक शाळेत शिक्षक नियुक्ती केली जाईल. सीमावर्ती भागातील शाळेबाबतही योग्यती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment