भालचंद्र ठोंबरे
ल्व हा वृषपर्वाचा लहान भाऊ अजक यांच्या वंशात उत्पन्न झालेला मार्तिकावतचा राजा होता. शिशुपाल व रुक्मिणीचा मित्र होता. रुक्मिणी हरणाच्या प्रसंगी कृष्णाशी युद्ध करण्यासाठी शाल्वही सरसावला होता. मात्र यादवानी त्याला पराभूत केले तेव्हा त्याने यादवांना पृथ्वीवरून नष्ट करीन व त्यांचे नाव पुसून टाकीन अशी प्रतिज्ञा केली. आपल्या ध्येय प्राप्तीसाठी शाल्वने भगवान शंकराची आराधना व तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले, तेव्हा शाल्वने आपण मला असे एक विमान द्या जे माझ्या इच्छेनुसार कोठेही जाऊ शकेल व देव, दानव, असुर, मनुष्य, गंधर्व, नाग, राक्षस यापैकी कोणालाही ते नष्ट करता येणार नाही व यदुवंशी यासाठीही ते भयानक ठरेल. महादेव तथास्तु म्हणाले.
भगवान शंकराच्या आज्ञेने मय राक्षसाने लोखंडाचे सौभ नावाचे विमान तयार करून शाल्वला दिले. भयंकर वेगाने उडणारे ते विमान म्हणजे जवळजवळ एक मोठे नगरच होते. त्याच्या गतीमुळे त्याला पकडणे अतिशय कठीण होते. शाल्वने मोठ्या सेनेसह द्वारकेवर स्वारी केली. द्वारकेला वेढा घालून नगरातील इमारती, गोपुरे, राजवाडे, नष्ट करू लागला. वादळे निर्माण करून द्वारकेच्या जनतेला त्रस्त केले. हे पाहून प्रद्युमना रथावर आरूढ होऊन व नगरवासीयांना धीर देऊन शाल्वशी युद्धासाठी निघाला. त्याच्यासोबत सात्यकी, चारूदेष्ण, सांब, अक्रूर, कृतवर्मा, भानुविंद, गद, शुक, सारण, आदी विरही निघाले. शाल्व व यादवांचे घनघोर युद्ध झाले. शाल्वचे विमान क्षणात एका ठिकाणी तर क्षणात दुसऱ्या ठिकाणी दिसे, कधी आकाशात तर कधी पाण्यावर तरंगताना दिसे. त्यामुळे त्याच्यावर वार करणे अशक्य ठरत असे, शाल्वच्या सेनापतींनी सुद्धा यादवांवर बाणांचे वर्षाव करून त्यांना भयभीत करून सोडले. शाल्वाच्या द्यूमान नामक बलवान मंत्र्याने प्रद्युमनावर पोलादी गदेचा वार करून त्याला बेशुद्ध केले.
प्रद्युमनाच्या सारथ्याने सारथी धर्मानुसार त्याचा रथ रणभूमीवरून दूर नेला. शुद्धीवर आल्यावर प्रद्युमनाने आपला रथ रणभूमीवरून बाजूला आणल्याबद्दल सारथ्याला दूषणे दिली मात्र आपले कृत्य सारथी धर्माला अनुसरूनच होते असे सारथ्याने प्रद्युमनाला म्हटले. प्रद्युमनाने सारथ्याला आपला रथ वीर द्युमान समोर नेण्यास सांगितले. द्युमान व प्रद्युम्न यांच्यात घनघोर युद्ध होऊन प्रद्युमनाने द्युमानचा शिरच्छेद केला. यावेळेस श्रीकृष्ण इंद्रप्रस्थला गेले होते. तेथे त्यांना अपशकन होऊ लागल्याने ते त्वरित द्वारकेकडे निघाले. द्वारकेला पोहोचताच बलरामाकडे द्वारकीचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवून भगवान श्रीकृष्ण रणभूमीवर निघाले. शाल्व हा मायावी युद्धातही तरबेज होता. शाल्वने एका मागून एक बाण चालवून भगवान श्रीकृष्णांच्या हातावर प्रहार केल्याने भगवंताच्या हातून धनुष्य गळून पडले. हे पाहून शाल्व श्रीकृष्णची अपमानजनक शब्दाद्वारे निंदानालिस्ती करू लागला, व गर्वोक्ती पूर्ण विधाने करू लागला. हे पाहून श्रीकृष्णाने शाल्व वर गदेने प्रहार करताच तो रक्त ओकून थरथर कापून अदृश्य झाला.
त्याचवेळी एका सैनिकाने श्रीकृष्णाला येऊन शाल्वने आपले पिता वसुदेव यांना बांधून नेल्याचा संदेश दिला. तो ऐकून मनुष्य धर्मानुसार श्रीकृष्णाला पितृ प्रेमामुळे अत्यंत दुःख झाले. त्याचवेळी शाल्व वसुदेवासारख्या माणसाला घेऊन युद्धभूमीवर प्रकट झाला व त्याने हिम्मत असेल तर आपल्या पिताला वाचव असे श्रीकृष्णाला म्हणून तलवारीने वसुदेवाचे मस्तक उडविले व तो आपल्या विमानात जाऊन बसला. सर्वज्ञानी असूनही पित्यावरील प्रेमामुळे श्रीकृष्ण सामान्य माणसाप्रमाणे शोकाकुल झाले. मात्र ही शाल्वची माया असल्याचे जाणून लगेच भानावर आले. तोपर्यंत युद्धभूमीवरून संदेश आणणारा दूत तसेच मायावी वसुदेवही अदृश्य झाले होते. श्रीकृष्णाने आपल्या बाणांच्या प्रहाराने शाल्वचे मुकुट कवच व धनुष्य छिन्ह विच्छीन्न केले व गदेच्या प्रहाराने त्याच्या विमानाचे तुकडे तुकडे केले. विमानातून शाल्व गदा घेऊन श्रीकृष्णावर धाऊन आला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा हात वरचेवर छाटून टाकला व सुदर्शन चक्राच्या साहाय्याने शाल्वचा शिरच्छेद केला.