प्रा. देवबा पाटील
त्या दिवशी असेच ते दोघेही फिरायला निघाले. बाहेर हिरवागार निसर्ग हवेच्या झुळकांवर आनंदात डोलत होता. मनाला आकर्षून घेत होता. पाने-फुले हवेसोबत सळसळत होते. विविध रंगी रानफुले मनाला मोहून घेत होती. निसर्गाच्या आनंदात स्वरूपच्या आनंदालाही बहार आला होता. “आजोबा, वेगवेगळ्या झाडांच्या फुलांना वेगवेगळा रंग का असतो?” स्वरूपने प्रश्न केला. आनंदराव म्हणाले, “फुलांच्या रंगांचे तुला कुतूहल आहे ना! तर मग ऐक. आपण निसर्गात खूप वेगवेगळ्या रंगांची फुलझाडं बघतो. या निरनिराळ्या फुलांच्या पाकळ्यांच्या पेशींमध्येसुद्धा वेगवेगळ्या रंगांची रंगद्रव्ये असतात. ही विविध रंगद्रव्येच फुलांच्या पाकळ्यांना रंग देतात. जर एखाद्या एकाच फुलाच्या वेगवेगळ्या पाकळ्यांमध्ये विविध प्रकारची रंगद्रव्ये असल्यास त्या एकाच फुलाच्या वेगवेगळ्या पाकळ्यांना एकापेक्षा जास्त रंग येतात व अशी बहुरंगी फुले आणखीच आकर्षक व सुंदर दिसतात.” “फूल कसे उमलते हो आजोबा?” स्वरूपने प्रश्न केला. “सहसा फुलं ही सकाळी सूर्योदयानंतर उमलतात, पण काही फुलं सकाळी १० वाजता उमलतात. उदा. बटनगुलाब, काही सायंकाळी फुलतात. उदा. गुलबास. तर रातराणी ही रात्रीच उमलते. ब्रम्हकमळ तर वर्षातून एकदा व तेही मध्यरात्रीच फुलते. तसेच काही फुले ही ठरावीक ऋतूतच उमलतात. तर कळी वाढत असताना अगदी हळूहळू तिची उष्णताही वाढत असते. ज्यावेळी तिची पूर्ण वाढ होते त्यावेळी तिची उष्णताही पूर्णपणे वाढते. या वाढलेल्या उष्णतेमुळे कळीच्या पाकळ्या उमलतात व तिचे रूपांतर फुलात होते.” आनंदरावांनी सांगितले.
“फुलांवर माशा, कीटक, फुलपाखरे का बसतात आजोबा?” स्वरूपने विचारले. “फुलांमध्ये एक प्रकारचा गोड पातळ द्रव असतो. त्यालाच मध म्हणतात. मध हे मधमाश्यांचे अन्न असते. फुलांना आकर्षक रंग असतो, मोहक सुगंध असतो, ती दिसायला सुंदर असतात, फुलांमध्ये मध असतो म्हणून माशा, कीटक, फुलपाखरे फुलांवर बसतात. जेव्हा या माशा, कीटक किंवा फुलपाखरे फुलांवर बसतात तेव्हा त्यांच्या पायांना त्या फुलातील परागकण चिकटतात. त्या फुलावरून उडून ते दुसऱ्या फुलावर जाऊन बसतात. त्यावेळी त्यांच्या पायांना चिकटलेले परागकण त्या दुसऱ्या फुलावर पसरल्यामुळे फलोत्पादनाला मदत होते. त्याचा परिणाम म्हणजेच फुलात बी जन्मास येते.” आजोबांनी खुलासा दिला. “फुलांना सुगंध कसा काय येतो?” स्वरूपने विचारले. “प्रत्येक फुलाच्या पाकळ्यांवर विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी विखुरलेल्या असतात. त्यांना सुगंधी ग्रंथी म्हणतात. याच ग्रंथी फुलांत सुगंध तयार करतात. ज्यावेळी फूल उमलत जाते त्यावेळी या ग्रंथी त्यांचा गंध हळूहळू सभोवती सोडावयास लागतात व पूर्णपणे उमललेल्या फुलांचा सुगंध हवेने आजूबाजूच्या वातावरणात दरवळण्यास लागतो. जशी वेगवेगळ्या झाडांच्या फुलांच्या पाकळ्यांच्या पेशींमध्ये वेगवेगळी रंगद्रव्ये असतात तशीच वेगवेगळ्या झाडांच्या फुलांच्या सुगंधी ग्रंथींमध्ये वेगवेगळी सुगंधी द्रव्ये असतात. त्यामुळे वेगवेगळ्या झाडांच्या फुलांचा सुगंध हा वेगवेगळा येतो. समजलं?” आनंदरावांनी विचारले. “हो आजोबा. समजले, पण आपणास फुलांचा सुगंध कसा येतो?” स्वरूप म्हणाला.
आजोबा म्हणाले, “फुलांचा सुगंध वातावरणात दरवळतो म्हणजे हवेतील तापमानामुळे फुलांतील सुगंधी द्रव्याची वाफ होते व ती वातावरणात हवेसोबत पसरते. हा सुगंधी वायू नाकात शिरल्यानंतर नाकातील वरच्या भागात त्याचे द्रवीकरण होते.”
“द्रवीकरण म्हणजे काय हो आजोबा.” स्वरूप मध्येच बोलला.
“वायूचे द्रवात रूपांतरण म्हणजेच द्रवीकरण. कोणत्याही द्रवाच्या वाफेचे पुन्हा त्या द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेला द्रवीकरण म्हणतात. तर असे सुगंधी वायूचे नाकात होणाऱ्या द्रवीकरणामुळे नाकातील गंधपेशी उत्तेजित होतात आणि गंधवाहिन्यांद्वारा तो संदेश मेंदूतील वास केंद्राकडे जातो आणि आपणास फुलाचा वास येतो.” आनंदरावांनी सांगितले.
आपल्या आजोबांसोबत अशा छान छान ज्ञानवर्धक गप्पा करत स्वरूप घरी परत आला व स्नान करण्यासाठी स्नानगृहात गेला.