मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरातील ८० ते १०० वर्षे जुन्या उपकरप्राप्त (सेस) इमारतीत राहणाऱ्या तब्बल एक हजार ५०० कुटुंबांच्या डोक्यावर अतिधोकादायक छप्पर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्या सेस इमारती कोसळून अपघात होऊ नये, यासाठी म्हाडाकडून या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. त्यानुसार गेल्या दीड-दोन महिन्यांत केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या इमारती अतिधोकादायक वर्गवारीत येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या इमारती रिकाम्या करून रहिवाशांना सुरक्षित इमारतींमध्ये स्थलांतरित करण्याचे म्हाडासमोर आव्हान आहे.
म्हाडा MHADA मुंबईत सध्या १२ हजारांहून अधिक उपकरप्राप्त जुन्या इमारती आहेत. त्यांची दुरुस्ती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती च पुनर्रचना मंडळाकडून केली जाते. मात्र अनेक इमारती पुरत्या जीर्ण झाल्या असून, त्या दुरुस्तीपलीकडे गेल्या आहेत. पावसाळ्यात या इमारती कोसळून अपघात घडू नये, यासाठी म्हाडाने प्रथमदर्शनी धोकादायक दिसणाऱ्या ५२५ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट फेब्रुवारीमध्ये सुरू केले होते. त्यापैकी ३५० इमारतींचे अहवाल आले असून, त्यामध्ये ५० इमारती सी-१ म्हणजे अतिधोकादायक गटात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या इमारती दोन-तीन मजली असून, त्यामध्ये प्रत्येकी २५ ते ३० कुटुंबे अशी एकूण सुमारे १ हजार ५०० कुटुंबे वास्तव्याला आहेत. दरम्यान, याबाबत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अतिधोकादायक इमारती रिकाम्या कराव्यात, यासाठी म्हाडाकडून संबंधित रहिवाशांना ७७ ब अंतर्गत इशारा नोटीस दिल्या जाणार आहेत. तसेच त्यांना संक्रमण शिबीर देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.