मुंबई : स्टँडअप कॉमेडियन समय रैना वादानंतर कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने आक्षेपार्ह कविता सादर केली. कवितेचा हा व्हिडीओ पाहून शिवसैनिकांच्या तळपायातील आग मस्तकात गेली. त्यांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेतून निशाणा साधला. उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामराचा कविता सादर करतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. “कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र”, असं संजय राऊत व्हिडीओसोबत म्हणाले आहेत. त्यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत मंत्री उदय सामंत यांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. “पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार कुणाल कामरावर एफआयआर दाखल करण्याच्या मनस्थितीत आहेत. एकनाथ शिंदे यांची बदनामी करणारे ते गाणे असेल आणि अशा पद्धतीने कुणी गाणं गाणार असेल तर आम्ही आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुणीही ऐकून घेणार नाहीत. त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी करु”, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली आहे. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडीओ पाहून संतापलेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली. दरम्यान या घटनेचे पडसाद विधानसभेत पडणार का हे पाहण महत्त्वाचं ठरेल.
काय म्हणाला कुणाल कामरा ?
“ह्यांचं हे राजकारण आहे. परिवारवाद संपवायचा होता, कुणाचा बाप चोरुन घेतला. काय रिप्लाय असेल? मी उद्या तेंडुलकरच्या मुलाला भेटू का की, चल भाई जेवण करुयात. तेंडुलकरचं कौतुक करतो आणि सांगतो, भाई आजपासून तो माझा बाप”, असं कुणाल कामरा कविता सादर केल्यानंतर मिश्किलपणे म्हणाला.