Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीआला आला उन्हाळा, तब्येत आपली सांभाळा!

आला आला उन्हाळा, तब्येत आपली सांभाळा!

मुंबई: सध्या उन्हाळा सुरु झाला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. भारतात हवामान खाते व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निकषानुसार मैदानी भागात 40 डिग्री अंश सेल्सीअस, डोंगराळ भागात 30 डिग्री अंश सेल्सीअसपेक्षा व समुद्र किनारी भागात 37 अंश डिग्रीपेक्षा जास्त तापमान जात असल्यास त्यास उष्मलाट प्रवण क्षेत्र मानले जाते. उष्मा-लहर ही वातावरणीय तापमानाची स्थिती आहे. ज्यामुळे शारीरिक ताण येतो, ज्यामुळे कधीकधी मानवी जीवनावर अतिशय विपरीत परिणाम होत असतो. कोणत्याही ठिकाणचे कमाल तापमान सलग दोन दिवस 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्यास त्याला उष्मा लहरी स्थिती म्हणतात.

वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी, उपाययोजना याची माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्यात येत आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या तापमानाचा पारा 37 ते 39 अंशापर्यंत पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा पुढील तीन महिने 42 ते 45 अंशांच्या घरात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात. त्यामुळे त्यांना उष्माघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन यासह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उष्माघात होण्याची कारणे :

शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.

लक्षणे :

मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, घाम न येणे, डि-हायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था इत्यादी लक्षणे आहेत.

अति जोखमीच्या व्यक्ती

बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदय रोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार अशा व्यक्तींना अति जोखीम आहे.

प्रतिबंधात्मक उपाय :

वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे. पाणी भरपूर प्यावे. डि-हायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादीचा वापर करावा. घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्याना सोडू नका. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.

उपचार :

रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत, रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आसल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी द्यावे व डि-हायड्रोशन टाळावे. चहा, कॉफी देवू नये. रुग्णाच्या काखेखाली आइस पॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्टया ठेवाव्यात. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत. नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. रुग्णास रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास 108 ॲम्बुलन्ससाठी कॉल करावा.

उष्माघात ही गंभीर स्थिती असून वेळीच उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. त्याची लक्षणे ओळखून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. गरम वातावरणात स्वतःची काळजी घेणे आणि इतरांनाही सावध करणे गरजेचे आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी तीव्र उन्हात फिरु नये, आरोग्याची काळजी घ्यावी. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी वरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -