
न्यायमूर्ती सौमित्र सेन असोत की, न्यायमूर्ती शमित मुखर्जी असोत की न्यायमूर्ती पीडी दिनकरन यांना लाच म्हणून रोख रक्कम घेताना पकडण्यात आले आणि त्यांना शिक्षा झाली किंवा त्यांनी मध्येच आपले पद सोडले. पण त्यांना शिक्षा झाली. त्यातच आता न्यायमूर्ती वर्मा यांची भर पडली आहे. जेव्हा अन्य संस्थांवरील लोकांचा विश्वास उडाला आहे तेव्हा तर न्यायपालिकेने आपले काम अत्यंत दक्ष राहून केले पाहिजे. पण तेच होत नाही ही देशाची शोकांतिका आहे. आता न्या. वर्मा यांचे व्हायचे ते होईल आणि त्यांना शिक्षाही केली जाईल. शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध नागरिकाला शिक्षा दिली जाऊ नये असे न्यायदानाचे तत्त्व आहे. पण या न्यायाधीशांनी न्यायाच्या या तत्त्वालाच हरताळ फासला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी इन हाऊस चौकशी सुरू केली आहे, पण वर्मा यांना ठेवायचे की, नाही याचा निर्णय तेच घेतील. पण वर्मा यांच्या कृत्याने एक बाब मात्र स्पष्ट केली आहे ती म्हणजे न्यायमूर्ती वर्मा हे आपले कर्तव्य बजावण्यास पात्र नाहीत आणि त्यांनी न्यायव्यवस्थेचा विश्वास ढासळायला हातभार लावला आहे. ते जर खरेच दोषी असतील तर त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण त्यांनी न्यायावरील विश्वास कमी केला आहे आणि यासाठी ते गुन्हेगारांपेक्षाही जास्त गुन्हेगार आहेत. कारण गुन्हेगार तर गुन्हेगारच असतो आणि लोकांना तसा तो आहे असे वाटतच असते. पण न्यायमूर्ती किंवा पोलीस अधिकारी जेव्हा भ्रष्ट होतात तेव्हा त्यांचे पतन जास्त वेदनादायक असते. तेच न्या. वर्मा यांनी दाखवून दिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या सदस्यानी म्हटले आहे की वर्मा यांची केवळ बदली झाली, तर न्यायव्यवस्थेची प्रतिमा खराब होईल. कारण न्यायपालिका असो किंवा सरकार असो किंवा कोणतीही एखादी संस्था, तिचे नाव आणि तिचा लौकिक परसेप्शनवर अवलंबून असतो. तोच जर गेला तर काहीही केले तरी तो परत मिळवता येणार नाही. न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारी आवश्यक आहे आणि त्यामुळेच राज्यसभेत या विषयावर चर्चा होणार आहे. पण नुसती चर्चा होऊन काही उपयोग नाही, तर संबंधितांना जर ते दोषी असतील, तर यथार्थ शिक्षा झाली पाहिजे आणि तसे दिसले पाहिजे. कारण वर्मा असोत किंवा एखादा न्यायाधीश, काही सामान्य गुन्हेगार नाहीत, तर न्यायव्यवस्थेत उच्च पदांवर काम करणारे लोक आहेत. त्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे. कारण शेवटी सीझर हा सर्वांच्या वर असला पाहिजे आणि त्याचे आयुष्य संशयातीत असले पाहिजे असे ग्रीक तत्त्वज्ञान सांगते. वर्मा यांना जर ते खरोखरच दोषी असतील तर त्यांना योग्य ती शिक्षा होईल हे न्यायव्यवस्थेत बसलेल्या सीझरचे काम आहे. वर उल्लेखलेल्या न्यायाधीशाचे निर्दोषत्व सिद्ध झालेले नाही असे असतानाही त्यांची बदली करण्याचे काम चुकीचे आहे. त्यामुळे त्यांना पुरेसे निरपराधित्व सिद्ध केल्यानंतरच त्यांच्याबाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा असे सर्व भारतीयांचे म्हणणे आहे. कारण न्यायपालिका सर्वश्रेष्ठ आहे आणि न्यायपालिकेची कसोटी या निमित्ताने लागली आहे.