कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत बोलल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे. ही माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप राज्य शासनाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच प्रशांत कोरटकर याला महाराष्ट्रात आणले जाईल. राज्यात आणल्यावर त्याच्या विरुद्धची पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल.
काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरने आपल्याला शिवीगाळ करुन महापुरुषांचा अवमान केला, अशी तक्रार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केली होती. यानंतर एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले. या रेकॉर्डिंगमध्ये इंद्रजीत सावंत यांच्याशी बोलत असलेली व्यक्ती त्यांना शिव्या देत असल्याचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत बोलत असल्याचे ऐकू येत आहे. हे रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा जबाब नोंदवून घेतला. ही कारवाई सुरू असताना आधी मोबाईल हॅक झाला असा दावा करणारा प्रशांत कोरटकर नंतर संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर आता प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.