Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनसमय बदलता जाएं...

समय बदलता जाएं…

माेरपीस :पूजा काळे

मै समय हूं… अख्ख्या महाभारतात हे एक वाक्य पराकोटीचं गाजलं एवढी प्रचंड ताकद या वाक्यात होती. कालातीत झालेले इतिहास, भूगोल कालचक्राचा भाग होऊन गेले. पण त्यांच्या स्मृती अजूनही मागे आहेत. ज्या दरवळतात आणि नवी शिकवण जगासमोर आणतात. समय म्हणजे वेळ. वेळ म्हणजे घटिका. घटिका भरणे म्हणजे कासवगतीने काळ पुढे पुढे संक्रमित होणे. घड्याळाच्या काट्यावर चाललेली वेळेची गणितं सगळ्यांना एकसारखीचं असतात. आपणच वेळेला गरजेनुसार, आवडीनुसार अतिरिक्त महत्त्व देतो वा देतही नाही. जेवढी माणसं तेवढ्याचं वृत्ती आणि जेवढ्या वृत्ती तेवढ्याचं वेळेच्या नियुक्त्या. पण ही नियुक्ती करणारे आपण कोण? म्हटलं तर आपलं अस्तित्व क्षुल्लक आहे. कमी अधिक प्रमाणात, चांगली वा वाईट वेळ प्रत्येकावर येतच राहते. जन्म सार्थकी लावण्यात वेळ घालवली तर वेळेहून चांगली मैत्री इतर कोणाशीही होऊ शकत नाही. जन्माची अचूक वेळ, मरणाची अंतिम वेळ, अचानक झालेला धनलाभ, वेळेत ठरलेली लग्नं, कामाच्या ठिकाणी तसंच वेळेनुसार मानवी स्वभावात घडलेले लक्षणीय बदल अचंबित करणारे असतात. मानवाप्रमाणे निसर्गाला वेळ बंधनाची कडी असते. झाडाच्या फांदीवरील दोन आंब्यांमधला एक जो आधीचं पिकलाय. तर दुसरा पिकण्याची वाट पाहतोय. यातून महत्त्वाचा धडा शिकता येतो. तो म्हणजे इतरांच्या यशाने आपण अपयशी आहोत हे सिद्ध होत नाही. याचा सरळ अर्थ असा की, आपली वेळ अजून आलेली नाही, त्यासाठी संयम, चिकाटी आणि विश्वास भरावा लागेल. वेळेचं महत्त्व निसर्गाहून अधिक कोण विषद करेल. वेळेची पुण्याई मिळाली तर ठीक, अन्यथा वेळेला केळ आणि वनवासाला सीताफळ म्हणतात ते उगाचं नाही.

आपल्या गतिमान जीवनावर परिणामकारक ठसा उमटवत चाललेली वेळ ही परमेश्वराची अत्युच्च देणगी होय. सांख्यिकी भाषा, गणितीय सूत्रांनी भारलेली वेळ म्हणजे दिवस-रात्रीची वेगवान चक्र. वेळ आपल्या हातात नसते. पण, ती गाठणं आपल्या हातात असतं. घड्याळाच्या काट्याप्रमाणे वेळेला नियंत्रित केलं तर आजच्या कामाला उद्याची बात कशाला करायची? वेळीचं जागं होणं म्हणजे वेळेला न्याय देणं. सूर्याइतका वक्तशीरपणा आपल्यात यायला काळ जाईल असं मला वाटतं. माणूस स्वभावत: आळशी. जगण्यासाठी लागणाऱ्या साऱ्या गोष्टींसाठी त्याची अव्याहत धडपड पाहता वेळेच्या छडीची मात्रा त्याला लागू पडते. शंभरात दहाचं जण वक्तशीर असतात. वेळेचे पालन करतात. नुसत्या पाट्या टाकायची कामं उर्वरित जण करतात. उद्याचा भविष्यकाळ आजच्या त्यागातून, कर्मातून निर्माण होतो. त्यासाठी घटिकायंत्र कामी येतात. घड्याळाच्या जादूमुळे आपण तरतो. शिस्तीत पळणारे दोन काटे तुम्हाला धावायला लावतात. ठरवून दिलेल्या आणि ठरावीक वेळेत काम करणं म्हणजे काळाचं महत्त्व जाणणं. सोचने से कहां मिलते है तमन्नाओं के शहर, वक्त के साथ साथ चलना भी जरूरी है, मंजिल को पाने के लिए…! समय बदलता हैं, पर बदलने में समय लगता हैं. या मताशी मी नेहमीचं सहमत आहे. गरजेची गोष्ट अपेक्षांच्या ओझ्यांनी पूर्ण होईल असे नाही. मनाची घालमेल, आपण कुठे चुकलो याचा विचार सतावेल. अशावेळी आपणचं आपल्याला समजवायचं. भले यावेळी एक दरवाजा बंद असेल पण काळानुसार इतर दरवाजे खुले होतील. आशावादाला पालवी फुटेस्तोवर विश्वासाची मुळं खोलवर रुजवता आली की मार्ग मिळतो. शांततेच्या विचारधारेतून वेळ सरते. ती सगळं दाखवते, समजावते; परंतु यावर उपाय म्हणून शांत राहत वाट बघणं जमलं पाहिजे. विधिलिखित असलेली चांगल्या माणसांची चांगली वेळ आज, ना उद्या येतेचं. तार्किकतेच्या दृष्टीने अर्थाशी निगडित वेळ आपल्या जगण्यावर तडक प्रकाश टाकते. यशाचा मूलमंत्र असलेल्या वेळेचा दुरुपयोग होतो तेव्हा ती अध:पतनाला आमंत्रण देते. पण दिवस-रात्रीच्या चक्रात, कॅलेंडरच्या तारखात, घड्याळाच्या ठोक्यात उत्तम शिक्षकाचे काम करणारी सुद्धा वेळचं असते हेही विसरायला नको. मला सुचलेल्या काही ओळी त्याला समर्पक आहेत.

एक कोना भिंतीवरल्या घटिका यंत्रासाठी, त्याला नसते आमंत्रणाची चिंता. कारण, लग्न सराईत भेट स्वरूपात आलेलं, बाबांच्या निवृत्तीनंतर मिळालेलं घड्याळ ते. त्याच्या असण्याने एक अख्खी भिंत व्यापून टाकते आपलं अस्तित्व. त्याची मेहेरनजर पडते वेळी-अवेळी. वर्तुळाकार गतीत फिरणाऱ्या सेकंद काट्याला असतो जास्तीचा मान. कारण छोट्या मोठ्या काट्यांवरचं असते त्याची कमांड. तो सांगतो जन्म मृत्यूचं मर्म. ही वेळ थांबवावी वाटत असता, विचारांना लागतं ग्रहण. आज नको भेटायला, आई गं, नकोचं जायला, अरे बापरे कालचं झालं का? उत्तम, चांगली वेळ आहे परवाची, ते वेळेचं पाहून घ्या जरा, हो, हो वेळ काढून येईन, बघ हं आताची वेळ बरोबर नाहीए, नको हं… उद्या मला अजिबात वेळ नाहीए… अशी ही बिनबुडाची कारणं. पंख लावून उडणारी वेळ कोणासाठी थांबत नाही हा धडा घेणं महत्त्वाचं आहे. वि. स. खांडेकर काळाला उद्देशून म्हणतात, काळ हा कोणासाठी थांबत नाही. दिवस-रात्रीच्या पापण्यांनी त्याचे उघडझाप चाललेले असते. काळ हा सर्वभक्षक नाही तसा तो सर्वरक्षकही नाही. तो आहे द्रष्टा… फक्त द्रष्टा. वेळेवर मात करणं ज्याला जमेल तो जगेल. दुःखावर उत्तम औषध काळाचे असेल. काळानुरूप प्रसंग घटना बदलतील. दुभंगलेल्या हृदयाला जोडण्याची ताकद, वठलेल्या झाडाला पल्लवीत करण्याची जादू काळचं जाणे. रात्रीवर पांघरूण टाकणाऱ्या स्वप्नांसारखी, नशीब बदलणारी वेळचं ठरू शकते, त्यासाठी कर्माची बाजू उलगडताना, ऊठा, पळा, लागा कामाला, कर्म करा, बुद्धिमत्तेचा कस पाडा, असेल काळा हाती मरणे, परी आमुच्या हाती जगणे हा मंत्र उपयोगी येतो. जो घटिकायंत्राच्या मनोगताद्वारे विसाव्याच्या क्षणाला काट मारा सांगतो. विषयानुरूप सुचलेली कविता आंतरिक बदल घडवते माझ्यात.

दिसामागून दिस जाती, रातीमागून राती. विसाव्याला हुरळत नाही

घटिकायंत्राची गती. धिम्या धिम्या गतीतला, सेकंदाचा ठेहराव. दोन काट्यांवर स्थिर माणसांचा जमाव. जमावाला जखडती तासाची गणितं, माथेफिरू काळवेळ ऊरे पाबंदीत. पाबंदीच्या फांद्यावरी लटकती फास, जगा, जागे व्हाची मावळत नाही आस. आशेच्या साखरवेळा अंतर्बाह्य मूक, चाळवलेल्या निद्रेला अशांतीची भूक. सुख म्हणजे असतं काय? गावगड्यासं विचारू, निर्व्याजतेने जगताना नवी दृष्टी साकारू. नवा जमाना, नवी वेळ मनगटाशी गट्टी धरू, वेळेला बाजूला सारून वेळेवरती मात करू. झाकलेल्या मुठीतून वाळूचा एक एक कण निसटत चाललाय. त्या निसटणाऱ्या क्षणांना कसं खुलवायचं, कुठली वेळ तुम्ही कशी घालवता यावर तुमची पारख होताना, येणारा काळ कसा घालवायचा हे ज्याचं त्याने ठरवावं. अन्यथा आपला जन्म वाया जाईल एवढं मात्र खरं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -