माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग येतात की काहीही त्याच्या मनासारखे घडत नाही. कितीही प्रयत्न केले तरी सगळे विपरीतच होत जाते. अगदी जवळचे लोक विश्वासघात करतात, परके होऊन जातात. तो जिथे काम करतो तिथलेही लोक शत्रूसारखे वागतात. घरी दिलासा शोधावा म्हटले तर कुटुंबातही बेबनाव निर्माण झालेला असतो. अशा वेळी माणूस अगदी एकाकी आणि निराश होऊन जातो. त्याचा सगळ्यांवरचा विश्वास उडून जातो. आयुष्यात पुन्हा काही चांगले घडू शकेल ही आशाच संपते. मनाला टोकाची उदासीनता घेरते. खरे तर ही फार धोक्याची वेळ असते. आपल्या हिंदी सिनेमांत, अर्थात जुन्या, जीवनात येऊ शकणाऱ्या अशा सर्व प्रसंगांचे चित्रण असायचे. हल्लीसारखे सगळे छान छान, भपकेबाज, सुंदर, गुडीगुडी नसायचे. जीवनाचे पुष्कळसे यथार्थ चित्रण असल्याने त्या कथात अशा निराशेच्या प्रसंगासाठीही अर्थपूर्ण, सुंदर गाणी असायची. दु:खात बुडालेल्या त्या पात्राच्या मनातील भावना, वेदना या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होत. अशा प्रसंगी गीतकाराने थेट देवाकडेच तक्रार केलेली असायची, ‘जिंदगी देनेवाले सून, तेरी दुनियासे दिल भर गया, मैं यहा जितेजी मर गया!’ कधी ते देवाला अशीही विनंती करत, ‘तेरी दुनियामे दिल लगता नही, वापस बुला ले, मैं सजदेमे गिरा हू, मुझको ए
मालिक उठा ले.’
मात्र सगळीच गाणी निराशा व्यक्त करणारी नसत. काही गाणी स्वत:च्या मनाची समजूत स्वत:च घालणारीही असत. ती सिनेमाच्या कथेबाहेरही लोकांना उपयोगी पडत. आज पैसे घेऊन मानसोपचार तज्ज्ञ करतात तसे ‘समुपदेशन’ या गीतकारांनी अनेक पिढ्यांचे केले होते, तेही पडद्यामागे राहून! आजही ती गाणी केवढा दिलासा देतात! साहिरच्या लेखणीतून उतरलेल्या अशाच एका गाण्याच्या आधीच्या दोन ओळी आत्महत्येचे विचार मनात घोळवणाऱ्या कुणालाही परावृत्त करू शकतील इतक्या सुंदर होत्या. ‘मौत कभीही मिल सकती हैं, लेकीन जीवन कल ना मिलेगा, मरनेवाले सोचसमझ ले, कल ये पल फिर ना मिलेगा.’ सिनेमा होता १९५८ सालचा ‘सोने की चिडिया.’ लेखिका चक्क प्रसिद्ध उर्दू लेखिका इस्मत चुगताई! दिग्दर्शक शाहीद लतीफ आणि प्रमुख कलाकार होते नूतन, बलराज सहानी आणि तलत मेहमूद. याशिवाय देव आनंद एका छोट्या मुलीच्या भूमिकेत आपली सुषमा शिरोमणी आणि धुमाळही होते. गीते होती कैफी आझमी, साहीर लुधियानवी आणि मजरूह सुलतानपुरी यांची. संगीत ओ. पी. नैयर यांचे!
अनाथ लक्ष्मीला नातेवाईक खूप छळतात, बलराम नावाचा भाऊ तर तिला एका गुंडाला विकतो. ती स्वत:ची सुटका करून घेण्यात यशस्वी होते. तिला एका सिनेमा कंपनीत काम मिळते. त्यातून ती श्रीमंत होते. दरम्यान तिचे प्रेम एका अमर नावाच्या पत्रकारावर बसते; परंतु त्याच्याकडूनसुद्धा विश्वासघात झाल्याने ती आत्महत्या करायला समुद्रावर जाते. तिथे तिला श्रीकांत (बलराज सहनी) या कवीचे गाणे ऐकू येते. त्याच्या अत्यंत आशादायी शब्दांनी तिचा विचार बदलतो. दिग्दर्शकाच्या एका अतर्क्य योजनेने मग ती त्याच्याकडेच राहू लागते. दरम्यान बरेच नाट्य घडून शेवटी ती अभिनयक्षेत्र सोडून त्याच्याबरोबर आयुष्य घालवायचे ठरवते आणि ते दोघे ते गाव सोडून जातात. या शेवटच्या दृश्यात साहिरचे तेच सुंदर गाणे गात ते पुढे जातात असे दृश्य होते. साहिरचे ते अजरामर शब्द होते –
‘रात भर का है मेहमान अंधेरा,
किसके रोके रुका है सवेरा?’
जीवनात सुख-दु:ख येत-जात राहतात. हे चक्र कधीच थांबत नाही. त्यामुळे दु:खाचा काळ आल्यावर निराश होऊन जीवनातून माघार घेऊ नये. परिस्थितीला शह देणे अगदीच शक्य नसेल तर निदान वाट पाहावी, कारण रात्र कितीही अंध:कारमय असली तरी पुन्हा सकाळ होणे कुणीही थांबवू शकत नसते, उद्याचा सूर्य त्याच्या वेळी उगवणारच असतो. तसेच दु:खानंतर सुख हे येणारच असते असा कवीचा संदेश होता.
‘रात जितनी भी संगीन होगी,
सुबह उतनीही रंगीन होगी.’
निराशेत सापडलेल्या माणसाला वाटते ‘आता माझ्या जीवनात अजून काय वाईट व्हायचे बाकी आहे? आता जर माझ्या जीवाला थोडासाही दिलासा मिळत नसेल तर बदल होणार तरी कधी?’ यावर कवी एक वेगळाच युक्तिवाद करून आपल्याला आशेचा किरण दाखवतो. तो म्हणतो, ‘अमावस्या हीच तर सर्वात अंधारी रात्र असते आणि त्यानंतरच चंद्राचा शुभ्र प्रकाश वाढत जातो. रात्रीचे चांदणेही अधिक सुंदर होत जात असते. म्हणून तू थोडी वाट पाहा. लवकरच लालसर, केशरी, सोनेरी पहाट होणार आहे’
‘गम न कर गर है बादल घनेरा,
किससे रोके रुका है सवेरा.
रात भरका है मेहमान अंधेरा…’
माझ्या अस्वस्थ मना, तक्रार करूच नकोस. डोळ्यांत अश्रू दाटले तर ते पिवून टाक पण जसा जमेल तसा हा थोडासा काळ काढून घे, आजची वेळ मारून ने कारण आता दु:खाचा अंत होण्याची वेळ जवळ आली आहे.
‘लबपे शिकवा न ला अश्क पी ले.
जिस तरह भी हो, कुछ देर जी ले.
अब उखडनेको है गमका डेरा,
किसके रोके रुका है सवेरा…’
साहीर पुढे किती सकारात्मक विचार देतो पाहा, तो म्हणतो ‘ये, आपण एकत्र बसू. काहीतरी उपाय शोधू. उद्याच्या सुखाची काहीतरी सुंदर कल्पना रंगवू. कारण तुझे आणि माझेही दु:ख सारखेच तर आहे.’
किती आश्वासक शब्द! खरे तर काही वेळा परिस्थिती बदलली नाही तरी चालते पण कुणी तरी मनापासून आपल्याबरोबर आहे ही भावनाच माणसाला त्या प्रसंगातून तारून नेत असते.
‘आ कोई मिलके तदबीर सोचे,
सुखके सपनोंकी ताबीर सोचे.
जो तेरा है वही गम है मेरा,
किसके रोके रुका है सवेरा…’
साहीर म्हणजे कहरच होता. रोमान्स असो, तत्त्वज्ञान असो, त्यात हिंदू अध्यात्म असो, मानवी संबंधातली गुंतागुंत असो, थोडक्यात-मानवी जीवनातला कोणताही प्रसंग असो या अवलियाकडे एक अगदी सघन अर्थ असलेले गाणे, जणू कायम तयारच असायचे!
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…