Monday, April 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाजतिचे ‘मॉक’ मरण

तिचे ‘मॉक’ मरण

डॉ. विजया वाड

आपण मेलो तर काय होईल? – ती विचार करीत होती. “मी मेले तर काय होईल हो?” तिने नवऱ्याला विचारले. “बातमी होईल.” “बस्?” “मग आणखी काही व्हायला हवंय का?” “हं!” “काही लोक खरे रडतील नि काही खोटे अश्रू पुसतील.”
“पण ते मला कसं कळेल?” “हो. हे बाकी खरंय कारण… मेल्यानंतर… म्हणजे खरं खरं मरण आल्यानंतर स्वत:ला समजत नाही काहीच.” “तुम्हाला वाईट वाटेल?” “हो” “ खरं खरं सांगा.” “अगदी खरं सांगतो. खूप वाईट वाटेल.” तो गळ्याजवळची कातडी किंचित ओढत, गळ्याशपथ म्हणाला. तिचे समाधान पुरते झाले नाही. ती आजवर अपेक्षित बायकांसाठी सातत्याने झगडत होती. तिला राजमान्यता होती. लोकमान्यता होती. समाजात मानाचे स्थान होते. राज्यपालांकडून आठ हजार पेन्शनही होते. ते बंद झाले असते. हा त्याच्या दृष्टीने तोटा होता. त्याचे नवऱ्यास वाईट वाटणे अगदी नैसर्गिक होते. शिवाय इतक्या वर्षांचा सहवास! नाही म्हटलं तरी सहवासानं प्रेम जडतंच आणि तीही बरी, एकनिष्ठ वागली होती. तो काही बाहेरख्याली किंवा बहकलेला पुरुष नव्हता. बरा होता सरळमार्गी, साधा पुरुष होता.

“मग मी खोटी खोटी मरते.” “अरे बापरे. नको गं.” “मला मेल्यावरचा शो बघायचा आहे.” “पण मिटल्या डोळ्यांनी तो शो कसा बघणार?” “काही जणांचे डोळे मरणानंतरही उघडेच राहतात हो.” तिने नवऱ्याला समजावले “बरं बाई कर तुझ्या मनासारखं.” “आणि ती ‘खोटी’ मेली. त्याने नातेवाईक बोलावले. लेकीला बोलावले. लेक गावाहून तडफडत, रडत आली. “आई… आई गं” करीत. तिचे हृदय उलून आले. पटकन् उठून बसावेसे वाटले. पण मन आवरून ती निपचित पडून राहिली. आपले ‘मॉक’ मरण एन्जॉय करीत राहिली. तिला खराखुरा अंदाज आला. नवरा खराखुरा रडत होता, मुलगी तर धायमाकेलून रडत होती. शेजारी, पाजारी डोळे पुसत होते. एवढ्यात कुणीतरी म्हणाले, “राव, शोक आवरा.” “भा. रा. तांबे यांची कविता आठवते ना?” “जन पळभर म्हणतील हायहाय.” “कोणत्या वेळी काय आठवावं याचा विवेक ठेवा जरा.” बायकोनं वेळीच नवऱ्याला ठोसलं. तो बिचारा गप्प झाला. बायका नवऱ्याला ठेचण्यात पटाईत असतातच असतात. याला
अपवादही नाही. एकसे एक सवाई असतात बायका.

“रावसाहेब, पुढची तयारी आता करायला हवी.” कोणीतरी अर्ध्या तासाने म्हणाले नवरा घाबरला पुढची तयारी? म्हणजे हिला जाळायचे? आणि ही ओरडली तर? हिला साधा चटकाही सोसत नाही. तो रडत तिच्या कानाशी येऊन म्हणाला. “लोक तुला उत्तरक्रियेसाठी चितेवर ठेवत आहेत गं.” तशी ती टुणकन् उठली. हसतमुख म्हणाली. ‘‘कशी मी गंमत केली!” वहिनी खऱ्याखुऱ्या मेल्याच नाहीत? “माझे मॉक मरण तुम्ही साऱ्यांनी एन्जॉय केलेतं ना?” ती गालावर बोट ठेवीत विचारती झाली.
“मॉक म्हणजे खोट खोटं ना हो वहिनी?” “हो.” “खोटं खोटं कोणी मरतं का हो वहिनी?” “आमचे अश्रू फुकट गेले.” मरतात एकदाच! कोणीतरी म्हणाले. “आता खराखुरा अंत झाला की बोलवा. चला आता” “लोकं पांगली. नवरा खजील झाला. पण ती मजेत होती. “राज्यपाल आलेच नाहीत.” “ते परदेश दौऱ्यावर आहेत. विसरलीस का?” “अरे हो ! माझ्या लक्षातच
नाही राहिलं. पण बातमीदार आले होते का?” “ते वासावरच असतात. आता उद्या पेपरात तुझं हसं होईल.” “होऊ देत”
“असं कसं?” त्याने प्रश्न केला. “आजचं वृत्तपत्र ही उद्याची रद्दी असते.” ती शांतपणे म्हणाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -