सुनील जावडेकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
नारायण राणे म्हटले की, कोकण आणि कोकण म्हटले की नारायण राणे. गेल्या काही दशकांमध्ये हे प्रस्थापित समीकरण आहे. निवडणुका जिंकल्या अथवा हरल्या म्हणून नारायण राणे यांच्या साम्राज्याला कधीच तडे गेले नाहीत याचे प्रमुख कारण होते ते म्हणजे त्यांची भक्कम तटबंदी. प्रेम, विश्वास आणि कार्यकर्त्याला दिलेली ताकद या बळावर नारायण राणे यांनी त्यांचे हे साम्राज्य अक्षरशः शून्यातून निर्माण केले. राणे यांनी हे साम्राज्य उभे करताना कोकणाचा सर्वांगीण विकास आणि कोकणी जनतेचा विकास हे डोळ्यांसमोर ठेवून अखंड, अविरतपणे कोकणासाठी आणि मग महाराष्ट्रासाठी स्वतःला यात पूर्णपणे झोकून दिले. काही महिन्यांकरता मिळालेले राज्याचे मुख्यमंत्रीपद असो विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद असो की महसूल खात्याचे अथवा उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद असो की, अगदी आता आता केंद्रात मिळालेले अवजड उद्योग खात्याचे मंत्रीपद असो नारायण राणे यांनी सर्वकाळ महाराष्ट्रासाठी आणि विशेष करून कोकणासाठी, कोकणी जनतेसाठी या पदांचा सर्वाधिक वापर कसा करता येईल कोकणी जनतेचे जीवनमान कसे उंचावता येईल यालाच सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच शनिवारी महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी जो मुक्त संवाद अथवा आपण त्याला मुक्त चिंतन केले असे म्हणू त्यामध्ये त्यांनी आज मी आहे … उद्या असेन…, नसेनही… हे त्यांचे शब्द त्यांच्यावर निर्व्याज प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी तसेच पत्रकारांसाठीही मनाला चटका
लावून गेले.
कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कोकणी माणूस मुंबईसह महाराष्ट्रात त देशभरात आणि अगदी विदेशातही ताठपणाने उभा राहण्यासाठी नारायण राणे नावाचा हा कल्पवृक्ष असाच चिरंतन काळ व असाच यापुढेही बहरत राहिला पाहिजे हीच कोकणातील सर्वसामान्य जनतेची आणि राणेंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे. नारायण राणे या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे जर कोणते वैशिष्ट्य असेल तर हे की, त्यांनी सर्वप्रथम कोकणाला राज्याच्या राजकारणात चर्चेत आणले. आणि केवळ चर्चेत आणून राणे स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी कोकणाला स्वतंत्र राजकीय प्रतिष्ठा देखील प्राप्त करून दिली. अर्थात नारायण राणे यांच्यापूर्वी बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते यांनी देखील कोकणचे नाव उज्ज्वल नक्कीच केले, यात दुमत नाहीच, तथापि समग्र कोकण पट्ट्याचा एकत्रित विचार हा नारायण राणे यांच्या राजकीय उदयानंतर राजकारणात होऊ लागला ही वस्तुस्थिती आहे.
मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक येथून सुरू झालेला नारायण राणे यांचा हा प्रवास खरंतर ते जेव्हा १९९५ साली महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले त्यानंतर खऱ्या अर्थाने नारायण राणे यांचे नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने समजू उमजू लागले. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे हे महसूल खात्याचे कॅबिनेट मंत्री होते आणि नंतर मनोहर जोशींना मुख्यमंत्री पदावरून शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दूर केल्यानंतर नारायण राणे हे तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तम जाण, सर्वांगीण विकासाची जागृत दृष्टी, त्यासाठी आवश्यक असलेला तपशीलवार अभ्यास, प्रशासकीय सनदी अधिकाऱ्यांशी उत्तम समन्वय, विकासाच्या आड येणारा कोणीही असो त्याला अंगावर घेण्याची आणि विकासकामे पुढे नेण्याची बाणेदार आणि लढवय्या वृत्ती आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे विश्वासू प्रामाणिक सहकाऱ्यांची मिळालेली भक्कम साथ यामुळे नारायण राणे यांचे नेतृत्व हे महाराष्ट्राच्या नकाशावर खऱ्या अर्थाने तळपून तेजपुंज ठरणारे बनले. परखड आणि स्पष्ट वक्तेपणामुळे नारायण राणे हे नेहमीच चर्चेत राहिले. अगदी कालच्या शनिवारच्या त्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच्या मनोगतात देखील त्यांनी हे सांगितले की त्यांच्यातील नियत आणि नितीमत्ता यांच्यापेक्षा पद आणि पैसा हा त्यांनी कधीच श्रेष्ठ मानला नाही. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल त्यांनी सदैव कृतज्ञताच बाळगली. त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी जरूर राजकीय हाडवैर राहिले आणि जर का हे हाडवैर नसते तर १९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नारायण राणे हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते आणि कदाचित त्यामुळे आज जो काही महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे एवढी विदारक परिस्थिती महाराष्ट्रावर आणि शिवसेनेवरही निश्चितच आली नसती. मात्र या जर तरच्या गोष्टींना राजकारणात काही स्थान नसते.
कोकणी माणूस आणि कोकण हा नारायण राणे यांच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा सदैव आस्थेचा विषय राहिला आहे. कोकणातल्या खेडोपाडी अगदी दूरगामी वाडी वस्तीवर देखील पोहोचलेले डांबरी रस्ते हे नारायण राणे यांच्या कामाचे प्रतिबिंब आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना कोकणातच वैद्यकीय शिक्षणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरता नारायण राणे यांनी स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय, तर सुरू केलेच मात्र त्याच बरोबर कोकणातील गोरगरीब जनतेला तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयाची देखील त्यांनी सुविधा उपलब्ध केली. निसर्गाचे अद्भुत सौंदर्य लाभलेल्या कोकणाला आणि विशेषता सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांना राज्य सरकार केंद्र सरकार यांच्यामार्फत अधिकाधिक विकास निधी कसा उपलब्ध होईल आणि कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये कशी मजबूती आणता येईल या दृष्टीने नारायण राणे हे सदैव प्रयत्नशील असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला विशेष पर्यटन जिल्ह्याचा दर्जादेखील नारायण राणे यांच्या अथक परिश्रमाची फलश्रुती आहे. अर्थात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे , राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे हे कोकणसाठी कोकणच्या विकासासाठी, कोकणी माणसाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना विकासकामांमध्ये कोकणातील जनतेनेही राणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. कोकणातील दळणवळणाच्या सुविधा अधिक विस्तारित आणि व्यापक झाल्या पाहिजेत. गोव्यात येणारे विदेशी पर्यटक देशी पर्यटक हे हळूहळू गोव्याप्रमाणे सिंधुदुर्गात देखील येऊ लागले आहेत. तथापि या देशी विदेशी पर्यटकांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढण्याची गरज आहे. आणि जर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन जिल्हा म्हणून पूर्णतः विकास करायचा असेल, तर मोठ्या संख्येने गोव्यातील पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वळले पाहिजेत. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याने देखील पर्यटन प्रेमी वातावरण निर्माण केले पाहिजे. स्थानिकांनी यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला पाहिजे. राज्य सरकारने देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी पायाभूत सोयीसुविधा या अधिक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. निळे शार स्वच्छ समुद्रकिनारे हे खरे तर कोकणची संपत्ती आहेत. कोकणातील पर्यटन वाढीसाठी या समुद्रकिनाऱ्यांचा विकास करून तेथे पर्यटन आणि पर्यटनाबरोबरच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजेत. कोकणचा हा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता, धमक आणि दूरदृष्टी ही माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आणि त्याचबरोबर आमदार निलेश राणे या तिघांच्या नेतृत्वात आहे. खासदार नारायण राणे हे कोकण साठी खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष आहेत जर या पुढील काळात कोकणचा सर्वार्थाने विकास करून घ्यायचा असेल तर नारायण राणेरूपी हा कल्पवृक्ष हा यापुढेही भविष्यकाळात असाच बहरत राहिला पाहिजे.