Sunday, April 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाजश्रमप्रतिष्ठा

श्रमप्रतिष्ठा

गुरुनाथ तेंडुलकर

महात्मा गांधीजींसंबंधी एक कथा अलीकडेच माझ्या वाचनात आली. कुठंतरी सत्याग्रहाला जात असता एके रात्री गांधीजींचा मुक्काम एका उद्योगपतीच्या बंगल्यावर होता. गांधीजींसारख्या विभूतीचे पाय घरी लागले, मग काय विचारता? गांधीजींसाठी काय करू आणि काय नको असं त्या शेटजींना झालं. पंचपक्वान्ने शिजवली गेली. हर तऱ्हेचे पदार्थ बनवले. मेवामिठाईंची रेलचेल उडाली. लोक गांधीजींच्या दर्शनासाठी येत होते. निरनिराळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊन तृप्तीचा ढेकर देऊन परतत होते. पण गांधीजींनी मात्र या पदार्थांपैकी कशाकशाला म्हणून हात लावला नाही. त्यांनी केवळ दोन छोटी फळं खाल्ली, ग्लासभर दूध प्यायले नि झोपले. दुसरे दिवशी ते यजमान उद्योगपती अगदी भल्या पहाटेच उठले. स्नान वगैरे आटोपून तयार झाले. गांधीजींना तिथून पुढच्या प्रवासाला जायचं होतं. प्रवासाची सर्व तयारी झाली होती. माणसं जमा होऊ लागली होती. सर्वजण गांधीजींची वाट पाहत होते. पण गांधीजी मात्र अद्याप स्नानगृहातच होते. बराच वेळ झाला, पण गांधीजी स्नानगृहातून बाहेर पडण्याचं चिन्ह दिसेना. काहीशा काळजीनंच त्या उद्योगपतींनी स्नानगृहाचा दरवाजा लोटला आणि आत डोकावून पाहिलं आणि पाहतात तो काय?

गांधीजी चक्क कपडे धूत होते. केवळ स्वतःचेच नव्हे, तर इतरांचे देखील, त्या शेटजींनी स्नानाला गेल्यावर आपलं धोतर, बनियन आणि इतर सगळे कपडे तसेच कोपऱ्यात ठेवले होते. शेटजी वरमले. खजील झाले. ‘हे काय बापू, आपण आमचे कपडे धुतले?’ ‘मग त्यात काय बिघडलं? अहो, आपण आमचे यजमान. यजमानाकडे पाहुण्यानं थोडंसं काम केलं, तर काही बिघडत नाही.’ ‘म्हणून काय कपडे धुवायचे?’ ‘अहो, कोणतंही काम हलकं नसतं हो… चला, मी आलोच पाच मिनिटांत.’ असं म्हणून गांधीजींनी त्या उद्योगपतीचे धुतलेले कपडे पिळायला सुरुवात केली… ही कथा मी वाचली मात्र आणि माझ्या डोळ्यांत पाणी आलं. ही कथा मी पुन्हा पुन्हा वाचली. निरागस चेहऱ्याचा तो महात्मा कपडे धूत असताना मला दिसू लागला आणि त्याचबरोबर श्रीमंतीची मस्ती चढलेला, कपडे स्नानगृहात तसेच भिरकावणारा तो उद्योगपती, माजोरडा शेटजी… मला त्या शेटजींचा तिरस्कार वाटला. दोन दिवस झाले. चार दिवस झाले. ही कथा माझ्या डोक्यात सतत घोळतच राहिली. कोणतंही काम हलकं नसतं म्हणून स्नानगृहात कपडे धुणारे गांधीजी आणि खजील झालेला तो उद्योगपती शेटजी.
कुठे तरी मला त्या उद्योगपतीच्या जागी माझा स्वतःचा चेहरा दिसू लागला. आपणही असेच वागतो याची जाणीव होऊन स्वतःचीच लाज वाटली. मी स्वतःदेखील घरी अगदी तसाच वागतो. स्वतःचे कपडे कधीही मी स्वतः धूत नाही, कामवाली बाई आहे, वॉशिंग मशीन आहे, झालंच तर बायको…

चहा प्यायल्यानंतर स्वतःचा कपदेखील मी विसळत नाही. ऑफीसच्या कामासाठी ज्यावेळी बाहेरगावी जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळी हातरुमालापासून अगदी पायमोज्यांपर्यंत सगळे कपडे हॉटेलच्या बॉयला बोलावून लाँड्रीत देतो. स्वतःची गाडी मी कधीही स्वतः धूत नाही. सोसायटीच्या वॉचमनला दरमहा पैसे दिले की, तो गाडी धुतो. परतून खाली उतरल्यावर मी गाडीकडे नजर टाकतो नि जराशी धूळ दिसली तरी लागलीच ‘वॉचमऽनऽ’ असं किंचाळतो. लागलीच वॉचमन फडका घेऊन धावतो आणि गाडी पुसतो.ऑफिसातदेखील मी असाच वागतो. अगदी बारीकसारीक कामांसाठी मी असिस्टंटला बोलावतो. प्यूनला बोलावतो. हे अमुक अमुक काम हलके आहे ते काम स्वतः करताना आपल्याला लाज वाटते, याची मला लाज वाटली. त्या उद्योगपती शेटजींच्या बंगल्यावरचा तो कपडे धुण्याचा प्रसंग मला चटका लावून गेला. पण… पण.. विचार करता करता याच घटनेतला आणखी एक पैलू मला दिसला. त्या शेटजींचं खरंच काही चुकलं का? त्यांनी तर नेहमीच्या सवयीप्रमाणे आपले कपडे न धूता तसेच टाकले होते. नोकरचाकर आहेत, धुतील सावकाश… ते शेटजी बिचारे बाहेर दिवाणखान्यात गांधीजींची वाट पाहत होते. इतर अनेक माणसं गांधीजींसाठी जमली होती. त्या मंडळीत अनेक लेखक होते, पत्रकार होते, व्यापारी होते, उद्योगपती होते, राजकारणी नेते होते, विविध स्तरांतील मान्यवर बापूजींसाठी खोळंबून थांबले होते आणि बापू मात्र खुश्शाल आत स्नानगृहात कपडे धूत होते.

अनेक माणसांना ताटकळत ठेवून कपडे धुण्याचा हा उद्योग म्हणजे श्रमप्रतिष्ठा वाढविण्याचा अट्टहास आहे असं मला वाटलं आणि त्याचबरोबर जाणीव झाली की, त्या उद्योगपती शेटजींचं काहीही चुकलं नव्हतं. गांधीजींचे ते यजमान, ते शेटजी… ते मोठे उद्योगपती होते. धनाढ्य होते. श्रीमंत होते. कारखाना चालवत होते. एवढ्या मोठ्या माणसानं आपला वेळ काय कपडे धुण्यात खर्च करावा का? घरी नोकरचाकर होते, गडीमाणसं होती. कपडे धुणं वगैरे कामं ही त्या नोकर मंडळींची. उद्योगपतींची नव्हे. गडीमाणसांची कामं शेटजींनी केली, तर गडीमाणसांच्या नोकऱ्या कशा आणि खरंच… राजकन्येनं स्वयंपाकघरात आपला वेळ फुकट घालवायचा नसतो. आपल्याला पुढे महाराणी व्हायचं आहे हे ध्यानात घेऊन तिनं त्यानुसारच वागायला हवं. एखाद्या हॉस्पिटलमधील सर्जन जर स्वतःच पेशंटच्या बिछान्याची आणि शौचालयाची साफसफाई करण्यात वेळ खर्च करू लागला तर कसं चालेल? एखाद्या न्यायालयातील न्यायाधीश स्वतःच टायपिंग करू लागला तर…
एखाद्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ उपकरणं धुणं आणि साफसफाई करण्यात वेळ वाया घालवू लागला तर, त्याचा विपरीत परिणाम त्याच्या संशोधनकार्यावर झाल्याशिवाय राहणार नाही.

एखाद्या महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य उंच टेबलावर उभे राहून वर्गातले पंखे पुसू लागले तर… एखाद्या संगीतकारानं त्याचा रियाजाचा वेळ वाया घालवून घरगड्याची काम करावीत का? एखाद्या महापालिकेच्या आयुक्तपदाच्या व्यक्तीनं सफाई कामगारासारखं हातात झाडू घेऊन दिवसभर रस्ते झाडले, तर कसं चालेल? फोटो काढण्यापुरतं वृक्षारोपण ठीक. पण एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री जर माळीकाम करू लागले तर… कोणतंही काम हलकं नसतं हे खरंच… पण तरीदेखील प्रत्येकानं आपल्या हुद्याला आणि पदाच्या प्रतिष्ठेला साजेशीच कामं करावीत. उगाचच श्रमप्रतिष्ठेच्या नावाखाली काहीतरी खुळचटपणा डोक्यात घेऊन नको ती कामं करू नयेत. कोणतंही काम हलकं नसतं, सर्व कामं महत्त्वाची असतात वगैरे सगळं ऐकायला, बोलायला बरं वाटतं. पण तरीही महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींनी आपला वेळ तशाच उच्च दर्जाच्या महत्त्वाच्या कामासाठीच खर्च केला पाहिजे. आपला वेळ आणि बुद्धी भलत्यासलत्या कामासाठी वाया घालवू नये हेच खरं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -