Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Nitesh Rane : भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये सक्षम करू - पालकमंत्री नितेश राणे

Nitesh Rane : भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये सक्षम करू - पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग : पुस्तके अथवा ग्रंथ यांच्यासारखा दुसरा गुरू नाही, असे म्हटले जाते. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान महत्त्वाचे आहे. भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये अधिक सक्षम करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने दोनदिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन सिंधुनगरी येथील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनामध्ये करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, मुंबईचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुंबई विभागाचे प्र. सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, कोकण मराठी साहित्य परीषदेचे अध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह राजन पांचाळ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण चांगले आहे. राज्यामध्ये पहिल्या १० क्रमांकामध्ये आपला जिल्हा आहे. १० वी आणि १२ वीचा निकालही १०० टक्के लागतो. वाचनाची आवड असणारा फार मोठा वर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आपला जिल्हा 'साहित्यिकांची खाण' म्हणून देखील ओळखला जातो. पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक हे या जिल्ह्याचे सुपुत्र आहे. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. भावी पिढीला आपण वाचणाची सवय लावून त्यांना ग्रंथालयांमध्ये वाचणासाठी पाठवले पाहिजे. ग्रंथोत्सवामध्ये येऊन त्यांनी पुस्तके खरेदी केले पाहिजे. जिल्ह्यामध्ये १२८ ग्रंथालये आहेत, कणकवली येथील ग्रंथालयाचा मी अध्यक्ष आहे. जिल्ह्यामध्ये भविष्यात 'डिजिटल ग्रंथालय' सुरू करण्याचा माझा मानस आहे. भावी पिढीमध्ये वाचन संस्कृतीची आवड निर्माण करण्यासाठी डिजिटल ग्रंथालय व आवश्यक सोयी सुविधा निर्माण करू असेही ते म्हणाले. ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने सकाळी ग्रंथ पूजन व ग्रंथदिंडीचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ओरोस फाटा ते पत्रकार भवन असे आयोजन करण्यात आले होते.

Comments
Add Comment