Tuesday, April 22, 2025

सरपंच आजी…

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे

साठीच्या आसपास आले की, बहुतांश लोक निवृत्तीचा विचार करतात. निवृत्तीमधून मिळालेल्या पैशातून गावी घर बांधायचे. नातवंडांना खेळवायचे आणि शांततेत आपला वृद्धापकाळ व्यतीत करायचा. ती मात्र वेगळ्या विचारांची होती. निवृत्तीच्या वयात तिला गावासाठी काहीतरी करायचे होते. त्यासाठी ती निवडणूक लढली. जिंकली आणि गावाची सरपंच देखील झाली. ही गोष्ट आहे तामिळनाडूमधील ९० वर्षांच्या वीरम्मल पाटी या सरपंच आजीची.

तामिळनाडूमधल्या मदुराईतील अरित्तापट्टी गाव. या गावाची तामिळनाडू सरकारने राज्याचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून निवड केली होती. या गावची सरपंच आहे ९० वर्षीय वीरम्मल पाटी (तमिळमध्ये पाटी म्हणजे आजी). तामिळनाडूमध्ये १२,५२५ सरपंच आहेत. त्यातील वीरम्मल आजी ही सर्वांत वयोवृद्ध सरपंच म्हणून ओळखली जाते. आजीच्या वयाची आहे म्हणून कोणालाही वाटेल की ती वयोमानानुसार विसरत असेल. मात्र वीरम्मल आजीची बुद्धी आज देखील तल्लख आहे. भूतकाळातील अनेक घटना जशीच्या तशी सांगण्याची तिची क्षमता आहे.

या गावातच वीरम्मल आजीचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. गावातल्याच तरुणासोबत तिचा विवाह देखील झाला. तरुणपणी तिने महिलांना एकत्र आणत बचतगटाची स्थापना केली. त्यांना शेतीसाठी कर्ज मिळविण्यास मदत केली. इतकंच नव्हे तर या महिलांच्या कौटुंबिक वाद सोडविण्यात पुढाकार देखील घेतला. वीरम्मल आजीचा भाऊ गावाच्या विकासासाठी काम करत असे. तिचे पती वर्षभर पंचायतीचे उपाध्यक्ष होते. २००६ आणि २०११ मध्ये वीरम्मल आजीने स्वतः पंचायत निवडणूक लढवली. २०२० मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी तिसऱ्यांदा निवडणूक लढवत तिने विजय मिळवला. गावासाठी समर्पित भावनेने केलेले काम गावकऱ्यांना भावले. यासाठी गावच्या लोकांनी, विशेषतः महिलांनी तिला एकमताने सरपंच म्हणून निवडले. आपल्या गावाची आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेणाऱ्या वीरम्मल आजीचा खऱ्या अर्थाने तो हक्कच होता असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात, वीरम्मल यांनी चार पाण्याच्या टाक्या बांधल्या. पाणवठ्यांवर जाण्यासाठी पूल बांधले. केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ३०० घरांना पिण्याचे पाणी पुरवण्यास मदत केली. एका अंगणवाडी शाळेचा कायापालट केला. बहुतेक ठिकाणी रस्त्यावरील दिवे बसवले आहेत. खराब झालेले दिवे विक्रमी वेळेत बदलले आहेत; परंतु गावात तातडीने लक्ष देण्याची गरज असलेल्या शिक्षण आणि रस्त्यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर काम करणे हे वीरम्मलसाठी एक कठीण काम आहे. विकासाचे अनेक टप्पे पार करून देखील गावात प्रचलित असलेल्या सत्तेच्या राजकारणापासून आणि पुरुषप्रधानतेपासून ती वाचू शकली नाही.

एक महिला, त्यात वयोवृद्ध महिला, जिने अंथरुणाला खिळून राहून शेवटच्या घटका शांतपणे मोजत आपले शेवटचे दिवस आरामात घालवावे त्याऐवजी ती तिशीतल्या तरुणीला लाजवेल अशा ऊर्जेने गावाचा विकास करते हे विरोधी पक्षाला खटकते. या मत्सरेतून विरोधी पक्षातील अनेक लोक वीरम्मलच्या प्रत्यक्ष काम करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण करतात. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी येथे पूर्वी विविध पदांवर काम केले असल्याने, आपल्या प्रभावाचा / बळाचा वापर करून ती राबवत असलेले प्रकल्प थांबवतात किंवा पुढे ढकलतात, अशी माहिती अरितापट्टीचे ग्राम वन समिती प्रमुख आर. ओदयन देतात. गेल्या अनेक वर्षांपासून, त्या अनुसूचित जातीच्या महिलांसाठी शौचालये, रस्ते आणि नवीन कॅम्पस बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.

गावात भरपूर पडीक जमीन (जमीन जी महसूल नोंदींमध्ये येत नाही) आहे. जी विकासात्मक प्रकल्पांसाठी वापरण्याचा प्रयत्न ती करते; परंतु विरोधी पक्षाचे लोक या जमिनींवर त्यांचा हक्क सांगून या प्रकल्पांना पुढे जाऊ देत नाहीत. ते गावातील लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न देखील करतात. सर्वत्र राजकारण आहे हे खरे असले तरी, येथे परिस्थिती आणखी कठीण होते कारण विरोधकांना माहीत आहे की वीरम्मल आजी या वयात मंजुरी मिळविण्यासाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात धावू शकणार नाही. पण ही आजी हार मानण्यातली नाही. ती दररोज पहाटे ५ वाजता उठते. स्वतःचे जेवण स्वतः बनवते. ज्या दिवशी तिला पंचयातीच्या कार्यालयात जाण्याची गरज नसते तेव्हा ती शेतावर काम करते. असे असले तरी ती दररोज पंचायत कार्यालयात जाण्याचा प्रयत्न करते. हाती घेतलेल्या प्रत्येक प्रकल्पाच्या स्थितीबद्दल माहिती घेत राहते.

‘‘या पृथ्वीवरील माझा वेळ संपण्यापूर्वी मी माझ्या गावासाठी जे काही करू शकते ते करू इच्छिते,” अशी वीरम्मल आजीची जिद्द आहे. “तिला भेटून अरितापट्टीच्या विकासासाठीच्या आमच्या योजनांवर चर्चा करणे हा किती सन्मान आहे,” असे गौरवोदगार तमिळनाडूच्या पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागातील तत्कालिन अतिरिक्त मुख्य सचिव, आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी सोशल मीडियावर काढले होते. वय हा फक्त आकडा असतो. ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असते ती जिद्द आणि सातत्य. वीरम्मल आजीने हे सिद्ध केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -