Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Shahid Diwas : २३ मार्च शहिद दिवस का साजरा केला जातो ?

Shahid Diwas : २३ मार्च शहिद दिवस का साजरा केला जातो ?

मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरात शहीद दिवस (shahid diwas) साजरा केला जातो. इंग्रजांनी २३ मार्च रोजी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या भारतमातेच्या वीर पुत्रांना फाशी दिली होती. या वीर पुत्रांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. त्यामुळेच आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.

भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांनी का दिली फाशी ?

इंग्रजांनी भारतीयांसाठीच्या तयार केलेल्या कायद्यांमध्ये बदल करण्याबाबत अभ्यास करुन शिफारशी करण्यासाठी सायमन आयोग अर्थात सायमन कमिशन नेमले होते. भारतीयांसाठीचे कायदे इंग्रजांनी तयार करण्याला विरोध म्हणून भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता. ‘सायमन परत जा’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारात लाला लजपतराय जखमी झाले. काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १९२८ मध्ये घडली. क्रांतिकारकांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या लाहोर पोलिस ठाण्यातील इंग्रज अधिकारी साँडर्स याला ठार मारण्याचे ठरवले. त्याप्रमाणे लाला लजपतराय यांच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष बदलून पोलिस अधिकाऱ्यांच्‍या निवासस्थानाकडे गेले. साँडर्स दिसताच सुखदेव यांनी संकेत दिला. भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळ्या झाडून त्याचा बळी घेतला. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन. पी. साँडर्सची हत्या केली. याच प्रकरणात दोषी ठरवून २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात तिन्ही क्रांतीकारकांना फाशी देण्यात आली होती. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उठलं. त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली.

Comments
Add Comment