Sunday, April 20, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलप्रियाची झोप...

प्रियाची झोप…

रमेश तांबे

प्रियाने दप्तर पाठीवर अडकवलं आणि आईला टाटा करून ती शाळेत निघाली. आई म्हणाली, “अगं प्रिया, खाऊचा डबा, पाण्याची बाटली सगळं सोबत घेतलं आहेस ना!” तोच प्रिया म्हणाली, अगं अगं आई मी नाही विसराळू सगळ्या गोष्टी घेतल्यात बरे नेहमीच बोलते मी खरे! प्रियाने पुन्हा एकदा आईला टाटा केला आणि ती घराबाहेर पडली. रस्त्याने तिच्या अनेक मैत्रिणी तिला दिसल्या. पण तिने कुणालाच हाक मारली नाही. प्रियाने मुद्दामून शाळेला जाण्यासाठी एक छोटा रस्ता निवडला. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, फुलझाडे रांगेने उभी होती. पक्ष्यांचा चिवचिवाट कानावर पडत होता. प्रिया इकडे तिकडे बघत, गुणगुणत चालली होती.
किती किती आहे छान
हिरवे हिरवे मस्त रान
रंगीबिरंगी फुललीत फुले
पण कुठे गेलीत सारी मुले!

असे म्हणत एका झाडाचं फूल तिने तोडून केसांंत खोचलं. रस्त्याला दोन-चार लोकं चालताना दिसत होती. पण मुले मात्र कोणीच नव्हती. कारण रस्ता वळणा-वळणाचा होता. शाळेच्या दिशेने जाणारा, पण जास्त वेळ घेणारा. शिवाय या रस्त्याला गाड्या आणायला परवानगी नाही. त्यामुळे या रस्त्याच्या वाटेला मुलं शक्यतो जात नसत. प्रिया विचार करत असतानाच एक खारुताई धावत धावत रस्ता ओलांडून एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसली आणि टकामका प्रियाकडे बघू लागली. प्रियादेखील मोठ्या आनंदाने खारुताईकडे बघू लागली आणि म्हणाली,
खारुताई खारुताई
का पळतेस मला बघून
मी तर आहे तुझी मैत्रीण
मजा करू दोघी मिळून!

मग खारुताई आली आणि प्रियाच्या खांद्यावर बसली. प्रिया पुढे निघाली. गुलाबांच्या झाडाजवळ थांबली. तिथे
अनेक फुलपाखरे मध खाण्यात दंग होती. प्रिया त्यातल्या एकाला म्हणाली,
फुलपाखरा फुलपाखरा
एका जागी थांब जरा
कसे खातोस गोड मध
सांग तुझे गुपित मला!
मग फुलपाखरू प्रियाच्या कानाजवळ दोन-चार वेळा गुणगुणले आणि डोक्यावर जाऊन बसले. आता प्रियाच्या केसांत पिवळेधमक फूल, एका खांद्यावर खारूताई आणि डोक्यावर फुलपाखरू अशी मोठ्या थाटात आणि खूप आनंदात प्रियाची स्वारी शाळेकडे निघाली. सकाळची वेळ होती. त्यामुळे छान गार वाराही सुटला होता. रस्त्यावर सगळीकडे झाडांची सावली पडली होती. वातावरण एकदम छान आणि सुंदर होतं. तितक्यात एक पांढरा शुभ्र ससा गवत खाताना प्रियाला दिसला. प्रिया त्याच्या जवळ गेली. पण तो घाबरला नाही की पळालाही नाही. जणू काही प्रिया तिथे नाहीच असं समजून तो आपला गवत खात होता. प्रियाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली,
ससुल्या रे ससुल्या
किती गोड दिसतोस रे
पांढरे शुभ्र अंग तुझे
स्वच्छ कसे ठेवतोस रे!

मग ससा प्रियाच्या कानाजवळ त्याच्या भाषेत काहीतरी म्हणाला. ते ऐकून प्रियाला तर हसूच आलं. हसत हसतच ती म्हणाली, “ससुल्या चल ना रे माझ्याबरोबर!” मग काय ससुल्याने टुणकन उडी मारली आणि पाठीवरच्या बागेवर जाऊन बसला. आता प्रियाच्या केसांत फूल, खांद्यावर खारुताई, डोक्यावर फुलपाखरू आणि बॅगेवर ससुल्या! अशी प्रियाची स्वारी मोठ्या थाटात मोठ्या आनंदात शाळेकडे निघाली. चालता चालता आणखीन पुढे गेल्यावर तिला दोन पोपट झाडावर गप्पा मारताना दिसले. तेवढ्यात ते पोपटच प्रियाला म्हणाले,
प्रिया प्रिया ऐक जरा
एखादी कविता येते का तुला?
श्रावणमासी हर्ष मानसी
ही कविता ऐकव आम्हाला!

त्यांची ही मागणी ऐकून प्रियाला तर हसूच फुटले. पण आपले हसू थांबवत तिने खड्या आवाजात कविता म्हणायला
सुरुवात केली
श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरून येऊ ना पडे!
गणिताच्या तासाला प्रिया चक्क श्रावणमासी कविता मोठ्या आवाजात म्हणू लागली. तोच सारी मुलं आश्चर्याने प्रियाकडे टकामका बघू लागली. सरदेखील फळ्यावर गणित सोडवायचे थांबून, प्रियाकडे पाहू लागले. प्रिया तर बेंंचवर मान टाकून झोपेतच कविता बडबडत होती. सर तिरमिरीतच प्रियाजवळ आले आणि डोक्यावर हलकीशी टपली मारून म्हणाले, “अगं प्रिया, झोपलीस काय? आणि झोपेत कविता काय म्हणतेस? अगं हा गणिताचा तास सुरू आहे!” तोच प्रिया खडबडून जागी झाली. आपण वर्गात आहोत अन् सगळी मुलं आपल्याकडे बघून हसतात हे बघून ती क्षणभर लाजली!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -